Advertisement

मुंबईत कोरोना नियंत्रणासाठी ‘डोअर टू डोअर’ तपासणी

कोरोना विषाणूच्या संसर्गावर नियंत्रण मिळवण्यासाठी राज्यभरातील स्वयंसेवक आता घरोघरी जाऊन तपासणी करणार आहेत. त्यासाठी ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ ही योजना २ टप्प्यांमध्ये राबवण्यात येणार आहे.

मुंबईत कोरोना नियंत्रणासाठी ‘डोअर टू डोअर’ तपासणी
SHARES

कोरोना विषाणूच्या संसर्गावर नियंत्रण मिळवण्यासाठी राज्यभरातील स्वयंसेवक आता घरोघरी जाऊन तपासणी करणार आहेत. त्यासाठी ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ ही योजना २ टप्प्यांमध्ये राबवण्यात येणार आहे. महिन्याभराच्या कालावधीत दोनवेळा स्वयंसेवक प्रत्येक कुटुंबाला भेट देणार असल्याची माहिती राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली.

ही मोहीम पहिल्या टप्प्यात १५ सप्टेंबर ते १० ऑक्टोबर आणि दुसऱ्या टप्प्यात १२ ऑक्टोबर ते २४ ऑक्टोबर या कालावधीत राबविण्यात येणार आहे. या मोहिमेअंतर्गत आरोग्य विभागाने नियुक्त केलेले स्वयंसेवक राज्यातील २ कोटी २५ लाख कुटुंबांपर्यंत घरोघरी जाऊन लोकांची ताप आणि ऑक्सिजन लेव्हल तपासणी, लोकांना आरोग्य शिक्षण आणि महत्त्वाचे आरोग्य संदेश देणे, संशयित कोरोना रुग्ण शोधणे व उपचारासाठी संदर्भ सेवा तसेच मधुमेह, हृदयविकार, किडनी विकार, लठ्ठपणा यासारखे आजार असणाऱ्या व्यक्तींना शोधून काढणे व उपचारासाठी संदर्भ सेवा इ. कामे करणार आहेत. ग्रामपंचायतीपासून महानगरपालिकेपर्यंत लोकप्रतिनिधींच्या सहभागातून व स्वयंसेवी संस्थांच्या सहकार्याने ही मोहीम राबवण्यात येणार आहे.

सर्वांना सहभागी करा

यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले की, चेस दि व्हायरस मोहिमेमुळे आपण या साथीला चांगले रोखलं. पूर्वी झोपडपट्टी व वसाहतीत वाढलेला प्रादुर्भाव आता उंच इमारती, मोठ्या सोसायट्या आणि उच्चभ्रू वस्तीत मोठ्या प्रमाणावर आढळत आहे. ८० ते ८५ टक्के रुग्ण या भागातून आहेत. मुंबईत ही मोहीम यशस्वीपणे राबविण्यासाठी सर्व लोकप्रतिनिधी, राजकीय पक्ष, नगरसेवक, स्वयंसेवी संस्था, गणेश मंडळे यांची मदत घ्या, त्यांना सहभागी करुन घ्या.

धारावी, वरळी पॅटर्नचं जागतिक पातळीवर कौतुक झाल्यानंतर आपली जबाबदारी अधिक वाढली आहे. ही वेळ कौतुक ऐकत बसण्याची नाही. गणपती उत्सवानंतर सणांची मालिका सुरु झाली आहे. हा काळ नववर्षापर्यंत आहे; हे लक्षात घेवून कोरोना साथ नियंत्रणाचं नियोजन करणं अपेक्षित आहे, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितलं.

हेही वाचा- कोरोना झाला म्हणून नाती तोडू नका!- राजेश टोपे

जम्बो सुविधा उत्कृष्ट

कोरोना ट्रॅकिंग ट्रेसिंग अधिक वेगाने वाढवावं लागेल. जंबो रुग्णालये तात्पुरती आहेत, या गैरसमजातूनही लोकांनी बाहेर यावं. डायलिसीस आयसीयूच्या सुविधा देण्याबाबतीतही मुंबई मागे राहिली नाही. आरोग्य हीच आताच्या घडीला प्राथमिकता आहे. परप्रांतीय मजूर परतत आहेत, त्यांच्यावरही लक्ष ठेवणं गरजेचं आहे. दिवसाला १००० किंवा ११०० रुग्ण सापडत असताना आपण या साथीच्या शिखरावर आहोत असं वाटत होतं. पण गेल्या दोन दिवसांपासून १९०० आणि १७०० रुग्ण सापडत आहेत. त्यामुळे पुढील दोन तीन महिने हे आव्हान आपल्याला अधिक समर्थपणे पेलायचं आहे हे निश्चित आहे, असं उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलं.

ऑक्सिजनची वाढती गरज

सध्या आपण मुंबईत आणखी ५ ते ६ हजार बेड्स उपलब्ध करून देऊ शकतो. पण पुढील काळात सुविधाही आणखी वाढवावी लागणार तसंच ऑक्सिजन बेड आणि आयसीयू बेडच्या नियोजनाची गरज आहे. ही वाढ अशीच राहिली तर बेड, ऑक्सिजनची कमतरता जाणवेल तशी वेळ येवू न देणं आपल्या सर्वांच्या हाती आहे. मुंबईतच नव्हे तर राज्यातील कोरोना रुग्णांना ऑक्सिजनची गरज लक्षात घेऊन राज्यात ऑक्सिजनचे उत्पादन वाढवून ते जास्तीतजास्त प्रमाणात वैद्यकीय कारणासाठी उपयोगात आणणं असे आदेश काढावे लागतील. ट्रेकिंग आणि ट्रेसिंग वाढवून एकेका रुग्णाचे २० नव्हे तर ३० संपर्क शोधणे आणि ४८ तासांच्या आता त्या हाय रिस्क संपर्काची चाचणी करणं खूप आवश्यक आहे.

कोविडपश्चात ओपीडी

कोविड पश्चात रुग्णांचे वर्गीकरण होणे अत्यंत महत्त्वाचं आहे, रुग्णांचा कोविडनंतरचा डेटा तयार केल्यास यावर नेमकी उपाययोजना राबविणे सोपे जाईल, कोरोनाकाळातील औषधोपचाराचे नेमके परिणाम मानवी शरीरावर कसे झाले आहेत, हे स्पष्ट होवून पुढील उपचारपद्धतीत सुधारणा करता येईल. रुग्णालये, प्रशसानाने त्यादृष्टीने पावले उचलावीत, अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या.

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा