Advertisement

रुग्णाला डिस्चार्ज देण्याआधी बिल पाठवा, नवी मुंबई पालिकेचा रुग्णालयांना आदेश

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत वाढती रुग्ण संख्या पाहून एप्रिलपासून कोविड बिल तक्रार निवारण कक्ष (Covid Bill Complaint Center) नवी मुंबई पालिकेने पुन्हा कार्यान्वित केला आहे

रुग्णाला डिस्चार्ज देण्याआधी बिल पाठवा, नवी मुंबई पालिकेचा रुग्णालयांना आदेश
SHARES

अनेक खाजगी कोविड रुग्णालये (private covid hospital) कोरोना (coronavirus) रुग्णांना अव्वाच्या सव्वा बील आकारत असल्याचं आढळून आलं आहे. याबाबतच्या अनेक तक्रारी करण्यात आल्या आहेत. या तक्रारींची नवी मुंबई पालिकेने (Navi Mumbai Municipal Corporation) दखल घेतली आहे.  रुग्णाला डिस्चार्ज देण्यापूर्वी ४८ तास आधी त्यांची वैद्यकीय बिलं पाठवा, असा आदेश नवी मुंबई पालिकेने आता रुग्णालयांना दिला आहे. 

कोरोनाच्या  दुसऱ्या लाटेत वाढती रुग्ण संख्या पाहून एप्रिलपासून कोविड बिल तक्रार निवारण कक्ष (Covid Bill Complaint Center) नवी मुंबई पालिकेने पुन्हा कार्यान्वित केला आहे. खाजगी कोविड रुग्णालयांमध्ये उपचार घेणाऱ्या रुग्णांकडून आकारण्यात येणाऱ्या बिलांच्या तक्रारी संदर्भातील मदतीसाठी पालिकेने कोविड बिल तक्रार निवारण कक्ष सुरू केला आहे. 

महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी पहिल्या लाटेप्रमाणे आताही खाजगी रुग्णालयांमधील १ एप्रिल ते ३० एप्रिल या कालावधीतील देयकांचे लेखा परीक्षण (Audit) करण्याचे निर्देश दिले आहेत. रुग्णांचा डिस्चार्ज होत असताना रुग्णालयांकडून ४८ तास आधी उपचाराचं संभाव्य बिल घेऊन त्याची पडताळणी करण्यासाठी विशेष लेखा परीक्षण पडताळणी समिती कार्यान्वित करण्याचे आदेश आयुक्तांनी दिले आहेत. 

महाराष्ट्र शासनामार्फत जारी करण्यात आलेल्या २१ मे २०२० रोजीच्या अधिसूचनेनुसार खाजगी रुग्णालयांनी रुग्णांवर होणाऱ्या उपचारांची बिलं आकारावयाची आहे असे आदेश महापालिका आयुक्त यांनी महानगरपालिका क्षेत्रातील सर्व रुग्णालये, नर्सींग होम, डिस्पेंसरीज यांना १८ ऑगस्ट २०२० रोजी बजावले होते. मात्र, काही रुग्णालयांकडून या आदेशाचे व शासन निर्णयाचे उल्लंघन करण्यात येऊन जास्तीचे दर आकारल्याच्या तक्रारी रुग्ण तसेच त्यांच्या नातेवाईकांकडून महापालिकेकडं करण्यात आल्या होत्या. याबाबत काही रुग्णालयांना कारणे दाखवा नोटिसा बजाविण्यात आल्या होत्या. त्यामधून अनेक रुग्णांना दिलासाही मिळाला.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेतही बिलाच्या तक्रार निवारणासाठी अतिरिक्त आयुक्त  यांच्या अध्यक्षतेखाली देयके पडताळणी लेखा परीक्षण समिती पुन्हा कार्यान्वित करण्याचे आदेश आयुक्तांनी दिले आहेत. याशिवाय कोविड उपचार करणाऱ्या रुग्णालयांनाही रुग्ण डिस्चार्ज होण्यापूर्वी ४८ तास आधी उपचारांचं बिल नवी मुंबई महानगरपालिकेच्या cbcc@nmmconline.com या इमेल आयडीवर पाठवण्याचे आदेश दिले आहेत. या बिलांची विशेष लेखा परीक्षण समितीने ४८ तासात पडताळणी करून त्याविषयीचे अभिप्राय आणि तपशील रुग्णालयांना कळवायचा आहे.

याशिवाय ४ रुग्णालयांसाठी १ अशाप्रकारे बिलांबाबत समन्वय राखण्यासाठी देयके समन्वय अधिकारी यांचीही नेमणूक करण्यात येत आहे. सदर समन्वय अधिकारी ४८ तासांनंतर डिस्चार्ज होणा-या रुग्णांच्या संभाव्य बिलांची माहिती रुग्णालयाकडून विशेष लेखा परीक्षण समितीकडे ई मेलव्दारे पाठविण्यात आली आहे का याची माहिती घेतील.  या कार्यवाहीसाठी तातडीने डॅशबोर्ड निर्माण करण्याचे निर्देशही आयुक्तांनी दिलेले असून जेणेकरून ४८ तासात लेखा परीक्षण होत असल्याबाबत नियंत्रण ठेवता येईल.

कोविडच्या पहिल्या लाटेतील ज्या रुग्णांच्या बिलांचा संबंधीत रुग्णालयांनी अद्याप परतावा दिला नसेल अशा रुग्णालयांना नोटीस बजाविण्याचे आदेशही आयुक्तांनी दिले आहेत. 



हेही वाचा - 

गुड न्यूज! १ जूननंतर लाॅकडाऊनच्या निर्बंधात शिथिलता येणार

  1. आरोग्य सेतूवर आले 'हे' नवीन फिचर, 'असे' ठरेल फायदेशीर
Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा