SHARE

नॅशनल कमिशन विधेयकाविरोधात डॉक्टरांनी यापूर्वीच एल्गार पुकारला आहे. याच पार्श्वभूमीवर आता इंडियन मेडिकल असोसिएशन (आयएमए)च्या डॉक्टरांनी सरकारचं वैद्यकीय क्षेत्राबाबतचं धोरण कसं चुकीचं आहे, हे दाखवून देण्यासाठी देशभरात ‘आयएमए यात्रा’ आणि ‘आयएमए सायकल रॅली’ काढण्याचा निर्णय घेतला आहे.


यासाठी काढली यात्रा

भारतातील डॉक्टरांची संघटना असलेल्या इंडियन मेडिकल असोसिएशनने दिलेल्या माहितीनुसार, आयएमएचे सर्व पदाधिकारी देशभरात जाणार आहेत. यादरम्यान तिथल्या प्रत्येक आयएमएच्या कार्यालयाला भेटी देतील. याचबरोबर सामन्यांसोबत बैठक आयोजित करून चर्चा देखील करतील. याशिवाय डॉक्टरांवर होणारे हल्ले आणि डॉक्टरांचा रुग्णांसाठीचा लढा यावर लक्ष केंद्रीत केलं जाईल. 


यात्रा कधी ते कधी?

डॉक्टरांची ही सायकल यात्रा २५ फेब्रुवारी ते २५ मार्च पर्यंत असणार आहे. ‘लोकांशी कनेक्ट व्हा, डॉक्टरांना संघटित करा’ ही यात्रेची घोषणा असणार आहे. ११ मार्चला देशभरातील आयएमएच्या १७०० कार्यालयातून सायकल रॅलीला सुरुवात केली जाईल.


विविध कार्यक्रमांचं आयोजन

तर, १२ मार्चला देशाच्या चार प्रमुख महानगरातून सायकल यात्रा सुरू होणार आहे. २५ मार्चला दिल्लीत सर्व डॉक्टर एकत्र येऊन डॉक्टरांची ‘महापंचायत’ आयोजित केली जाईल. आयएमएचे अध्यक्ष डॉ. रवी वानखेडकर प्रत्येक राज्यात स्वत: उपस्थित राहून यात्रेला हिरवा झेंडा दाखवतील. लोकांमध्ये जनजागृती करण्यासाठी विविध कार्यक्रमांचं आयोजन केलं जाणार आहे.


डॉक्टरांची सायकल-यात्रा काढणं याचं मुख्य कारण म्हणजे नॅशनल कमिशन विधेयक आहे. देशभरातून ४ ठिकाणांहून ही यात्रा २५ फेब्रुवारीला काढली जाणार आहे. कन्याकुमारी, मुंबई, चंडीगड-वागा बॉर्डर आणि पूर्वांचल अशा ४ कोपऱ्यातून ही यात्रा काढली जाणार असून याची सांगता दिल्लीत होणार आहे. नॅशनल कमिशन विधेयक हे फक्त डॉक्टरांच्याच विरोधातलं नाही तर, सामान्य माणसाच्याही विरोधातलं आहे. त्यामुळे सर्वच पातळीवर या बिलाचा निषेध केला जात आहे.

- डॉ. शिवकुमार उत्तुरे, अध्यक्ष, महाराष्ट्र मेडिकल काऊंसिल

संबंधित विषय
ताज्या बातम्या