Advertisement

तब्बल 'इतके' रुग्ण गृहविलगीकरणात

गेल्या काही दिवसांत मुंबईत कोरोनाचा संसर्ग झपाट्यानं पसरत असून, रुग्णसंख्येत ही मोठी वाढ होत आहे

तब्बल 'इतके' रुग्ण गृहविलगीकरणात
SHARES

गेल्या काही दिवसांत मुंबईत कोरोनाचा संसर्ग झपाट्यानं पसरत असून, रुग्णसंख्येत ही मोठी वाढ होत आहे. शिवाय, मुंबईतील तब्बल ७ लाख कोरोनाबाधित रुग्णांना अटीसापेक्ष गृहविलगीकरणात राहण्याची परवानगी देण्यात आली असून यात लक्षणं नसलेले, परंतु कोरोनाची बाधा झालेले, सौम्य लक्षणं असलेले, अतिजोखमीच्या आणि कमी जोखमीच्या गटातील संशयित रुग्णांचा समावेश आहे.

कोरोनाबाधित रुग्णासाठी महापालिकेनं रुग्णालये, कोरोना काळजी केंद्रे, कोरोना समर्पित आरोग्य केंद्र, जम्बो करोना केंद्र आदी सुविधा उपलब्ध केली आहे. त्याचबरोबर खासगी रुग्णालयांमध्येही करोनाबाधित रुग्णांसाठी खाटा आरक्षित ठेवण्यात आल्या. खासगी रुग्णालयात उपचार घेणं आर्थिकदृष्ट्या परवडत नसल्यानं आणि पालिकेच्या संस्थात्मक विलगीकरण केंद्रातील व्यवस्थेवर विश्वास नसल्याने अनेक रुग्ण घरातच उपचार घेण्याचा आग्रह धरू लागले होते.

घरात स्वतंत्र खोली आणि प्रसाधनगृह असलेल्या रुग्णांना गृहविलगीकरणात राहण्याची परवानगी देण्याची संकल्पना आकारास आली. कोरोनाचा संसर्ग पसरू नये यासाठी आतापर्यंत कोरोनाबाधित रुग्णांच्या संपर्कात आलेल्या अतिजोखमीच्या गटातील ३२ लाख १४ हजार ६००, तर कमी जोखमीच्या गटातील ३० लाख ०७ हजार १५५ अशा एकूण ६२ लाख २१ हजार ७५५ संशयित रुग्णांचा शोध घेण्यात पालिका यशस्वी ठरली. यापैकी ५५ लाख १९ हजार ८७८ संशयित रुग्णांनी त्यांचा विलगीकरणाचा काळ पूर्ण केला आहे.

सद्यस्थितीत तब्बल ७ लाख ८५४ रुग्ण गृहविलगीकरणात आहेत. यात संशयित रुग्णांबरोबर लक्षणं नसलेले, पण बाधा झालेले, तसेच सौम्य लक्षणं असलेल्या रुग्णांना अटीसापेक्ष गृहविलगीकरणात राहण्याची परवानगी देण्यात आली आहे. सध्या कोरोनाबाधित रुग्णांना रुग्णालयांमध्ये खाटा मिळविण्यासाठी वणवण करावी लागत आहे. रेमडेसिविर इंजेक्शन, प्राणवायूच्या तुटवड्यामुळं नव्या समस्या निर्माण झाल्या आहेत. त्यातच गृहविलगीकरणातील रुग्ण नियमांचे काटेकोरपणे पालन करीत नसल्यामुळे कुटुंबातील अन्य सदस्यही बाधित होत असल्याचे निदर्शनास आले आहे.

Read this story in English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा