Advertisement

म्हणे, जागा अपुरी! पोद्दार रुग्णालयाने काढलं शिकाऊ डाॅक्टरांना वसतिगृहाबाहेर

वसतिगृहात अपुरी जागा असल्याचं कारण देत पोद्दार आयुर्वेदिक काॅलेज प्रशासनाने ९ फेब्रुवारीला वसतिगृह रिकामं करण्याचे आदेश दिले.

म्हणे, जागा अपुरी! पोद्दार रुग्णालयाने काढलं शिकाऊ डाॅक्टरांना वसतिगृहाबाहेर
SHARES

वरळीच्या पोद्दार आयुर्वेदिक काॅलेजमधील इंटर्न्स विद्यार्थ्यांना निवासाचे शुल्क भरूनही रुग्णालयातील वसतिगृहात राहता येणार नाही. कारण पोद्दार आयुर्वेदिक काॅलेज प्रशासनाने तसा आदेशच काढला आहे.

वसतिगृहात राहण्यासाठीचं शुल्क भरुनही वास्तव्य करता येणार नसल्याचा फतवा रुग्णालय प्रशासनाने काढल्यामुळे इंटर्न्स डॉक्टरांनी काम बंद आंदोलन केलं. त्यानंतर विविध मागण्या घेऊन निवासी डॉक्टरही इंटर्न्सच्या समर्थनार्थ आंदोलनात सहभागी झाले. असे एकूण ३०० ते ३५० डॉक्टर्स सोमवारच्या काम बंद आंदोलनात सहभागी झाले होते.


काय दिलं कारण?

वसतिगृहात अपुरी जागा असल्याचं कारण देत रुग्णालय प्रशासनाने ९ फेब्रुवारीला वसतिगृह रिकामं करण्याचे आदेश दिले. ऐनवेळी हा निर्णय घेण्यात आल्यामुळे इंटर्न्सवर दबाव असल्याचं विद्यार्थी सोनाली फुलसुंदर हिने सांगितलं.

परीक्षा झाल्यानंतर लगेचच वसतिगृह रिकामं करायचं, असं प्रतिज्ञापत्रही या विद्यार्थ्यांकडून लिहून घेतलं जात आहे. जोपर्यंत प्रतिज्ञापत्र भरुन देत नाही, तोपर्यंत परीक्षेचा फॉर्म भरुन देणार नाही, असंही रुग्णालय प्रशासनाकडून सांगण्यात आल्याचं हे विद्यार्थी सांगतात.



विद्यार्थ्यांची परवड

पोद्दार आयुर्वेदिक काॅलेजमध्ये सोलापूर, औरंगाबाद, कोल्हापूर अशा राज्याच्या कानाकोपऱ्यातूनच नाही तर, मणिपूर, नेपाळमधूनही विद्यार्थी शिक्षणासाठी आले आहेत. पण, कुठल्याही प्रकारची पूर्वसूचना न देता काॅलेजने त्यांना वसतिगृहाबाहेर काढण्याचा निर्णय घेतला. याप्रकरणी काॅलेजचे अधिष्ठाता डाॅ. गोविंद खट्टी यांच्याकडेही दाद मागण्याचा प्रयत्न विद्यार्थ्यांनी केला. पण त्यांनीही विद्यार्थ्यांच्या मागणीकडे दुर्लक्ष केलं. त्यामुळे इथल्या विद्यार्थ्यांवर अक्षरश: रस्त्यावर येण्याची वेळ आली आहे.

याविषयी पोद्दार आयुर्वेदिक काॅलेजचे अधिष्ठाता डॉ. गोविंद खट्टी यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता संपर्क होऊ शकलेला नाही.


विद्यार्थ्यांनी नोंदवलेले आक्षेप -

  • वसतिगृहाची क्षमता केवळ ६४ विद्यार्थ्यांची. तरीही, पहिल्या वर्षांत १०० विद्यार्थ्यांना प्रवेश
  • पोद्दार रुग्णालयात इंटर्नशीप करणाऱ्या विद्यार्थ्यांना पैसे भरूनही वसतिगृह रिकामं करण्याचे आदेश
  • भटक्या जाती आणि जमातीत येणाऱ्या विद्यार्थ्यांना यापुढे वसतिगृहात राहता येणार नसल्याचा अधिष्ठातांचा आदेश
  • पहिल्या वर्षातील विद्यार्थ्यांना शवविच्छेदनाच्या प्रशिक्षणासाठी अजूनही शवाची व्यवस्था नाही

काॅलेजने आपला निर्णय मागे घेतला नाही, तर आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशाराही या विद्यार्थ्यांनी दिला आहे.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा