Advertisement

डिसेंबरपर्यंत जम्बो कोरोना केंद्रे खुली राहणार पालिकेचा निर्णय


डिसेंबरपर्यंत जम्बो कोरोना केंद्रे खुली राहणार पालिकेचा निर्णय
SHARES

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकार व महापालिका प्रशासन विविध उपाययोजना करत आहेत. दरम्यान कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका नसला तरी खबरदारी म्हणून जम्बो करोना केंद्र डिसेंबरपर्यंत खुली ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

सध्याच्या कार्यरत जम्बो कोरोना केंद्रांमध्ये अनेक खाटा रिक्त असतानाही सोमय्या, मालाड आणि कांजूरमार्ग येथील कोरोना केंद्रे पूर्णपणे खासगी तत्त्वावर देण्याची तयारीही महापालिकेनं केलेली आहे. गणेशोत्सवानंतर मुंबईतील रुग्णसंख्या पुन्हा वाढेल, अशी भीती व्यक्त केली जात होती. परंतु तुलनेने करोना संसर्गाचा प्रादुर्भाव वाढलेला नाही.

परिणामी, सध्या कार्यरत असलेल्या वांद्रे-कुर्ला संकुलासह वरळीचे एनएससीआय, मरोळचे सेव्हन हिल्स, गोरेगावचे नेस्को, मुलुंड आणि भायखळ्याचे रिचर्डसन अण्ड क्रुडास या जम्बो करोना रुग्णालयातील ८० टक्के खाटा सध्या रिक्त आहेत. मात्र तरीही पालिका सोमय्या, मालाड आणि कांजूरमार्ग येथील जम्बो कोरोना केंद्रे सुरू करण्यावर ठाम आहे.

त्यातही ही केंद्रे पूर्णपणे खासगी तत्त्वावर देण्यासाठी पालिकेने निविदा मागवून कंपन्यांची निवडही केली आहे. यामुळे पालिकेच्या खांद्यावरील आर्थिक भार वाढणार आहे. इतर कोरोना केंद्राप्रमाणेच ही केंद्रे स्वत: चालविण्याऐवजी पालिका ती खासगी कंपन्यांना देण्याचा अट्टहास का करत आहे, असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे.

सध्या रुग्णसंख्या कमी असली तरी येत्या काळात दसऱ्यानंतर दिवाळी, नाताळ असे लागोपाठ असणाऱ्या सणांच्या काळात गर्दी वाढण्याची शक्यता असल्याचे कारण देत पालिकेने कार्यरत असलेली सर्व जम्बो रुग्णालये डिंसेंबरपर्यंत खुली ठेवण्याचा निर्णय घेतलेला आहे.

निर्बंध शिथिल केल्यानंतर रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ झालेली नाही, परंतु लागोपाठ असणारे सण आणि नुकत्याच सुरू झालेल्या शाळा, महाविद्यालये, सिनेमागृह, प्रार्थनास्थळे यामुळे संसर्गाचा प्रादुर्भाव वाढण्याचा धोका आहे. त्यामुळे सध्या जम्बो रुग्णालये बंद करण्याचा कोणताही विचार नाही. पुढील तीन महिने डिसेंबरपर्यंत ही रुग्णालये सुरूच राहतील.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा