नवी मुंबईत कोरोना रुग्णांची संख्या रोज मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. त्यामुळे आरोग्य व्यवस्थेवर मोठा ताण आला आहे.  आयसीयू व व्हेंटिलेटर्स बेडसह सामान्य बेडची कमतरता आता भासत आहे. गंभीर रुग्णांना आयसीयू अथवा व्हेंटिलेटर्स बेड मिळणं मुश्कील होत आहे.  

आगामी काळात आणखी गंभीर परिस्थिती निर्माण होऊ नये म्हणून नवी मुंबई महापालिकेने बेड उपलब्ध करण्यावर भर दिला आहे. पालिकेने कामोठे येथील एमजीएम रुग्णालयाशी १०० आयसीयू व ४० व्हेंटिलेटर्स बेडचा करार केला आहे. याआधी डॉ. डी. वाय पाटील रुग्णालयाशी २०० आयसीयू व्हेंटिलेटर्स बेडचा करार करण्यात आला होता. 

नवी मुंबईत खासगी रुग्णालये व पालिका असे मिळून ४७७ आयसीयू बेड व १६३ व्हेंटिलेटर्स उपलब्ध आहेत.  नियमाप्रमाणे एकूण ऍक्टिव्ह पेशंटच्या संख्येनुसार ५ टक्के आयसीयू बेड उपलब्ध असणं गरजेचं आहे. शहरात खासगी व पालिका कोट्यातील मिळून ४७७ आयसीयू व व्हेंटिलेटर्स उपलब्ध आहेत. यातील २०० आयसीयू व ८० व्हेंटिलेटर्स डॉ. डी वाय पाटील रुग्णालयातील कोट्यातून उपलब्ध आहेत. हे बेड गंभीरवस्थेतील व पालिका क्षेत्रातील रुग्णांनाच प्राधान्याने मिळावेत यासाठी प्रयत्नशील आहे.

नवी मुंबईत सध्या ११ हजार ऍक्टिव्ह रुग्ण आहे. नियमानुसार ५ टक्के आयसीयू बेडची आवश्यकता आहे. त्यानुसार पालिकेला ५५० आयसीयू बेड व २६० व्हेंटिलेटर्सची गरज आहे. त्यातील २०० आयसीयू ८० व्हेंटिलेटर्स पालिकेकडे असल्याने पालिकेला आणखी ३५० आयसीयू व १४० व्हेंटिलेटर्स बेडची गरज भासत आहे. 

मागील वर्षी तत्कालीन आयुक्त मिसाळ यांनी सिडको एक्झिबिशन सेंटरमधील बेडचे ऑक्सिजन बेडमध्ये रूपांतर केले होते. त्यांनंतर आलेल्या आयुक्त बांगर यांनी त्यास गती दिल्याने पालिकेच्या आरोग्य व्यवस्थेवर अवलंबून असणाऱ्या सामान्य नागरिकांना ऑक्सिजन बेड उपलब्ध झाले होते. आयुक्त बांगर यांनी ऑक्सिजन बेडचे रूपांतर आयसीयू बेडमध्ये करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र कोरोनाचा कहर ओसारताच हे काम काहीसे संथगतीने सुरू होते. मात्र आता कोरोनाने कहर केलेला असतानाच आयुक्तांनी ऑक्सिजन बेडचे आयसीयू बेडमध्ये रूपांतर करण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या काही दिवसांत सिडको एक्झिबिशन सेंटरमध्ये आयसीयू बेड उपलब्ध झालेले पहायला मिळणार आहेत.



हेही वाचा - 

आणखी ३ नवी कोरोना केंद्रे लवकरच सुरू होणार

'या' वयोगटाला कोरोनाचा सर्वाधिक धोका