Advertisement

कोरोना उपचार केंद्रातील तब्बल ६७ टक्के खाटा रिकाम्या

दिवाळीपूर्वी रुग्णांच्या संख्येत वेगानं घट होऊ लागल्यामुळं कोरोना उपचार केंद्रातील तब्बल ६७ टक्के खाटा रिकाम्या आहेत.

कोरोना उपचार केंद्रातील तब्बल ६७ टक्के खाटा रिकाम्या
SHARES

मुंबईसह राज्यभरातील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला आहे. अशातच मुंबईकरांच्या सुरक्षेसाठी महापालिकेनं चाचण्यांची संख्याही वाढवली आहे. विषेश म्हणजे दिवाळीपूर्वी रुग्णांच्या संख्येत वेगानं घट होऊ लागल्यामुळं कोरोना उपचार केंद्रातील तब्बल ६७ टक्के खाटा रिकाम्या आहेत. एकूण १४,४६२ खाटांपैकी ९७३४ खाटा रिक्त आहेत.

महापालिकेच्या कोरोना उपचार केंद्रात एकूण १४४६२ खाटा उपलब्ध आहेत. त्यात अतिदक्षता विभागाच्या खाटा, कृत्रिम श्वसन उपकरणासह असलेल्या खाटा, प्राणवायूसह असलेल्या खाटा अशा विविध प्रकारच्या आरोग्य सुविधा असलेल्या खाटा आहेत. त्यापैकी काही खाटा खासगी रुग्णालयातील तर काही पालिकेच्या रुग्णालयातील आहेत.

महापालिकेच्या नियंत्रण कक्षातील खाटांच्या उपलब्धतेबाबतच्या फलकावरील माहितीनुसार, महापालिकेकडं सध्या असलेल्या खाटांपैकी ९७३४ खाटा रिक्त आहेत. मे व जून महिन्यात कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढल्यामुळं खाटा कमी पडू लागल्या होत्या. त्यामुळं रुग्णांना खाटा मिळवण्यासाठी वणवण फिरावं लागत होतं. म्हणून महापालिकेनं २४ विभागांमध्ये खाटांच्या उपलब्धतेची माहिती देण्यासाठी नियंत्रण कक्ष उभारलं होतं. त्यात महापालिकेच्या व खासगी रुग्णालयातील खाटांची माहिती अद्ययावत केली जात आहे.

नोव्हेंबर महिन्यापासून कोरोना रुग्णांची संख्या आटोक्यात आल्यामुळं मोठ्या संख्येनं खाटा रिकाम्या राहत आहेत. त्याचबरोबर ज्या रुग्णांची घरं मोठी आहेत त्यांना गृह अलगीकरणाची परवानगी दिली जात आहे. त्यामुळं मोठ्या संख्येनं कोरोना उपचार केंद्रातील खाटा रिकाम्या राहत आहे. मात्र, मुंबईतील ६० टक्के जनता झोपडपट्ट्यांमध्ये राहते, त्यामुळं अशा ठिकाणी कोरोनाचे रुग्ण वाढल्यास त्यांना या कोरोना उपचार केंद्रात दाखल करता येतं.

मुंबईत एकूण रुग्णांपैकी आतापर्यंत ९१ टक्के रुग्ण करोनामुक्त झाले आहेत. सध्या केवळ ८९४६ रुग्ण उपचाराधीन असून त्यापैकी ६२११ रुग्णांना कोणतीही लक्षणे नाहीत. तर २९३५ रुग्णांना लक्षणे आहेत. तर ६६१ रुग्ण गंभीर स्थितीत आहेत.

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा