Advertisement

शॉपिंग साईट पाहण्याचा नाद 'खुळा' ! तुम्हाला होऊ शकतो मानसिक आजार


शॉपिंग साईट पाहण्याचा नाद 'खुळा' ! तुम्हाला होऊ शकतो मानसिक आजार
SHARES

आजकाल ऑनलाईन शॉपिंग हा कुठलीही वस्तू खरेदी करण्याचा सर्वात सोपा पर्याय मानला जातो. एका क्लिकवर घरपोच सेवा मिळत असल्यानं ग्राहकही ऑनलाईन शॉपिंगला पसंती देऊ लागलेत. पण, काहीजण या ऑनलाईन शाॅपिंगच्या इतके आहारी गेलेत की, दिसली नवी वस्तू की खरेदी करून टाक! अशी त्यांची अवस्था झालीय.

या शॉपिंगचा खिशावर नव्हे, तर नकळत आपल्या जीवनावरही परिणाम होऊ लागल्याचं तुम्हाला जाणवतंय का? तसं असंल तर जरा स्वत:वर नियंत्रण ठेवा. कारण काही मानसोपचार तज्ज्ञांच्या मते, हा एक मानसिक आजार देखील असू शकतो! कमी वेळात खूप साऱ्या गोष्टींची खरेदी हा विचारच मुळात घातक असल्याचं डॉक्टरांचं म्हणणं आहे.


तुम्ही हे करता का?

काही काम न करता उगीचच शॉपिंग साईट पाहत बसणं, त्यासंदर्भातील माहिती, फोटो डाऊनलोड करणं या आणि अशा बऱ्याच कारणांमुळं अनेकजण 'कम्पल्सिव्ह शॉपिंग डिसऑर्डर' नावाच्या आजारानं त्रस्त झाले आहेत.


ऑनलाईन शॉपिंगचं व्यसन म्हणजे काय?

उदा. एखाद्या महिलेला महिन्याला ५० हजार रुपये पगार आहे. तिने तो संपूर्ण पगार फक्त शॉपिंग करण्यासाठी खर्च केला, तर त्या महिलेला ऑनलाईन शॉपिंग करण्याचं व्यसन लागलंय असं आपण म्हणू शकतो.


ऑनलाईन शॉपिंग करण्याचं सर्वात जास्त प्रमाण महिलांमध्ये आहे. मोबाईलमुळं एका क्लिकवर आपल्याला हव्या त्या वस्तू मिळतात. तापट स्वभावाचे किंवा राग आल्यास कुठलाही विचार न करणारे व्यक्ती प्रामुख्यानं या आजारात अडकतात. आपल्याकडं याबद्दल कुणाला ठाऊक नसल्यानं सतत ऑनलाईन शॉपिंग करणं हा आजार मानला जात नाही. त्यामुळं याविषयी डॉक्टरांशी बोलण्याचं प्रमाण खूप कमी आहे. महिन्याला असे २ ते ३ रुग्ण आमच्याकडं उपचारांसाठी येतात.
- डॉ. सागर मुंदडा, मानसोपचारतज्ज्ञ 



वस्तूंची विक्री वाढवण्यासाठी ऑनलाईन शॉपिंगद्वारे अत्यंत अॅग्रेसिव्ह मार्केटींग केलं जातं. या साईट्स पाहता पाहता आपल्याला वस्तू खरेदी करण्याचं व्यसन कधी जडतं हे कळतच नाही. वस्तू घेण्यासाठी तर काहीजण चोऱ्या करतात, स्वत:च्या सुखासाठी दुसऱ्यांकडं पैसे मागतात आणि मग कर्जबाजारी होतात.

कधी कधी खरेदी केलेल्या वस्तू अनावश्यक असतात. त्यामुळं घरातल्या इतर व्यक्तींशी या व्यक्तींचं पटत नाही. तरीही ते शॉपिंग करतात. काही महिला नैराश्य दूर करण्यासाठीही ऑनलाईन शॉपिंग करतात. तरुणी किंवा कमावत्या महिलांचं यांत जास्त प्रमाण आहे. मोबाईलवर सतत कोणत्या ना कोणत्या शॉपिंगच्या वेबसाईट चाळत राहणं अशी लक्षणं या महिलांमध्ये दिसून येतात.


कम्पल्सिव्ह शॉपिंग डिसऑर्डरची लक्षणं

  • एखाद्याला खूप नैराश्य असेल तर तो शॉपिंगचा विचार करतो
  • तो व्यायाम करत नाही, पण शॉपिंग करतो
  • सतत इंटरनेटवर शाॅपिंग वेबसाईट चाळत बसणं
  • शॉपिंगवरुन वाद घातल्यास चिडणं
  • शॉपिंग न केल्यामुळं मूड बदलणं
  • खरेदी केलेल्या वस्तू घरात लपवून ठेवणं


हे उपाय करा

  • स्वत:ला मोबाईलपासून दूर ठेवा
  • मन एकाग्र करण्यासाठी थोडा व्यायाम करा, म्युझिक ऐका
  • आपली नेमकी गरज ओळखायला शिका


शॉपिंग करण्यापलिकडंही बऱ्याच गोष्टी करण्यासारख्या आहेत याचा विचार करणं. सततच्या शॉपिंग करण्यानं पैसे खर्च होतात. त्यामुळं गरजेपुरतंच शॉपिंग करावं. बऱ्याच शॉपिंग वेबसाईट्स ऑफर फक्त तुमच्याकडून पैसे उकळण्यासाठीच असतात. विकल्या न गेलेल्या वस्तूही या शॉपिंगच्या माध्यमातून तुमच्या गळ्यात पडू शकतात. याचं भान ठेवणं आवश्यक असल्याचं तज्ज्ञ म्हणतात.


ऑनलाईन शॉपिंग हा इंटरनेटच्या व्यसनाचा भाग असू शकतो. ऑनलाईन शॉपिंग करणं हा मानसिक आजार म्हणून अजूनही समोर आलेला नाही. आपण शॉपिंग कुठल्याही पद्धतीने करतो. त्यासाठी ती फक्त ऑनलाईनच करायला पाहिजे असं काही नाही. बराच काळ एखाद्या शॉपिंगच्या वेबसाईटवर वेळ घालवणं म्हणजे त्या व्यक्तीला इंटरनेटचं अॅडिक्शन असू शकतं.
- डॉ. गौरव वडगावकर, मानसोपचारतज्ज्ञ


डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी संबंधित प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या) 

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा