Advertisement

१८ ते ४५ वयोगटातील नागरिकांना मोफत लस, ठाकरे सरकारची घोषणा

१ मेपासून लसीकरण केंद्रांवर लसीचा तुटवडा भेडसावणार नाही, यासाठी अधिकाधिक लशींचे डोस उपलब्ध होण्यासाठी जागतिक निविदा काढण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला.

SHARES

राज्यात १८ ते ४५ वयोगटातील नागरिकांचं मोफत लसीकरण केलं जाणार आहे. रविवारी राज्य सरकारने ही घोषणा केली आहे. १ मे पासून १८ वर्षापुढील नागरिकांना कोरोनाची लस दिली जाणार आहे. 

ठाकरे सरकारने लसीकरण मोहिमेवर लक्ष केंदीत केलं आहे. १ मेपासून लसीकरण केंद्रांवर लसीचा तुटवडा भेडसावणार नाही, यासाठी अधिकाधिक लशींचे डोस उपलब्ध होण्यासाठी जागतिक निविदा काढण्याचा निर्णय राज्य सरकारने शनिवारी घेतला. मात्र १८ ते ४५ या वयोगटातील व्यक्तींना मोफत लस मिळणार का? असा प्रश्न विचारला जात होता. अखेर राज्य सरकारने या वयोगटातील नागरिकांचं मोफत लसीकरण करणार असल्याची घोषणा केली.

राज्याचे अल्पसंख्याक मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी माध्यमांशी बोलताना या निर्णयाची घोषणा केली. मलिक म्हणाले, महाराष्ट्र सरकारच्या वतीने राज्यातील १८ ते ४५ वयोगटातील प्रत्येकाला मोफत लस दिली जाणार आहे. सरकार आपल्या तिजोरीमधून हा कार्यक्रम हातात घेणार आहे. जागतिक टेंडर मागवण्यात येईल आणि जास्तीत जास्त लस खरेदी केल्या जातील. कॅबिनेट बैठकीमध्ये याविषयी चर्चा झाली आणि एकमत झाल्यानंतर राज्यातील जनतेला मोफत लस देण्याचा निर्णय घेण्यात आला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी याला होकार दिला आहे. मोफत लसीकरणासाठी लवकरात लवकर टेंडर काढण्यात येणार आहे.

कोविडशिल्ड लस केंद्राला दीडशे रुपये, राज्याला ४०० रुपये आणि खाजगी रुग्णालयांना ६०० रुपयाला मिळणार आहे. कोवॅक्सिनची किंमत सुद्धा राज्यांना ६०० रुपये व खाजगी विक्रीसाठी १२०० रुपये अशी जाहीर करण्यात आली आहे, असं नवाब मलिक यांनी सांगितलं.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा