Advertisement

चार महिन्यांची चिमुरडी, सहा हार्ट अटॅक आणि जगण्याची जबरदस्त जिद्द!


चार महिन्यांची चिमुरडी, सहा हार्ट अटॅक आणि जगण्याची जबरदस्त जिद्द!
SHARES

देव तारी त्याला कोण मारी असं म्हणतात ते काही खोटं नाही. याचाच प्रत्यय नुकताच मुंबईच्या वाडिया रुग्णालयात पहायला मिळाला. कल्याणमध्ये राहणाऱ्या चार महिन्याच्या विदिशाचं १४ मार्चला हार्टचं गुंतागुंतीचं असं ऑपरेशन झालं. ऑपरेशन झाल्यानंतर तिला तब्बल ६ वेळा हार्ट अॅटॅक आला. तरी देखील ती आता सुखरूप आहे. खरंतर हा दैवी चमत्कारच म्हणावा लागेल. परळच्या वाडिया हॉस्पिटलमधील डॉक्टरांच्या अथक प्रयत्नांना यश आलं आणि त्या चिमुरडीचा जीव वाचला. ती आता पूर्णपणे बरी झाली असून, शुक्रवारी सकाळी तिला घरी सोडण्यात आले.कल्याणमध्ये राहणारे विशाखा आणि विनोद वाघमारे हे दाम्पत्य. चार महिन्यांपूर्वी त्यांना मुलगी झाली. गरीब कुटुंबात जन्मलेल्या विदिशाला जन्मानंतर अवघ्या दोन महिन्यांतच हृदयविकार असल्याचे निदान झाले होते. 14 मार्चला तिच्यावर शस्त्रक्रिया देखील करण्यात आली होती. विशेष म्हणजे तिच्या रक्तवाहिनीच्या संक्रमणात अडथळा निर्माण झाला. यामुळे तिच्या शरीरात 60 टक्के आॅक्सिजनची कमतरता भासू लागल्याने तिचे शरीर निळे होत गेल्याचे वाडिया रुग्णालयातील बालहृदयरोगतज्ज्ञ डॉ. बिस्वा पांडा यांनी सांगितले.

तसेच, तिच्या उपचारांमध्ये दिरंगाई झाल्याने फुप्फुसांच्या कार्यातही दोष निर्माण झाला होता. डॉ. पांडा यांनी सांगितले की, तिच्या हृदयावर करण्यात आलेल्या शस्त्रक्रियेला तब्बल 12 तास लागले. त्यानंतर आॅक्सिजनची पातळी नियंत्रणात आणण्यासाठी तिला ‘हाय फ्रिक्वेन्सी आॅसिल्लोट्री’ व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले. तिच्या फुप्फुसाचा त्रास कमी झाल्यानंतर हे व्हेंटिलेटर काढण्यात आले.शस्त्रक्रियेपूर्वी अतिदक्षता विभागात दाखल असताना एक महिना विदिशाची प्रकृती अस्थिर आणि नाजूक होती. त्यावेळी तिला हृदयविकाराचे सहा झटके आले. मात्र तिच्या जगण्याच्या जिद्दीमुळे ती यशस्वीपणे त्या परिस्थितीतून बाहेर पडली, असे डॉ. पांडा यांनी सांगितले. विदिशा 50 दिवस अतिदक्षता विभागात होती. त्यातील तब्बल 40 दिवस तिला व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा