एक स्त्री अशीही..परिचारिका

  Mumbai
  एक स्त्री अशीही..परिचारिका
  मुंबई  -  

  दरवर्षी 12 मे हा दिवस जागतिक परिचारिका दिन म्हणून साजरा केला जातो. रुग्णांची  काळजी घेण्याचं कार्य परिचारिका करत असतात. रुग्णांना बरं वाटावं यासाठी परिचारिका अहोरात्र झटत असतात. रुग्णाला चांगल्याप्रकारे हाताळणे हा परिचारिकेचा एक वेगळा गुण असतो. आधुनिक नर्सिंग क्षेत्राचा पाया घालणाऱ्या तसेच 'द लेडी वुइंग द लॅप' म्हणून सन्मान मिळालेल्या जगातील पहिली नर्स फ्लोरेन्स नाईटिंगेल यांचा हा जन्मदिवस.

  फ्लोरेन्स नाईटिंगेल यांचा 12 मे 1820 साली इटलीत जन्म झाला होता. दुसऱ्या महायुद्धाच्या काळात जखमी झालेल्या सैनिकांवर फ्लोरेन्स यांनी प्रथमोपचार केला होता. त्यांच्याप्रमाणेच इतर महिलांना रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्यासाठी त्यांनी 1960 साली लंडनमध्ये पहिल्या नर्सिंग स्कूलची स्थापना केली. त्यामुळे आज परिचारिकांना महत्त्वाचे स्थान प्राप्त झाले आहे.

  कुठल्याही रुग्णालयात शासकीय किंवा खासगी असो, परिचारिकांची अत्यंत महत्त्वाची भूमिका असते. रुग्ण उपचार घेण्यासाठी रुग्णालयात दाखल झाल्यापासून ते त्याला डिस्चार्ज मिळेपर्यंत परिचारिका रुग्णाच्या सेवेत असते. रुग्णाला प्रत्यक्ष डॉक्टरांनी उपचार देण्याआधी परिचारिका त्याला उपचार देते.

  पण या परिचारिकांच्या समस्येत वाढ होताना दिसत आहे. आजही खासगी रुग्णालयांमध्ये किमान वेतन कायदा लागू झालेला नाही. त्यामुळे या परिचारिकांना तुटपुंज्या पगारावर काम करावे लागते. इतकेच नाही तर त्यांना अजूनही कायद्याने संरक्षण मिळालेलं नाही. अनेकदा त्यांना रुग्ण, डॉक्टरांकडून शारीरिक, मानसिक त्रास दिला जातो. रुग्णांची सेवा करणाऱ्या या परिचारिकांसमोर अनेक अडचणी असतानाही त्या रुग्णांच्या वेदनांवर मायेची फुंकर घालत असतात. रुग्णाने मदतीसाठी कधीही हाक मारली की, परिचारिका धावून जाते. याशिवाय तातडीच्या वेळी प्रसंगावधान दाखवून रुग्णाला योग्य ते प्रथमोपचार देण्याचीही जबाबदारी ती पार पाडते. म्हणूनच परिचारिका डॉक्टरांचा उजवा हात असते, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.

  त्यामुळे सरकारने परिचारिकांच्या प्रश्नांकडे आता तरी लक्ष दिले पाहिजे. त्यांना भेडसावणाऱ्या समस्यांचे निवारण झाले तरच, त्या रुग्णांची देखभाल चांगल्या पद्धतीने करू शकतील.

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.