मुंबईत रूग्ण दुप्पट होण्याचा कालावधी ९० दिवसांवर आला आहे. महापालिकेनं यासंदर्भात माहिती दिली. रूग्ण वाढीचा सरासरी दरही आणखी कमी होऊन सध्या ०.७८% झाला आहे. तर रूग्ण बरे होण्याची टक्केवारी ८०% झाली आहे. त्यामुळे ही मुंबईकरांसाठी ही नक्कीच दिलासादायक बातमी आहे.
मुंबईत २४ पैकी तब्बल ९ विभागात रूग्ण दुप्पट होण्याचा कालावधी १०० दिवसांच्यावर आहे. तर ५ विभागात ९० दिवसांवर, ४ विभागात ८० दिवसांवर, १ विभागात ७० दिवसांवर तर उर्वरीत ४ विभागात ६० दिवस असा रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी आहे. तर २४ पैकी १९ विभागात हा सरासरी दर 1% पेक्षा कमी आहे.
एम-ईस्ट (गोवंडी) मध्ये आता सर्वाधिक दुप्पट दर म्हणजे १३० दिवसांवर आहे. त्यानंतर एन (भांडुप) ११६, के पूर्व (अंधेरी ई) ११६, एल (कुर्ला) ११४, जी उत्तर (धारावी-माहीम- दादर) १०९, एन (घाटकोपर) १०७, बी (डोंगरी) १०4, जी दक्षिण (वरळी) १०3 आणि पी उत्तर (मालाड) १०१ वर आहे. अजूनही वाढीचा दर नोंदवणारे वॉर्ड आर-मध्यवर्ती आहेत. (बोरिवली) ५७ दिवसांनी आणि सी (काळबादेवी) आणि डी (मलबार हिल) दोन्हीकडे ६३ दिवसांवर आहे.
दरम्यान, देशात कोरोना रुग्ण बरे होण्याच्या यादीत ठाणे शहर दुसऱ्या स्थानावर तर राज्यात पहिल्या स्थानावर आले आहे. ठाणे शहरात कोरोना रुग्ण बरे होण्याचं प्रमाण ८९ टक्यांवर पोहोचले आहे. महाराष्ट्राचे रुग्ण बरे होण्याचं प्रमाण ७१ टक्के आहे.
आतापर्यंत ठाण्यात २३ हजार १ रुग्ण आढळून आले. त्यापैकी २१ हजार १३९ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. रुग्ण बरे होण्याचं प्रमाण ८९ टक्के इतकं जास्त असल्याचे दिसून येत आहे. शहरातील मृत्यू दर देखील कमी होऊन तो ३.२ टक्के झाला आहे. तर प्रत्यक्ष उपचार घेणाऱ्यांची संख्या १९४० आहे. येथील रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधीही १०२ दिवसांवर गेला आहे.
गेल्या काही दिवसांपासून राज्यातील अनेक भागातील रुग्णसंख्या कमी झाली आहे. मुंबईत बऱ्याच अंशी कोरोना बाधितांची संख्याही नियंत्रणात आणण्यात पालिकेला यश आलं आहे. त्यात पालिकेनं कोरोना रुग्णांच्या क्वारंटाईन नियमावलीत मोठा बदल केला आहे.
आता पालिकेनं क्वारंटाईनचे नियम बदलले असून ५० वर्षे आणि त्या पुढील वयाच्या कोरोनाबाधित रुग्णांना घरी विलगीकरणात राहता येणार नाही. या रुग्णांना कोणतीही लक्षणं नसली मात्र त्यांची टेस्ट पॉझिटिव्ह आली असेल तर त्यांना ccc2 म्हणजेच कोविड केअर सेंटरमध्ये रहावं लागणार आहे. तसंच अशा रुग्णांच्या घरी आणि इमारत किंवा चाळीच्या कॉमन जागांवर पालिकेकडून sanitization करण्यात येणार आहे. ५० ते ६० वर्षे वयोगटातील व्यक्तींचा मृत्युदर अधिक असल्यानं पालिकेनं हा निर्णय घेतला आहे.हेही वाचा