Advertisement

महाराष्ट्रात आरोग्य व्यवस्थेत मोठी सुधारणा होणार?

‘PRAGATI’ प्रकल्पाला राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी

महाराष्ट्रात आरोग्य व्यवस्थेत मोठी सुधारणा होणार?
SHARES

महाराष्ट्रातील सार्वजनिक आरोग्य व्यवस्था अधिक सक्षम, गुणवत्तापूर्ण, तंत्रज्ञानाधारित आणि नागरिककेंद्रित करण्यासाठी राज्य मंत्रिमंडळाने व्यापक आरोग्य सुधारणा प्रकल्प ‘PRAGATI’ला मंजुरी दिली आहे. 2026 ते 2031 या पाच वर्षांच्या कालावधीत हा प्रकल्प राबवण्यात येणार आहे.

या प्रकल्पाची सुधारित अंदाजित किंमत 4 हजार 250 कोटी रुपये आहे. त्यापैकी 2 हजार 975 कोटी रुपये आशियाई विकास बँकेकडून (ADB) कर्जाच्या स्वरूपात, तर 1 हजार 275 कोटी रुपये राज्य सरकारच्या निधीतून उपलब्ध करून दिले जाणार आहेत.

या प्रकल्पाची अंमलबजावणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली, तसेच सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर आणि राज्यमंत्री मेघना सकोरे-बोर्डीकर यांच्या मार्गदर्शनाखाली केली जाणार आहे.

प्राथमिक ते तृतीय स्तरावरील आरोग्य सेवा बळकट होणार

‘PRAGATI’ प्रकल्पांतर्गत प्राथमिक, माध्यमिक आणि तृतीय स्तरावरील आरोग्य संस्थांना एकात्मिक पद्धतीने सक्षम करण्यावर भर दिला जाणार आहे.

प्राथमिक आरोग्य केंद्रे, आयुष्मान आरोग्य मंदिरे, शहरी आरोग्य केंद्रे तसेच माध्यमिक आणि तृतीय स्तरावरील रुग्णालयांमध्ये आवश्यक उपकरणे, प्रशिक्षित मनुष्यबळ, औषधे आणि निदान सेवा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.

तसेच प्रभावी रेफरल आणि काउंटर-रेफरल व्यवस्था विकसित केली जाणार आहे. प्राथमिक स्तरावर रुग्णाची समस्या ओळखल्यानंतर त्याला वेळेत उच्चस्तरीय रुग्णालयात उपचारासाठी पाठवणे आणि उपचारानंतर स्थानिक आरोग्य संस्थांशी समन्वय साधणे यामुळे शक्य होणार आहे.

मधुमेह, कर्करोगासह असंसर्गजन्य आजारांवर भर

राज्यात वाढणाऱ्या असंसर्गजन्य आजारांवर (NCDs) या प्रकल्पात विशेष लक्ष केंद्रित करण्यात येणार आहे.

यामध्ये

  • उच्च रक्तदाब

  • हृदयरोग

  • स्ट्रोक

  • फुफ्फुसांचे दीर्घकालीन आजार

  • किडनीचे दीर्घकालीन आजार

  • मधुमेह

  • कर्करोग

यांसह मानसिक आरोग्य आणि पॅलिएटिव्ह केअर सेवांनाही प्राधान्य दिले जाणार आहे.

रोगांचे प्रतिबंध, तपासणी, लवकर निदान आणि वेळेत उपचार यावर भर देण्यात येणार आहे.

आरोग्य व्यवस्था होणार डिजिटल

आरोग्य सेवा अधिक कार्यक्षम, पारदर्शक आणि नागरिककेंद्रित करण्यासाठी ‘महाराष्ट्र हेल्थ टेक्नॉलॉजी मिशन’ अधिक बळकट करण्यात येणार आहे.

आयुष्मान भारत डिजिटल मिशनशी सुसंगत डिजिटल आरोग्य व्यवस्था विकसित केली जाणार असून त्यात—

  • ऑनलाइन रुग्ण नोंदणी

  • ओपीडी आणि आयपीडी व्यवस्थापन

  • डिजिटल लॅब रिपोर्ट

  • डिजिटल औषध वितरण

  • डिजिटल प्रिस्क्रिप्शन

  • रेफरल आणि काउंटर-रेफरल

  • डिस्चार्ज समरी

  • इलेक्ट्रॉनिक हेल्थ रेकॉर्ड

  • वैयक्तिक आरोग्य नोंदी

यांसारख्या सुविधा उपलब्ध करून देण्याचे नियोजन आहे.

यासोबतच कृत्रिम बुद्धिमत्ता (AI), टेलिमेडिसिन आणि आधुनिक निदान तंत्रज्ञानाचा वापर वाढवण्यात येणार आहे.

पाच शहरांमध्ये मोठ्या रुग्णालयांची उभारणी आणि विस्तार

‘PRAGATI’ प्रकल्पांतर्गत पाच शहरांमध्ये महत्त्वाची पायाभूत कामे केली जाणार आहेत.

शहरप्रस्तावित काम
कोल्हापूर५०० खाटांचे रुग्णालय
नांदेड५०० खाटांचे रुग्णालय
नागपूरजिल्हा रुग्णालयाची क्षमता १०० वरून ३०० खाटांपर्यंत वाढवणे
लातूरजिल्हा रुग्णालयाची क्षमता १०० वरून ३०० खाटांपर्यंत वाढवणे
पुणे२०० खाटांचे जागतिक दर्जाचे रेफरल रुग्णालय

या कामांसाठी सविस्तर प्रकल्प अहवाल, वास्तुरचना, प्रशासकीय व तांत्रिक मंजुरी, निविदा प्रक्रिया, बांधकाम आणि गुणवत्ता नियंत्रणावर भर दिला जाणार आहे.

प्रतिबंधात्मक आरोग्य आणि जनजागृतीवरही भर

केवळ रुग्णालये आणि वैद्यकीय उपकरणे उभारण्यापुरता हा प्रकल्प मर्यादित राहणार नसून प्रतिबंधात्मक आरोग्यसेवेलाही प्राधान्य दिले जाणार आहे.

तंबाखू आणि मद्यसेवन टाळणे, नियमित व्यायाम, संतुलित आहार, रक्तदाब आणि मधुमेहाची नियमित तपासणी, कर्करोग तपासणी, आजारांचे लवकर निदान आणि उपचारांचे पालन याबाबत मोठ्या प्रमाणावर जनजागृती मोहीम राबवण्यात येणार आहे.

नागरिकांचा खिशातून होणारा आरोग्य खर्च कमी करण्याचा प्रयत्न

प्राथमिक स्तरावरच तपासणी, आजाराचे लवकर निदान आणि वेळेत उपचार उपलब्ध करून देणे हा ‘PRAGATI’ प्रकल्पाचा महत्त्वाचा उद्देश आहे.

यामुळे आजार गंभीर अवस्थेत पोहोचण्यापूर्वी उपचार मिळण्यास मदत होऊन, विशेषतः असंसर्गजन्य आजार आणि कर्करोगावरील उपचारांसाठी नागरिकांच्या स्वतःच्या खिशातून होणारा खर्च (Out-of-Pocket Expenditure) कमी करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.



हेही वाचा

डॉक्टरांच्या क्लिनिकमध्ये QR कोड बंधनकारक

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा