Advertisement
COVID-19 CASES IN MAHARASHTRA
Total:
59,17,121
Recovered:
56,54,003
Deaths:
1,12,696
LATEST COVID-19 INFORMATION  →

Active Cases
Cases in last 1 day
Mumbai
15,390
575
Maharashtra
1,47,354
9,350

मुंबईतील साचलेल्या पाण्यातून चालल्यास होऊ शकतो 'हा' आजार; महापालिकेकडून महत्त्वाच्या सूचना जारी

मुंबईत जास्तीचा पाऊस झाल्यास मुंबईची तुंबई होते. अनेक सखल भागांत पाणी साचतं. पण हे साचलेलं पाणी मुंबईकरांच्या जीवावर बेतण्याची शक्यता आहे.

मुंबईतील साचलेल्या पाण्यातून चालल्यास होऊ शकतो 'हा' आजार; महापालिकेकडून महत्त्वाच्या सूचना जारी
SHARES

मुंबईत जास्तीचा पाऊस (mumbai rains) झाल्यास मुंबईची तुंबई होते. अनेक सखल भागांत पाणी साचतं. पण हे साचलेलं पाणी मुंबईकरांच्या जीवावर बेतण्याची शक्यता आहे. कारण या साचलेल्या पाण्यातून चालल्यास अनेक आजार होण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे 'लेप्टोस्पायरा' आजार होण्याची शक्यता अधिक असते. त्यामुळं मुंबई महानगरपालिकेनं (bmc) याबाबत महत्त्वाच्या सूचना जारी केल्या आहेत.

मुंबईकरांनी पावसाळ्यात साचलेल्या पाण्यातून चालण्याआधी या सूचना वाचणं गरजेचं आहे. मुंबईत ९ जून २०२१ रोजी पाऊस झाला आहे. यादरम्यान संथगतीने निचरा होत असलेल्या पाण्यातून प्रवास करताना अगर चालताना ‘गम बूट’ वापरण्याची खबरदारी न घेता चालल्यास अशा व्यक्तींना लेप्टोचा (Leptospirosis) संसर्ग होण्याची शक्यता असते.

ज्या व्यक्तींच्या शरीरावरील जखम किंवा खरचटलेल्या भागाचा अशा पाण्याशी संपर्क आला असेल, त्या व्यक्तींना लेप्टोचा संसर्ग होण्याचा अधिक धोका असतो. त्यामुळेच पावसाच्या पाण्याशी संपर्क आलेल्या व्यक्तींनी २४ ते ७२ तासांच्या आत वैद्यकीय सल्ला घेऊन प्रतिबंधात्मक औषधोपचार करणे (Preventionary Medication) आवश्यक आहे, अशी अत्यंत महत्त्वाची सूचना महापालिकेच्या कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. मंगला गोमारे यांनी केली आहे.

अतिवृष्टी दरम्यान पावसाच्या साचलेल्या किंवा वाहत्या पाण्यातून नागरिकांना चालावे लागते. याच पाण्यात ‘लेप्टोस्पायरोसिस’ या रोगाचे ‘लेप्टोस्पायरा’ (स्पायराकिट्स) या सूक्ष्मजंतूचा प्रादूर्भाव असू शकतो. उंदीर, कुत्रे, घोडे, म्हशी इत्यादी प्राण्यांच्या लघवीद्वारे (मूत्रातून) लेप्टोचे सूक्ष्मजंतु पावसाच्या पाण्यात संसर्गीत होतात. अशा बाधीत झालेल्या पाण्याशी माणसाचा संपर्क आल्यास त्याला लेप्टोची बाधा होण्याची शक्यता असते.

व्यक्तीच्या पायाला किंवा शरीराच्या कोणत्याही भागाला जखम असेल, अथवा साधे खरचटलेले जरी असेल; तरी अशा छोट्याश्या जखमेतून सुद्धा लेप्टोचे जंतू माणसाच्या शरीरात प्रवेश करतात. त्यामुळे ज्या व्यक्तींचा पावसाच्या पाण्याशी संपर्क आला असेल, त्यांनी तातडीने वैद्यकीय सल्ल्यानुसार प्रतिबंधात्मक औषधोपचार करावेत, असेही आवाहन डॉ. गोमारे यांनी केले आहे.

आरोग्य खात्यानं दिलेल्या महत्त्वाच्या सूचना :

 • ज्या व्यक्ती पावसाच्या ‌साचलेल्या पाण्यातून एकदाच चालल्या असून ज्यांच्या पायावर किंवा पाण्याशी संबंध आलेल्या शरीराच्या भागावर जखम नसेल अशा व्यक्ती लेप्टोच्या अनुषंगाने ‘कमी जोखीम’या गटात मोडतात. डॉक्टरांनी या व्यक्तींची आवश्यक ती तपासणी केल्यानंतर ‘डॉक्सीसायक्लीन’ (२०० मिलीग्रॅम) या कॅप्सूलचे एकदा सेवन करावयास सांगावयाचे आहे.
 • ज्या व्यक्ती साचलेल्या पाण्यातून चालल्या असून त्यावेळी ज्यांच्या पायावर किंवा पाण्याशी संबंध आलेल्या शरीराच्या भागावर जखम होती, अशा व्यक्ती लेप्टोच्या अनुषंगाने ‘मध्यम जोखीम’या गटात मोडतात. डॉक्टरांनी या व्यक्तींची आवश्यक ती तपासणी केल्यानंतर ‘डॉक्सीसायक्लीन’ (२०० मिलीग्रॅम) या कॅप्सूलचे दररोज एक वेळा याप्रमाणे सलग 3 दिवस सेवन करावयास सांगावयाचे आहे.
 • ज्या व्यक्ती पावसाच्या साचलेल्या पाण्यातून एका पेक्षा अधिक वेळा चालल्या किंवा ज्यांनी साचलेल्या पाण्यात काम केले आहे (उदाहरणार्थ: बचाव कार्य करणारे पालिका कर्मचारी), अशा व्यक्ती लेप्टोच्या अनुषंगाने ‘अतिजोखीम’ या गटात मोडतात. डॉक्टरांनी या व्यक्तींची आवश्यक ती तपासणी केल्यानंतर ‘डॉक्सीसायक्लीन’ (२०० मिलीग्रॅम) या कॅप्सूलचे आठवड्यातून एक वेळा याप्रमाणे सलग ६ आठवडे सेवन करावयास सांगावयाचे आहे.
 • गरोदर स्त्रिया व ८ वर्षाखालील बालकांना डॉक्सीसायक्लीन देऊ नये. त्याऐवजी गरोदर स्त्रियांना ५०० मिलीग्रॅम ऍझिथ्रोमायसिन टॅब्लेट, तर ८ वर्षाखालील बालकांना २०० मिलीग्रॅम ऍझिथ्रोमायसिन सिरपवरील तपशीलानुसार द्यावयाचे आहे.
 • प्रतिबंधात्मक औषधोपचार हे केवळ डॉक्टरांच्या सल्ल्यानेच करणे गरजेचे आहे.

‘लेप्टोस्पायरोसिस’ विषयी माहिती

 • ‘लेप्टोस्पायरोसिस’ हा रोग ‘लेप्टोस्पायरा’ (स्पायराकिटस) या सूक्ष्मजंतुमुळे होतो. उंदीर, कुत्रे, घोडे, म्हशी, बैल तसेच इतर काही प्राणी या रोगाचे स्रोत आहेत.
 • बाधित प्राण्यांच्या लघवीद्वारे संसर्गित झालेल्या पाण्याशी संबंध येताच मनुष्याला ‘लेप्टोस्पायरोसिस’या रोगाची बाधा होऊ शकते. निरनिराळ्या प्रकारची जनावरे सदर सूक्ष्मजंतुचे वाहक असतात. पण त्यांच्यात सदर रोगाची लक्षणे दिसून येत नाहीत.
 • मनुष्यापासून मनुष्याला लेप्टोच्या संसर्गाची बाधा होत नाही.
 • शहरी विभागात लेप्टोस्पायरा हे सूक्ष्मजंतु उंदीर, कुत्रे इत्यादी प्राण्यांमध्ये आढळतात. संसर्गित जनावरांच्या मुत्राद्वारे दूषित झालेले पाणी वा माती यामार्फत मनुष्याला संसर्ग होतो. हा संसर्ग जखम झालेली त्वचा, डोळे, नाक याद्वारे होतो.
 • पावसाळ्यात व पूर आल्यानंतर किंवा अतिवृष्टी झाल्यानंतर लोकांना दूषित पाण्यातून चालावे लागले, तर शरीरावरील जखमांमधून या रोगाचे जंतू आपल्या शरीरात प्रवेश करु शकतात.
 • पावसाळ्यात कोणताही ताप डेंग्यु, मलेरिया अथवा ‘लेप्टोस्पायरोसिस’ असू शकतो. त्यामुळे तापाकडे दुर्लक्ष न करता त्वरीत डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.
 • पायावर जखम असल्यास साचलेल्या पाण्यातून ये-जा करणे टाळावे किंवा गमबुटाचा वापर करावा.
 • साचलेल्या पाण्यातून चालून आल्यावर पाय साबणाने स्वच्छ धुवून कोरडे करावे.
 • साचलेल्या पाण्यातून चालल्यामुळे ‘लेप्टोस्पायरोसिस’ संसर्ग होण्याची शक्यता असते त्यामुळे डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार ‘लेप्टोस्पायरोसिस’ प्रतिबंधात्मक उपचार तातडीने घेणे आवश्यक आहे.
 • ‘लेप्टोस्पायरोसिस’ हा एक गंभीर आजार असून वेळीच औषधोपचार न केल्यास तो प्राणघातक ठरू शकतो. त्यामुळे याबाबत वेळीच प्रतिबंधात्मक औषध उपचार करणे गरजेचे आहे.
 • ताप आल्यास त्वरीत डॉक्टरांचा सल्ला घ्या.
 • पुरेशी विश्रांती, पोषक आहार व वेळेत उपचार घ्यावा.
 • उंदीर- घुशींचा नायनाट करावा. उंदीर नियंत्रणासाठी उंदराला अन्न मिळू न देणे, उंदराचे सापळे रचणे, त्याला विष घालणे इत्यादी मार्ग तज्ज्ञांच्या मार्गदर्शनानुसार वापरात आणावे.
 • घरात व आजुबाजूला कचरा साठणार नाही, याची दक्षता घ्यावी व कच-याची नियमितपणे विल्हेवाट लावावी.
 • आपल्या घरातील पाळीव प्राण्यांचे लेप्टो प्रतिबंधात्मक लसीकरण व इतर आवश्यक ते लसीकरण पशुवैद्यकांच्या सल्ल्यानुसार वेळच्या-वेळी व नियमितपणे करवून घ्यावे.हेही वाचा -

Read this story in English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा