कामा रुग्णालय, सर जे जे रुग्णालय, सेंट जोर्जेस रुग्णालय आणि जीटी रुग्णालय या मुंबईमधील मुख्य चार रुग्णालयांमध्ये सर्वात जास्त गरीब रुग्ण उपचारासाठी येतात. या चारही रुग्णालयात असलेले रुग्ण सध्या एका वेगळ्याच त्रासात आहेत. रुग्णालयात दाखल झालेल्या रुग्णांना उपचारासाठी लागणारी औषधे बाहेरच्या मेडिकल स्टोअरमधून आणावी लागतात. या तारेवरच्या कसरतीमुळं रुग्णांच्या नातेवाईकांची मात्र दमछाक होते.
मुंबईतील कामा रुग्णालयात अनेक गरीब रुग्ण उपचारासाठी येतात. काही रुग्णांना अॅडमिट करून घेतलं जातं. कामा रुग्णालयात मेडिकल स्टोअर बंद असल्या कारणाने रुग्णांच्या नातेवाईकांना बॉम्बे हॉस्पिटलच्या मेडिकल स्टोअरला जाऊन औषधे आणावी लागतात. रात्री अपरात्री औषधे आणायला जावं लागत असल्याने रुग्णासोबत असलेल्या नातेवाईकांची चांगलीच दमछाक होते. प्रसूती वाॅर्डमध्ये असलेल्या महिलांच्या नातेवाईकांची दररोज तारेवरची कसरत चालू असते. शिवाय नातेवाईकांसाठी कोणत्याच प्रकारची राहण्याची सोय नाही.
सलमा या गोवंडीहून आपल्या नणंदेला घेऊन कामा रुग्णालयात प्रसूतीसाठी आल्या आहेत. रात्रीच्या वेळी गोळ्या औषधे, सुया व हँडग्लोव्हज सुद्धा आम्हाला बाहेरून आणण्यास सांगतात असं मुंबई लाईव्हला त्यांनी सांगितलं. औषधांसाठी बॉम्बे हॉस्पिटलच्या मेडिकल स्टोअरमध्ये जावं लागतं. आतापर्यंत बाहेरून आणलेल्या गोळ्यांचा खर्च हा दहा हजाराच्या वर गेला आहे, असं त्यांनी सांगितलं.
कामा रुग्णालयाप्रमाणेच सेंट जाॅर्जेस रुग्णालयातदेखील हीच अवस्था आहे. या रुग्णालयातील शासकीय मेडिकल बंद असून रुग्णांना बाहेरून औषधे विकत आणावी लागतात. याबद्दल सेंट जाॅर्जेस चे अधीक्षक डॉ. मधुकर गायकवड यांना विचारले असता त्यांनी देखील शासनाने हे स्टोअर बंद केले असल्याची माहिती दिली. हे स्टोअर २ वर्षांपेक्षा अधिक काळ बंद अाहे. सेंट जॅार्जेसमध्ये मेडिकल स्टोअर अाहे. पण काही औषधे बाहेरूनच मागवावी लागतात, असं डॉ. गायकवाड यांनी सांगितलं.
या चार रुग्णालयातील मेडिकल स्टोअर हे महाराष्ट्र स्टेट को.ऑप. कन्झ्युमर्स फेडरेशन मुंबईच्या अंतर्गत येतात. हे मेडिकल स्टोअर बंद असल्याचं कारण कोणीही सांगत नाही. फेडरेशनच्या व्यवस्थापन कर्मचाऱ्यांना यासंदर्भात विचारले असता त्यांनी याबद्दल मौन बाळगणं पसंत केले. त्यामुळे हे मेडिकल स्टोअर का बंद आहे याची माहिती अद्यापही गुलदस्त्यात आहे.
हे मेडिकल स्टोअर शासनाचं आहे. त्यांनी नेमकं कोणत्या कारणावरून बंद ठेवलं आहे हे नक्की सांगता येणार नाही. मात्र, आमच्या रुग्णालयात मेडिकल स्टोअर आहे. जी औषधे रुग्णालयाच्या स्टोअरमध्ये नाहीत तीच औषधे आम्ही बाहेरून आणण्यास सांगतो. - डॉ. राजश्री कटके, वैद्यकीय अधीक्षक, कामा रुग्णालय
हेही वाचा-
क्षयरोग रुग्णांच्या नोंदणीसाठी 'डिझबोर्ड' अॅप
टाटा हाॅस्पिटलच्या नावानं फेक मेसेज व्हायरल