Advertisement

मंत्रालयातील आपत्कालीन वैद्यकीय उपचार कक्षाची आरोग्यमंत्र्यांकडून पाहणी


मंत्रालयातील आपत्कालीन वैद्यकीय उपचार कक्षाची आरोग्यमंत्र्यांकडून पाहणी
SHARES

मंत्रालयीन अधिकारी, कर्मचारी यांच्या आरोग्य तपासणीसाठी मंत्रालयात आपत्कालीन वैद्यकीय कक्ष सुरू करण्यात आला आहे. बुधवारी आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी मंत्रालयाला भेट देत या आरोग्य कक्षाची पाहणी केली आणि उपलब्ध औषध साठ्याचीही माहिती घेतली. मंत्रालयात वैद्यकीय आणीबाणीची परिस्थिती निर्माण झाल्यास तशी सोय याठिकाणी आहे की नाही याचा आढावाही डॉ. सावंत यांनी घेतला.


औषधांसाठी विशेष निधी

शिवाय, आपत्कालीन परिस्थितीत गोल्डन अावरमध्ये उपचार मिळावे, यासाठी मंत्रालय दवाखान्याकरता शेड्यूल ड्रग व्यतिरीक्त बाहेरून आणायच्या अत्यावश्यक औषधांसाठी विशेष निधी उपलब्ध करून देणार असल्याचं आरोग्यमंत्र्यांनी सांगितलं.

त्याचबरोबर मंत्रालयाच्या प्रांगणात आपत्कालीन वैद्यकीय उपचारासाठी जागा देण्याबाबत मागणी करणार असल्याचं त्यांनी सांगितलं. यामुळे भविष्यात मंत्रालयात वैद्यकीय आणीबाणी उद्भवल्यास तातडीचे उपचार करणे शक्य होईल.


आरोग्यमंत्र्यांनी घेतली दखल

मंत्रालयातील अधिकारी-कर्मचारी आणि तिथे येणारे अभ्यागत यांना बऱ्याचदा वैद्यकीय उपचाराच्या आणीबाणीला सामोरे जावं लागतं. जर, रुग्णाला आपत्कालीन परिस्थितीत प्राथमिक उपचार मिळाले तर त्याला जीवदान मिळू शकतं. मंत्रालयाच्या दवाखान्यात सध्यातरी अशी सोय नाही. याची दखल घेऊन आरोग्यमंत्र्यांनी या कक्षाला भेट देऊन पाहणी केली आणि तातडीच्या उपचारांची सुविधा निर्माण होण्याबाबत सकारात्मकता दर्शवली.


रक्तदाब, छातीत दुखू लागल्याच्या तक्रारी घेऊन किंवा विषबाधा, हृदयविकाराच्या रुग्णांना यावर तातडीचा प्राथमिक उपचार म्हणून देण्यात येणाऱ्या औषधांच्या उपलब्धतेसाठी विशेष निधी तातडीने देऊ
- डॉ. दीपक सावंत, आरोग्यमंत्री

याचबरोबर त्यांनी अशा औषधांची यादी देण्याची सूचना वैद्यकीय अधिकारी डॉ. देशपांडे यांना दिली. या कक्षात ट्रॉप टी, ईसीजी चाचण्यांची सुविधा करणार असल्याचंही त्यांनी सांगितलं.

मंत्रालयाच्या मागील बाजूस असलेल्या वाहनतळाजवळ १൦८ क्रमांकाच्या आपत्कालीन रुग्णवाहिकेसाठी जागा दिली आहे. त्याची देखील पाहणी आरोग्यमंत्र्यांनी केली. या जागेचा वापर आपात्कालीन उपचाराच्या सुविधेकरीता करता येईल का? याबाबत विचार करून तशी मागणी करण्यात येईल, असं डॉ. सावंत यांनी सांगितलं.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा