Advertisement

‘हाफकिन’च ठरवणार मास्क, पीपीई किटचा दर्जा, अन्यथा कारवाई

पी.पी.ई. किट आणि एन ९५ मास्कचं उत्पादन आणि विक्री करण्याआधी हाफकिन बायोफार्मास्युटिकल (haffkine biopharmaceutical) महामंडळाकडून त्यांचा दर्जा व गुणवत्ता प्रमाणित करून घेण्याचे निर्देश राज्य शासनाने सर्व कंपन्यांना दिले आहेत.

‘हाफकिन’च ठरवणार मास्क, पीपीई किटचा दर्जा, अन्यथा कारवाई
SHARES

कोरोना रुग्णांवर (coronavirus patient) उपचारासाठी आवश्यक असलेलं पी.पी.ई. किट आणि एन ९५ मास्कचं उत्पादन आणि विक्री करण्याआधी हाफकिन बायोफार्मास्युटिकल (haffkine biopharmaceutical) महामंडळाकडून त्यांचा दर्जा व गुणवत्ता प्रमाणित करून घेण्याचे निर्देश राज्य शासनाने सर्व कंपन्यांना दिले आहेत. दर्जा व गुणवत्तेबाबतच्या मानकाव्यतिरिक्त इतर साहित्य वापरून तयार केलेलं किट अथवा मास्कची (ppe kit and N 95 face mask) विक्री  बेकायदेशीर ठरणार आहे. अशा किट व मास्कची विक्री करणाऱ्यांविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचं राज्य शासनाने अधिसूचनेद्वारे जाहीर केलं आहे.

हेही वाचा- राज्याने केंद्राकडे मागितले ९ लाख N ९० मास्क

दर्जाहिन उत्पादन

राज्यात (maharashtra) कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी साथरोग नियंत्रण कायदा १८९७ ची अंमलबजावणी सुरू झाली असून covid-19 उपाय योजना नियमावली लागू झाली आहे. कोरोना रुग्णांवर उपचार करणाऱ्या आरोग्य सेवेतील वैद्यकीय अधिकारी, परिचारिका, निमवैद्यकीय कर्मचारी यांना प्रादुर्भावापासून रोखण्यासाठी पीपीई किट व एन ९५ मास्क आवश्यक असते. त्यामुळे केंद्र शासनाने पीपीई किट व मास्क यांना औषधे म्हणून अधिसूचित केलं आहे. किट व मास्कचा तुटवडा पाहून अनेक उत्पादकांनी पीपीई किट व एन ९५मास्कचे उत्पादन सुरू आहे.  मात्र, या किट व मास्कचा दर्जा व गुणवत्ता ही ठरविलेल्या मानकानुसार नसल्यास आरोग्य सेवा देणाऱ्या अधिकारी कर्मचारी यांना प्रादुर्भावास सामोरं जावं लागतं. तसंच अशी उत्पादने ही वैद्यकीयदृष्ट्या उपयोगाची नसतात. त्यामुळे राज्य शासनाने हे साहित्य प्रमाणित असावं, यासाठी आदेश काढण्यात आले आहेत.

दर्जा प्रमाणित करणं बंधनकारक

त्यानुसार, पीपीई किट व एन ९५ मास्क यांचे उत्पादन करणाऱ्या उत्पादकांनी या साहित्याचा दर्जा व  गुणवत्ता ही हाफकिन बायोफार्मास्युटिकल (haffkine biopharmaceutical) महामंडळाकडून प्रमाणित करून घेणं बंधनकारक आहे. त्याशिवाय या साहित्याची विक्री कोणत्याही उत्पादक/वितरक/अडते(एजंट) यांना करता येणार आहे. अशी विक्री केल्याचे आढळून आल्यास अशा उत्पादन करणाऱ्या  व विक्री करणाऱ्यांविरुद्ध कडक कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे.

तसंच राज्यातील या साहित्याची कमतरता लक्षात घेऊन अनावश्यक साठेबाजी करण्यास प्रतिबंध करण्यासाठी प्रमाणित पी.पी.ई. किट व एन ९५ मास्कची विक्री व वितरण फक्त राज्य शासनाच्या मान्यतेने व शासनाने ठरवून दिलेल्या दराने राज्य शासनास अथवा हे साहित्य खरेदीस परवानगी दिलेल्या संस्थेस करण्याचे निर्देशही यामध्ये देण्यात आले आहेत.

हेही वाचा- प्रतिबंधित भागात महापालिका पोहोचवणार धान्य

इथं करता येईल तक्रार

यासंबंधी काही अडचणी अथवा मार्गदर्शन हवं असल्यास व्यवस्थापकीय संचालक, हाफकिन बायोफार्मास्युटिकल महामंडळ, मुंबई इथं 022-24510628 किंवा सचिव, वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभाग (022-22622179) व प्रधान सचिव, सार्वजनिक आरोग्य विभाग (022-22617388) या ठिकाणी संपर्क साधण्याचं आवाहनही या अधिसूचनेद्वारे करण्यात आलं आहे.

राज्य शासनाच्या आदेशाचं उल्लंघन केल्यास संबंधितांविरुद्ध साथरोग नियंत्रण कायदा १८९७ मधील तरतूद, आपत्ती व्यवस्था कायदा आणि अन्न व औषधी व्यवस्थापन कायद्यातील विविध तरतुदीनुसार दंडनीय कारवाई करण्यात येणार असल्याचंही यामध्ये नमूद करण्यात आलं आहे.


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा