राज्यात शनिवार १४ नोव्हेंबर २०२० रोजी २ हजार ७०७ नवे कोरोनाबाधित रूग्ण आढळले असून १०५ रुग्णांचा मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे. दिवसभरात ४ हजार २३७ जणांनी कोरोनावर मात केली आहे. यामुळे राज्याचा रिकव्हरी रेट ९२.४१ टक्के इतका झाला आहे. सध्यस्थितीत राज्यात ८५ हजार ५०३ अॅक्टिव्ह केसेस आहेत. आतापर्यंत ४५ हजार ९१४ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झालेला आहे.
दिवाळीत होणारी गर्दी आणि त्यानंतर थंडीच्या वातावरणात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढून दुसरी लाट येण्याची शक्यता तज्ज्ञांकडून वर्तवण्यात येत आहे. महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाच्या संचालक डॉ. अर्चना पाटील यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यात कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता वर्तवली आहे. एवढंच नाही, तर डॉ. अर्चना पाटील यांनी राज्यातील डॉक्टर, सरकारी रुग्णालये, जि्ल्हा रुग्णालये, आरोग्य अधिकाऱ्यांना पत्र लिहून कोरोनाच्या दुसऱ्या लाटेसाठी तयार राहण्याची सूचना केली आहे.
तर कोरोनाची दुसरी लाट आल्यास मुंबई महापालिका पूर्णपणे सज्ज असल्याचं महापालिका आयुक्त इक्बालसिंग चहल यांनी सांगितलं आहे. नागरिकांनी नियमावलीचं पालन केलं नाही तर कोरोनाचा धोका आणखी वाढेल. त्यामुळे लोकांनी मास्क, सॅनिटायझरसह सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे पूर्णपणे पालन करायला हवं. तसंच कोरोनाची दुसरी लाट आली तर ती थोपवण्यासाठी महापालिका प्रशासन सज्ज आहे. महापालिकेकडे सध्या पुरेसे बेड उपलब्ध आहेत.कोरोना रुग्णांची संख्या घटू लागली आहे. ही संख्या पुन्हा वाढू नये यासाठी नियमावलीची दिवाळीत कडक अंमलबजावणी करणार आहोत. मास्क न घालता फिरणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल, असं इक्बालसिंग चहल म्हणाले.