Advertisement

जाणून घ्या, क्वारंटाईन- आयसोलेशन म्हणजे काय?

कोरोना झाल्याचा संशय असलेल्या रुग्णांना क्वारंटाईन करण्यास सांगितलं जातंय. तर कोरोनाग्रस्तांना आयसोलेशन मध्ये ठेवलं जातंय. पण क्वारंटाईन आणि आयसोलेशन म्हणजे काय? त्यात काय करतात जाणून घ्या.

जाणून घ्या, क्वारंटाईन- आयसोलेशन म्हणजे काय?
SHARES

काही दिवस तुमचा जगाशी संपर्क तुटला तर? मित्र परिवार तर दुरची गोष्ट, तुम्ही तुमच्याच कुटुंबियांना देखील भेटू शकत नाही. एकाच बंद खोलीत तुम्हाला १४ दिवस काढावे लागले तर? कठिणच आहे हे. पण कोरोना व्हायरसचा वाढता प्रादुर्भाव पाहता अनेकांनी स्वत:ला क्वारंटाईन केलं आहे.

कोरोना व्हायरसच्या (coronavirus) पार्श्वभूमीवर जगभरात आतापर्यंत हजारो रुग्णांना क्वारंटाईन आणि आयसोलेशन मध्ये ठेवण्यात आलं आहे. कोरोना व्हायरसच्या संसर्गामुळे कोरोनाग्रस्तांची संख्या वाढत चाललीय. महाराष्ट्रात कोरोनाग्रस्त रुग्णांचा आकडा ४२ वर गेला आहे. मुंबईत (Mumbai) एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. तर देशात कोरोनाचा हा तिसरा बळी आहे.


गैरसमज दूर करा

खबरदारी म्हणून कोरोना व्हायरसच्या संसर्गाची लक्षणं दिसताच संबंधिताला क्वारंटाईन होण्याच्या सूचना आरोग्य विभागाकडून देण्यात आल्या आहेत. तर काही रुग्णांना आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आलं आहे. पण रुग्णांना आपल्यासोबत नेमकं काय केलं जाणार? किंवा किती दिवस एका खोलीस ठेवलं जाणार? हे माहित नसल्यानं ते पळून जात असल्याच्या घटना समोर आल्या आहेत.

क्वारंटाईन आणि आयसोलेशन या शब्दांनीच अनेकांना घाम फुटण्यास सुरुवात होते. आज आम्ही तुम्हाला क्वारंटाईन आणि आयसोलेशन याचा अर्थ सांगणार आहोत. जेणे करून गैरसमज कमी होण्यास मदत होईल.


आयसोलेशन म्हणजे काय?

एखाद्या रुग्णामध्ये अमुक एका आजाराची लक्षणं सिद्ध होऊन आजार असल्याची बाब समोर येते तेव्हा त्या रुग्णाला रुग्णालयात दाखल केलं जातं. तिथं त्याला वेगळं ठेवण्यात येतं. यालाच आयसोलेशन (isolation) म्हणतात.


क्वारंटाईन म्हणजे काय?

क्वारंटाईन (quarantine) होणं म्हणजे इतरांपासून स्वत:ला लांब ठेवून वेगळं राहणं. संबंधित रुग्णापासून इतर कुणालाही संसर्ग होऊ नये म्हणून स्वत:ला एका खोलीत बंद करणं म्हणजेच क्वारंटाईन होणं.

उदाहरणार्थ चीन, इटली, अमेरिका आणि कोरोनाची साथ पसरलेल्या देशातून अनेक भारतीययेत आहेत. अशा एखाद्या ठिकाणहून एखादी निरोगी व्यक्ती आली. पण, त्याच्यामध्ये आजार आहे की नाही? किंवा तपासणी केली तरी सुरुवातीला नेगिटिव्ह येणं. पण हळूहळू नंतर कोरोनाची लक्षणं आढळून येणं. त्यामुळे अशा व्यक्तीला वेगळं ठेवलं जातं, त्यालाच क्वारंटाईन असं म्हणतात.


कुठून आला हा शब्द?

क्वारंटाईन हा मूळ लॅटीन शब्द आहे. ज्याचा अर्थ चाळीस आहे. पूर्वी बाहेरच्या देशाहून आलेल्या जहाजांना चाळीस दिवस बंदरापासून लांब ठेवलं जात होतं. जहाजावरील सर्व कर्मचा-यांची आरोग्य तपासणी होत असे. जहाज रोगमुक्त आहे, असं जाहीर केल्यावर त्या जहाजाला बंदरावर येण्याची परवानगी दिली जात होती. पुढे प्लेग, कावीळ, ताप, त्वचेचे रोग, अशा संसर्गजन्य आजारासाठी रुग्णांना क्वारंटाईन करण्याची व्यवस्था सुरू झाली.


क्वारंटाईन-आयसोलेशन का गरजेचं?

कोरोना व्हायरसच्या रुग्णांपासून इतर कुणालाही त्याची लागण होऊ नये यासाठी क्वारंटाईन केलं जातं. संसर्गजन्य आजारात रुग्णाच्या सोबत राहणाऱ्या व्यक्तींना आजार होण्याची शक्यता सर्वाधिक असते. तर रुग्णाच्या संपर्कात येणाऱ्या सगळ्यांनाच कोरोना व्हायरसपासून धोका आहे. कुटुंबियांपासून सहा फूट लांब राहण आवश्यक असतं.


क्वारंटाईन होण्यास सांगतल्यावर काय करायचं?

  • जर तुम्हाला ताप, खोकला,सर्दी अशी काही लक्षणं दिसून येत असतील तर सगळ्यात आधी डॉक्टरांना फोनवर संपर्क साधा.
  • क्वारंटाईन राहण्यासाठी सांगितल्यावर संबंधित व्यक्तीनं हवेशीर बंद खोलीत रहावं. शक्यतो एकटं रहावं, कुटुंब सदस्य असल्यास त्यानं १ मीटरपर्यंत अंतर ठेवणं गरजेचं आहे. शक्यतो स्वतंत्र शौचालय वापरावं.
  • घरात फिरण्यावर बंधनं घाला, कोणत्याही सार्वजनिक कार्यक्रमांना जाऊ नका.
  • सर्जिकल मास्क वापरावं, दर ६-८ तासानं सर्जिकल मास्क बदलावं.
  • मास्कचं विघटन करण्यासाठी बीच सोल्यूशन (५%) अथवा सोडियम हयपोक्लोराईट (५%) वापरून मास्क डिसइनफेक्ट करावं. नंतर ते जाळावं अथवा पुरावं, वापरलेलं मास्क हे संक्रमित असू शकतं.
  • केवळ डॉक्टरांनी परवानगी दिलेली व्यक्तीच क्वारंटाईन असलेल्या व्यक्तीशी संपर्क करू शकते.
  • क्वारंटाईन व्यक्तीचे कपडे वेगळे ठेवा. त्यांची खोली, शौचालय ब्लीच सोल्यूशन अथवा फेनॅलीक सोल्यूशननं साफ करा.

आजारी व्यक्तींचं आयसोलेशन केलं जातं. तर, क्वारंटाईन हे निरोगी व्यक्तीचं केलं जातं. संबंधित व्यक्तीला कोणत्याही प्रकारचा धोका उदभवू नये यासाठीच हे दोन्ही मार्ग अवलंबले जातात. त्यासाठी घाबरण्याचं कोणतंच कारण नाही. त्यामुळे कोरोनाग्रस्त संशयित रुग्णांनी पळून जाऊ नये किंवा कोरोनाच्या भिती घाबरू नये.  हेही वाचा

'या' ४ हॉटेलांमध्ये कोरोना उपचाराची सुविधा

कोरोना रुग्णांची ओळख लपवू नका, नावं जाहीर करण्याची मनसेची मागणी

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा