Advertisement

निवासी डॉक्टरांना आठवड्यातील ५ दिवस काम आणि २ दिवस सुट्टी

निवासी डॉक्टरांची ५ दिवस काम आणि २ दिवस सुट्टी यानुसार नियुक्ती करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

निवासी डॉक्टरांना आठवड्यातील ५ दिवस काम आणि २ दिवस सुट्टी
SHARES

कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर मुंबईसह राज्यभरातील रुग्णांच्या संख्येत झपाट्यानं वाढ झाली आहे. ही वाढती संख्या लक्षात घेता निवासी डॉक्टरांची ५ दिवस काम आणि २ दिवस सुट्टी यानुसार नियुक्ती करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. याबाबत परिपत्रक काढण्यात आलं असून, महापालिकेनं हे परिफत्रक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांना दिले आहेत. त्याशिवाय, महापालिकेच्या आणि राज्य सरकारच्या रुग्णालयांमध्ये लवकरच बायोमेट्रिक हजेरी सुरू होणार असून संसर्ग पसरणार नाही यासाठी सॅनिटायझर किंवा साबणाचा वापर करून हात स्वच्छ करण्याच्या सूचना देण्यात आल्या  आहेत.

केंद्रीय आरोग्य विभागाच्या सूचनेनुसार निवासी डॉक्टरांसह परिचारिका आणि आरोग्य कर्मचाऱ्यांचे ७ दिवस कोरोना विभाग, ७ दिवस सुट्टी आणि नंतरचे ७ दिवस कोरोनाव्यतिरिक्त विभागात असे २१ दिवसांचे चक्राकार पद्धतीनं कामाचं नियोजन करण्याची सूचना दिली आहे. ६७ टक्के मनुष्यबळ कार्यरत राहून सुमारे ३३ टक्के कर्मचारी विश्रांती करतील, असा हेतू यामागे आहे. मात्र, मनुष्यबळाचा तुटवडा असल्याने यापद्धतीने कामाचे नियोजन करण्याचे शक्य नसल्याने निवासी डॉक्टरांना ५ दिवस सलग काम आणि २ दिवस सुट्टी या पद्धतीनं कामांचं नियोजन करण्याचं पालिकेनं परिपत्रकाद्वारे स्पष्ट केले आहे.

परिचारिकांनाही दिवस किंवा रात्रपाळीमध्ये सलग ५ दिवस काम आणि २ दिवस सुट्टी याच पद्धतीनं नियुक्ती केली जाणार आहे. या व्यतिरिक्त आठवड्याची वेगळी सुट्टी दिली जाणार नाही. वरिष्ठ डॉक्टर वा व्यवस्थापन वा प्रशासकीय कामांमधील डॉक्टरांना ही पद्धती लागू नसणार आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील विनावैद्यकीय, प्रशासकीय, निमवैद्यकीय सर्व कामाच्या दिवशी १०० टक्के उपस्थित राहील.

कोरोनाचा धोका वाढत असल्यानं सलग रुग्णांच्या संपर्कात राहिल्यानं व्हायरसचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळं ५ दिवस काम आणि २ दिवस सुट्टी दिल्यास हा धोका ७० टक्क्यांपर्यत वाढू शकतो, सध्या आम्ही ५० टक्के जोखीम पत्करून काम करत असल्याचं नायरमधील निवासी डॉक्टरांच्या मार्ड संघटनेने मात्र पालिकेच्या या आदेशाला विरोध दर्शविला आहे.

रुग्णालयात सद्य परिस्थिती पुरेसे मनुष्यबळ उपलब्ध असून निवासी डॉक्टरांना संसर्ग होण्याचे प्रमाण वाढल्यास आरोग्य सेवा ठप्प होईल. पुरेसे मनुष्यबळ उपलब्ध करण्यासाठी इतर वैद्यकीय महाविद्यालये किंवा रुग्णालयांची मदत घ्यावी. परंतु यासाठी निवासी डॉक्टरांचा जीव धोक्यात घालू नये. पालिकेने हा आदेश मागे घेऊन केंद्रीय आरोग्य विभागाच्या सूचनांचे पालन करावे, अशी मागणी ‘मार्ड’ने केली आहे.



हेही वाचा -

धारावीत मंगळवारी २६ नवीन कोरोना रुग्ण, रुग्ण वाढीचा वेग घटला

१ जूनपासून २०० नॉन एसी रेल्वेगाड्या नियोजित वेळेनुसार धावणार



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा