हिवाळ्यामध्ये इन्फ्लूएंझाच्या रुग्ण संख्येत होणारी वाढ लक्षात घेऊन केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने नागरिकांना ‘सदर्न हेमीस्फिअर क्वॉड्रीवॅलेंट 2024’ (SHQ24) ही लस घेण्याचे निर्देश दिले आहेत.
ही लस (vaccine) चार प्रकारच्या इन्फ्लूएंझापासून संरक्षण करत असल्याने या लशीचा वापर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. असे असले तरी ही लस उपलब्ध नसल्यास सध्या उपलब्ध असलेली गुणकारी लस नागरिकांना देण्यात यावी, असेही केंद्र सरकारने स्पष्ट केले आहे.
भारतात (india) ऑगस्टपर्यंत 15 हजार जणांना इन्फ्लूएंझाची लागण झाली आहे. यातील 239 जणांचा मृत्यू झाला आहे. हिवाळ्यामध्ये यामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होण्याची शक्यता आहे. साधारणपणे इन्फ्लूएंझाचा सर्वाधिक त्रास हा 65 वर्षे व त्यावरील नागरिकांना होतो.
वृद्ध आणि आजारी लोकांच्या संपर्कात सातत्याने येणाऱ्या व्यक्ती, गर्भवती महिला, लहान मुले तसेच आरोग्य क्षेत्रात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना ही लस घेणे आवश्यक आहे. इन्फ्लूएंझा हा संसर्गजन्य आजार असल्याने त्याचा प्रसार वेगाने होतो.
हिवाळ्यामध्ये एच1एन1 (H1N1) च्या विषाणूसाठी (virus) पोषक वातावरण असल्याने या इन्फ्लूएंझाचा प्रसार अधिक होतो. त्यामुळे त्याला आळा घालण्यासाठी जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) ही लस घेण्याची शिफारस केली आहे. भारतामध्ये या लशीची किंमत नियंत्रित नसल्याने प्रति डोस 1800 ते 2000 रुपये नागरिकांना मोजावे लागतात.