Advertisement

राज्यात २४ जिल्ह्यांमध्ये डेल्टा प्लसचा धोका

सोमवारी डेल्टा प्लसचे नवीन २७ रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे राज्यातील रुग्णांची संख्या १०३ झाली आहे.

राज्यात २४ जिल्ह्यांमध्ये डेल्टा प्लसचा धोका
SHARES

राज्यातील २४ जिल्ह्य़ांमध्ये कोरोनाच्या डेल्टा पल्स व्हेरिएंटचा प्रादुर्भाव वाढल्याचं दिसून आलं आहे. डेल्टा पल्सचे सर्वाधिक रुग्ण रत्नागिरी आणि जळगाव जिल्ह्य़ामध्ये आढळले आहेत. दिलासादायक बाब म्हणजे या जिल्ह्यांमध्ये सद्यस्थितीत बाधितांचं प्रमाण वाढलेलं नाही. त्यामुळे डेल्टा प्लस व्हेरिएंटच्या प्रसाराचा वेग हा डेल्टाच्या तुलनेत कमी आहे. मात्र तरीही यावर बारकाईने लक्ष ठेवणे गरजेचं असल्याचं मत तज्ज्ञांनी व्यक्त केलं आहे.

सोमवारी डेल्टा प्लसचे नवीन २७ रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे राज्यातील रुग्णांची संख्या १०३ झाली आहे. आता एकूण २४ जिल्ह्य़ांमध्ये याचा प्रादुर्भाव असल्याचे जनुकीय क्रमनिर्धारण (जिनोम सिक्वेन्सिंग) चाचण्यांमधून निदर्शनास आलं आहे. यात ५० टक्के रुग्ण हे विदर्भ आणि कोकण विभागात आढळले आहेत.

डेल्टा प्लस आढळून एक महिन्याहूनही अधिक काळ उलटला आहे. एखाद्या भागात विषाणूचा संसर्ग पसरण्यास साधारण १४ दिवसांचा कालावधी लागतो. यानुसार दुपटीहून अधिक कालावधी उलटला तरी डेल्टाच्या तुलनेत रुग्णसंख्या झपाटय़ाने वाढल्याचं आढळलेलं नाही. त्यामुळे संसर्ग प्रसाराचा वेग कमी आहे. परंतु हा डेल्टाचा उपप्रकार असल्यामुळे यात त्याचेच अंश आहेत. त्यामुळे याची घातकता कमी आहे असे सध्या म्हणता येणार नाही. यासाठी आणखी मोठय़ा प्रमाणात रुग्णसंख्येचा अभ्यास होणे आवश्यक आहे, असे आरोग्य आयुक्तालयाचे माजी संचालक आणि एपिडेमियोलॉजिस्ट डॉ. प्रकाश डोके यांनी सांगितले.

जिल्हानिहाय रुग्णांची आकडेवारी

जळगाव (१३), रत्नागिरी (१५), मुंबई (११), कोल्हापूर (७), ठाणे, पुणे, अमरावती, गडचिरोली प्रत्येकी सहा, नागपूर (५), अहमदनगर (४), पालघर, रायगड, अमरावती प्रत्येकी तीन, नांदेड, गोंदिया, सिंधुदुर्ग, नाशिक प्रत्येकी दोन, चंद्रपूर, अकोला, सांगली, नंदुरबार, औरंगाबाद, बीड, भंडारा प्रत्येकी एक

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा