'नॅनोकणां'द्वारे सापाच्या विषाच्या तीव्रतेवर अंकुश

मुंबई विद्यापीठाच्या जीवभौतिकशास्त्र विभागानं विशेष संशोधन करून सर्पदंशावर मात्रा ठरणारे 'नॅनोकण' चांदीपासून तयार केले आहेत. त्याबाबत काही प्राथमिक चाचण्याही पूर्ण झाल्या असून या चाचण्यांचे सकारात्मक परिणाम दिसले आहेत.

  • 'नॅनोकणां'द्वारे सापाच्या विषाच्या तीव्रतेवर अंकुश
SHARE

एकविसाव्या शतकातही आपल्याकडं केवळ ४ ते ५ प्रकारच्या सापांच्या विषावरील लस उपलब्ध असल्यानं या क्षेत्रात संशोधन होणं ही काळाची गरज आहे. ही गरज ओळखून मुंबई विद्यापीठाच्या जीवभौतिकशास्त्र विभागानं विशेष संशोधन करून सर्पदंशावर मात्रा ठरणारे 'नॅनोकण' चांदीपासून तयार केले आहेत. त्याबाबत काही प्राथमिक चाचण्याही पूर्ण झाल्या असून या चाचण्यांचे सकारात्मक परिणाम दिसले आहेत. याद्वारे सापाच्या विषाच्या तीव्रतेवर अंकुश लागण्यास मदत मिळणार आहे.


तीव्रता किती टक्क्यांनी कमी?

या 'नॅनोकणां'च्या विविध चाचण्या घेतल्या असता सापाच्या विषाची तीव्रता ९५ ते ९८ टक्क्यांनी कमी झाल्याचं दिसून आलं. हे संशोधन जपानमधील जीवभौतिकशास्त्रासंबंधीत जर्नलमध्ये प्रकाशित होणार असून, काही भाग 'टॅाक्सिकॉन' या संशोधन नियतकालिकात प्रसिद्ध होणार आहे. जीवभौतिकशास्त्र विभागाचे प्रमुख प्रा. प्रभाकर डोंगरे यांनी वृषाली हिंगणे आणि धनश्री पंगम या आपल्या विद्यार्थिनींच्या सहकार्याने हे संशोधन पूर्ण केलं आहे.


सर्पदंशामुळे मृत्यूचं प्रमाण किती?

सापाचे विष, त्याचे दुष्परिणाम व सर्पदंशावरील योग्य उपचार पद्धती यासंबंधी संशोधन क्षेत्रानं फारशी प्रगती केलेली नाही. हे क्षेत्र पूर्वीपासूनच फार दुर्लक्षित राहिलं आहे. जगभरात, विशेषत: उष्णकटिबंधीय प्रदेशात सर्पदंशानं मृत्यू होण्याचं प्रमाण ही सार्वजनिक आरोग्य समस्या बनली आहे.

विशेषत: ग्रामीण भागामध्ये साप चावून मृत्यू होण्याचं प्रमाण सर्वाधिक असून भारतात वर्षाला ५२ हजार जणांचा साप चावल्यानं मृत्यू होतो. साप चावल्यानंतर त्याचं विष संपूर्ण शरीरात पटकन पसरतं. दरम्यान सापाच्या विषाचा परिणाम कमी करण्यासाठी सध्या तरी ठोस उपाय उपलब्ध नसल्यानं हे विष मुख्यतः मेंदू, हृदय, स्नायू आणि रक्ताभिसरण संस्थांवर हल्ला करतं आणि त्यामुळे मृत्यू ओढवतो.


घोड्यापासून प्रतिजैविके

सापाच्या विषाच्या विरुद्ध काम करणारी प्रतिजैविके घोड्यापासून तयार करण्यात येतात. हे प्रतिजैविके घोड्याच्या रक्तामधून वेगळी करून सर्पदंशावरील उपाय म्हणून वापरली जातात. परंतु, काही वेळेस या प्रतिजैविकांचीच रुग्णावर प्रतिक्रिया होते व रुग्ण अधिक गंभीर होऊन त्याचा मृत्यूही ओढवतो. हे रोखण्यासाठीच जीवभौतिकशास्त्र विभागानं हे संशोधन हाती घेतलं होतं.या महत्त्वपूर्ण विषयावर गेल्या ५ वर्षांपासून संशोधन सुरू असून, त्यातून हाती आलेले प्राथमिक परिणाम खूपच विश्वसनीय आणि आशादायक आहेत. पुढील चाचण्या प्राण्यांवर घेण्यात येणार असून भविष्यात आणखी वैद्यकीय चाचण्या करण्यात येणार आहे. त्या पूर्ण झाल्यानंतर हे संशोधन खऱ्या अर्थाने सर्पदंशांच्या रुग्णांना उपयुक्त ठरणार आहे.
- प्रभाकर डोंगरे, प्रमुख, जीवभौतिकशास्त्र विभागहेही वाचा-

नायर रुग्णालयाविरोधात हायकोर्टात याचिका

३४३ औषधांवर केंद्राची बंदी; सिप्ला, वोखार्डसह बड्या कंपन्यांना झटकासंबंधित विषय
ताज्या बातम्या