Advertisement

कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता; राज्यातील रुग्णांच्या संख्येत वाढ

राज्यात रविवारी ५० करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून दिवसभरात ५ हजार ७५३ नवीन रुग्णांचे निदान झालं तर ४ हजार ६० रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत, अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता; राज्यातील रुग्णांच्या संख्येत वाढ
SHARES

मुंबईसह राज्यात गणेशोत्सवानंतर कोरोना (coronavirus) बधितांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाली. मात्र, महापालिकेच्या (bmc) आरोग्य विभागानं या प्रादुर्भावावर नियंत्रण मिळवत नागरिकांना दिलासा दिला. परंतु, सध्या थंडीचे दिवस सुरू असून, त्यात दिवाळीचा येऊन गेला त्यामुळं दिवाळीनंतर कोरोनाच्या रुग्णांच्या संख्येत पुन्हा वाढ होत आह. अशातच राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (cm uddhav thackeray) यांनी रविवारी रात्री जनतेशी संवाद साधत सतर्क राहण्याचा इशारा दिला. नागरिकांच्या हलगरजीपणामुळं राज्यात पुन्हा कोरोना वाढतो आहे. राज्यात रविवारी ५० करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून दिवसभरात ५ हजार ७५३ नवीन रुग्णांचे निदान झालं तर ४ हजार ६० रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत, अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे (health minister rajesh tope) यांनी दिली.

रविवारी कोरोनातून बरे होऊन घरी परतणाऱ्या रुग्णांच्या तुलनेत नव्यानं बाधित झालेल्या रुग्णांचा आकडा अधिक राहिला. ही बाब काहीशी चिंता वाढवणारी ठरली आहे. कोरोना रिकव्हरी रेटही गेल्या काही दिवसांपासून वाढलेला नसून, मृतांचा घटलेला आकडा ही मात्र दिलासा देणारी बाब ठरली आहे. राज्यात आणखी ५० रुग्ण कोरोनामुळं दगावले आहेत. त्यामुळं मृतांची एकूण संख्या ४६ हजार ६२३ इतकी झाली आहे.

रविवारी सर्वाधिक १९ मृत्यू मुंबई पालिका हद्दीत झाले तर नागपूर पालिका व जिल्ह्यात मिळून १२ रुग्णांचा मृत्यू झाला. पुणे पालिका व पुणे जिल्हा हद्दीत मिळून दिवसभरात ११ मृत्यू झाले. त्यात पिंपरी चिंचवड पालिका हद्दीत एकाही मृत्यूची नोंद नव्हती. ठाणे, पालघर, रायगड, नाशिक या जिल्ह्यांतही रविवारी कोरोनाचा एकही रुग्ण दगावला नाही. राज्यात आता कोरोना मृत्यूदर २.६२ टक्के इतका असून हे प्रमाण कमी करण्यासाठी आरोग्य यंत्रणा अहोरात्र राबत आहे.

राज्यात आणखी ४ हजार ६० रुग्ण कोरोनामुक्त झाले असून आतापर्यंत १६ लाख ५१ हजार ६४ रुग्णांनी या आजाराला मात देण्यात यश मिळवलं आहे. राज्यात रुग्ण बरे होण्याचं प्रमाण आता ९२.७५ टक्के इतकं झालं आहे. राज्यात आतापर्यंत १ कोटी २ लाख १३ हजार २६ कोरोना चाचण्या पूर्ण करण्यात आल्या असून, त्यातील १७ लाख ८० हजार २०८ चाचण्यांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.

सध्या अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या ८१ हजार ५१२ इतकी आहे. सध्या राज्यात ५ लाख १५ हजार ९७६ व्यक्ती होमक्वारंटाइनमध्ये आहेत तर ५ हजार ६१५ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत. मुंबईत कोरोनानं मृत्यू झालेल्यांची संख्या अधिक असून शुक्रवारपासून कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होण्याला पुन्हा सुरूवात झाली आहे. सलग दुसऱ्या दिवशी म्हणजे शनिवारी देखील मुंबईतील कोरोना बाधितांची संख्या १ हजाराच्यावर गेली आहे. शनिवारी १,०९२ रुग्ण आढळले, तर १७ जणांचा मृत्यू झाला.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा