Advertisement

हे ड्रग्ज तुमची मुलंही घेत असतील!


हे ड्रग्ज तुमची मुलंही घेत असतील!
SHARES

बदलत्या जीवनशैलीत तरुणपिढीच्या सवयीही बदलल्या आणि त्यांच्या मागण्याही. आई-वडील हल्ली आपल्या पाल्याच्या हट्टापायी सगळ्याच गोष्टी अगदी सहजपणे पुरवतात. कधी-कधी आई-वडिलांना माहितही नसतं, की आपला मुलगा किंवा मुलगी कोणत्या गोष्टींच्या आहारी जात आहेत. मग, त्याचे परिणामही वाईट होतात.

चरस, गांजा, दारु, गुटखा असे पदार्थ बाजारात सहज उपलब्ध होतात. या सर्वांच्या जोडीला ड्रग्जचंही बाजारात सहज उपलब्ध होण्याचं प्रमाण वाढलं आहे.  त्यामुळे तरुणपिढी व्यसनाधीन होत चालली आहे. याच पार्श्वभूमीवर परळ येथील केईएम रुग्णालयात ड्रग्ज ट्रीटमेंट सेंटर सुरू करण्यात आलं. या केंद्रात दररोज उपचारासाठी येणाऱ्या तरुण-तरुणींची संख्या मोठी आहे.

दररोज जवळपास 15 ते 20 रुग्ण या केंद्रात उपचारासाठी दाखल होतात, अशी माहिती केईएम रुग्णालयाच्या मानसोपचार विभागाच्या प्रमुख डॉ. शुभांगी पारकर यांनी दिली आहे. म्हणजे, आधी बाजारात उपलब्ध होणाऱ्या ड्रग्जला कायद्याचा धाक होता. पण, आता नवीन व्यसनजन्य पदार्थ बाजारात उपलब्ध झाले आहेत, ज्यांना अजूनही कुठल्याच कायद्याची परवानगी नसून ते सर्रास विकले जातात.

तरुण पिढी फॅशन, आधुनिक जीवनशैलीच्या नावाखाली व्यसनाकडे ओढली जातेय. पण, ड्रग्समुळे हाणारे आजार शरीराला घातक ठरतात. यावर वेळीच उपाय करणे गरजेचे आहे. यासाठी व्यसनाधीन व्यक्तीची मानसिकता बदलणे आवश्यक आहे. त्यासाठी सरकारही या गोष्टीकडे सकारात्मकतेने पाहताना दिसून येत आहे.


सहज उपलब्ध होणाऱ्या ड्रग्जचे प्रकार

  • क्रिस्टल मेथ
  • मेफेड्रोन
  • केटामिन
  • सिंथेटिक कॅनाबिनोइड्स
  • कैनाबिनोइड्स
  • एमिनोइनडेन्स

बाजारात तर असे ड्रग्जचे प्रकार सहज उपलब्ध होतातच. पण, आता तर हे ड्रग्ज ऑनलाईनही उपलब्ध करुन देण्यात आले आहे.

मुलांना अशा ड्रग्जची सवय लागली की त्यांना त्यांचं दुखणं कमी झालेलं वाटतं. धुंदी चढते. काहीतरी नवीन करावसं वाटतं. ड्रग्जमुळे झालेली नशाही त्यांना हवीहवीशी वाटते.

आशिया, युरोप, अमेरिका, आफ्रिका, चीन या देशात अंमलीपदार्थांच्या सेवनाचे प्रमाण सर्वाधिक आहे. विशेष म्हणजे, युनायटेड नेशन्स ऑफिस ऑन ड्रग्ज अँड क्राईम (युएनओडीसी) या संस्थेने 2015 मध्ये सादर केलेल्या अहवालात जगभरात 600 नवीन व्यसनजन्य पदार्थ आहेत, असं सांगितलं होतं. पण, आता ती संख्या 10 हजारांहून अधिक असेल, अशी शक्यता वर्तवली जात आहे. ही अतिशय चिंतेची बाब आहे.


काही ड्रग्जची टोपण नावं

  • डिझायनर ड्रग्ज
  • स्पाईस
  • बाथसॉल्ट
  • स्पेशल के
  • हर्बल इनस्नेस
  • लिगल हाय

यातील बरेच ड्रग्ज कायद्यापासून बचावासाठी घरीच तयार केले जातात.


व्यसनाधीन व्यक्तींना व्यसनातून मुक्त करणे कठीण आहे. कारण, या व्यक्तींना फक्त व्यसन नसतं, तर व्यसन करणं असा मानसिक आजारही त्यांना होतो. त्यावरही उपचार करणं आवश्यक असतं. व्यसनामुळे मेंदूतील रसायनांमध्ये काही बदल होतात. त्यामुळे अशा व्यसनाधीन व्यक्तींनी व्यसन सोडलं, तरी पुन्हा-पुन्हा ते व्यसनाकडे वळतातच. या व्यक्तींना व्यसनातून बाहेर काढण्यासाठी मेंदूतील रसायन स्थिर करणं गरजेचं असतं. ड्रग्ज ट्रिटमेंट सेंटरमध्ये पहिल्यांदा आलेल्या व्यक्तीवर औषधोपचार केले जातात. त्यानंतर त्याच्यासह कुटुंबाचंही समुपदेशन केलं जातं.

डॉ. शुभांगी पारकर, मानसोपचार विभागप्रमुख, केईएम रुग्णालय

व्यसनाधीन व्यक्तींना व्यसनातून बाहेर काढण्यासाठी आरोग्य मंत्रालयाने काही सरकारी रुग्णालयांमध्ये उपचार केंद्रे सुरू केली आहेत. अंधेरीतील भरडावाडीत आणि घाटकोपरच्या राजावाडी रुग्णालयात ड्रग्ज ट्रिटमेंट सेंटर सुरू करण्यात आले आहेत. तसंच, लवकरच गोवा, गुजरात- सुरतमध्ये अशी केंद्रे सुरू करण्यात येणार आहेत.

केईएम रुग्णालयातील ड्रग्ज ट्रीटमेंट सेंटर प्रादेशिक असून फक्त ‘क्रिस्टल मेथ’ या नावाचं ड्रग्ज घेतलेल्या 70 ते 80 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. ज्याला ‘स्पीड मेथ’ही म्हणतात. तर, दररोज यात 15 ते 20 नवीन रुग्णांची भर पडत असल्याची चिंताही डॉ. पारकर यांनी व्यक्त केली आहे.


ड्रग्ज सेंटरमध्ये जवळपास 14 ते 18 वयोगटातील मुलं असतात. बऱ्याचदा पालकांना माहितही नसतं की मुलं ड्रग्जचं सेवन करतात. येणारी मुलंच असे ड्रग्ज कुठे मिळतात ते सांगतात. जेणेकरुन आम्हालाही कळतं की असे पदार्थ कुठे-कुठे सर्रास विकले जातात. नवीन आलेल्या ड्रग्जची नावे आपल्याला माहीत असतील. पण, त्यांच्यावर कायद्याचे कुठलेही निर्बंध नाहीत. 

डॉ. शुभांगी पारकर, मानसोपचार विभागप्रमुख, केईएम रुग्णालय


ड्रग्ज घेणाऱ्या मुलांची लक्षणे

  • शांत बसून रहाणे
  • उत्तेजना (Excitement) वाढते
  • वैचारिक, बौद्धिक क्षमतेवर परिणाम होतो
  • विचार करण्याची क्षमता कमी होणे



हेही वाचा

व्यसन आणि गैरसमज


डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी संबंधित प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा