Advertisement

रस्त्यावर उतरायचंच असेल तर.., मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना सुनावलं

कोरोनाचं वादळ रोखण्यासाठी आणि रुग्णवाढ थांबवण्यासाठी कुणी उपाय सांगत नाही, परंतु टीका मात्र करताना दिसतात.

रस्त्यावर उतरायचंच असेल तर.., मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना सुनावलं
SHARES

कोरोनाचं वादळ रोखण्यासाठी आणि रुग्णवाढ थांबवण्यासाठी कुणी उपाय सांगत नाही, परंतु टीका मात्र करताना दिसतात. रस्त्यावर उतरण्याची भाषा होते. परंतु आरोग्य कर्मचाऱ्यांच्या, सर्वसामान्य जनतेच्या मदतीसाठी, कर्ता हरवलेल्या कुटुंबाच्या सेवेसाठी रस्त्यावर उतरा, असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी विरोधकांना टोला हाणला.

मुख्यमंत्र्यांनी समाजमाध्यमांद्वारे राज्यातील जनतेशी थेट संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते. मुख्यमंत्र्यांनी आपल्या संवादात राज्यातील आरोग्यविषयक सुविधा, कोरोना रुग्णांची संख्या आणि राज्याची एकूण स्थिती याची माहिती राज्यातील जनतेला दिली. महाराष्ट्रात गुरूवार १ एप्रिल २०२१ पर्यंत ६५ लाख लोकांना कोरोना विषाणू प्रतिबंधक लस देण्यात आली आहे. लसीकरणात महाराष्ट्र देशात नंबर १ वर आहे. गुरूवारी एका दिवसात आपण ३ लाख लोकांना लस दिली. केंद्राने आपल्याला लसीचा पुरवठा वाढवला तर ही संख्या आपण दिवसाला ६ ते ७ लाख करू शकू इतकी क्षमता आपण विकसित केली आहे. त्यासाठी केंद्राकडे वाढीव लसीची मागणी केली असल्याची माहिती उद्धव ठाकरे यांनी दिली.

ते म्हणाले, कोरोना सुरु झाला तेव्हा राज्यात २ चाचणी प्रयोगशाळा होत्या त्यांची संख्या आपण आज ५०० वर नेली आहे. मुंबईत दरदिवशी ५० हजार चाचण्या होत आहेत तर महाराष्ट्रात १ लाख ८२ हजार चाचण्या. ही संख्या येत्या काही दिवसात २.५ लाख इतकी वाढवण्यात येणार आहे. एकूण चाचण्यांमध्ये ७० टक्के चाचण्या या आरटीपीसीआर चाचण्या आहेत. 

हेही वाचा- होम क्वारंटाईनसाठी बीएमसीची नवी नियमावली

रुग्णसंख्येत वाढ

जानेवारी फेब्रुवारी मध्ये मुंबईत  रोज ३५० च्या आसपास रुग्णसंख्या होती ती आज ८५०० वर गेली आहे. महाराष्ट्रात १७ सप्टेंबर २०२० ला ३ लाख सक्रिय रुग्ण होते आजही जवळपास तेवढेच आहेत. रोज ही संख्या झपाट्याने वाढत आहे. १७ सप्टेंबरला राज्यात ३१ हजार मृत्यू होते. दुर्देवाने त्यात वाढ होऊन आज ही संख्या ५४ हजारांवर गेली आहे. राज्यात १७ सप्टेंबरला सर्वाधिक २४ हजार ६१९ रुग्ण एका दिवशी निघाले होते. काल ही संख्या ४३ हजार १८२ गेली आज ती ४५ हजारापर्यंत जाण्याची शक्यता आहे. 

याच वेगाने रुग्णसंख्या वाढत राहिली तर आपण ज्या सुविधा निर्माण केल्या त्या कमी पडतील, आपण आरोग्य सुविधा उभ्या करू, ऑक्सिजन बेड्स, विलगीकरणाचे बेड्स्, व्हेंटिलेटर्स वाढवू पण डॉक्टर नर्सेस आणि इतर आरोग्य कर्मचारी कुठून आणायचे असा सवालही त्यांनी यावेळी केला.

परिस्थिती चिंताजनक

विलगीकरणासाठी राज्यात २ लाख २० हजार बेडस आहेत त्यातील १ लाख ३७ हजार ५४९ बेड भरल्या आहेत. आयसीयूचे राज्यात २० हजार ५१० बेड्स आहेत त्यातील ४८ टक्के बेड भरले आहेत. ऑक्सिजन सुविधा असलेले ६२ हजार बेड्स आहेत. त्यातील २५ टक्के बेड वापरात आहेत. राज्यात व्हेंटिलेटर्सची ९३४७ बेड्सची संख्या आहे तीही २५ टक्के वापरात आहे. कोरोना रुग्ण दिवसागणिक वाढत असून परिस्थिती चिंताजनक बनत असल्याचंही ते म्हणाले.

हेही वाचा- तर कडक निर्बंध लावावेच लागतील, मुख्यमंत्र्यांनी दिला २ दिवसांचा अल्टिमेटम!

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा