Advertisement

Coronavirus Updates: 'या' रुग्णालयांत आता 'कोव्हीड १९'ची आरोग्यसेवा केंद्रे

करोनाचा वाढता फैलाव लक्षात घेता सार्वजनिक रुग्णालयांना आता 'कोव्हीड १९'ची आरोग्यसेवा केंद्रे करण्याचे निर्देश केंद्र सरकारनं दिले आहेत.

Coronavirus Updates: 'या' रुग्णालयांत आता 'कोव्हीड १९'ची आरोग्यसेवा केंद्रे
SHARES

कोरोनाच्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. महाराष्ट्रातील कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांची संख्या ८९ वर पोहोचली आहे. रविवारी संध्याकाळी १५ नव्या रुग्णांची चाचणी पॉझिटीव्ह आल्या असून, यामधील १४ रुग्ण मुंबईतील आहेत. रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता राज्य सरकारनं मुंबईची लोकलसह बस, मेट्रो, मोनो बंद केली आहे. त्याशिवाय, करोनाचा वाढता फैलाव लक्षात घेता सार्वजनिक रुग्णालयांना आता 'कोव्हीड १९'ची आरोग्यसेवा केंद्रे करण्याचे निर्देश केंद्र सरकारनं दिले आहेत. 

राज्यातील सार्वजनिक रुग्णालयांनी नियोजन सुरू केलं आहे. मुंबईमध्ये जेजे, जीटी, सेंट जॉर्जेस आणि कामा रुग्णालयांमध्ये रोजच्या ओपीडीही हळुहळू बंद करण्यात आल्या आहेत. इथं येणाऱ्या रुग्णांना प्राथमिक तसंच द्वितीय आरोग्य केंद्रांकडं पाठवण्यात येणार आहे. 'खासगी रुग्णसेवेचाही आधार घ्या, गरज भासल्यास फोनवरून संपर्कात रहा', असे निर्देशही संबंधितांना देण्यात आले आहेत. 'कोव्हीड १९'च्या आरोग्यकेंद्रांतर्गत जेजे, जीटी, सेंट जॉर्जेस या रुग्णालयांचा प्राधान्यानं विचार करण्यात येणार आहे. 

लहान मुले आणि माता यांचं रुग्णालय असलेल्या कामा रुग्णालयाचा पर्याय हा शेवटचा असणार आहे. तसेच कुष्ठरोग आणि लैंगिक आजारांच्या उपचारासाठी वापर केला जात असलेल्या रुग्णालयाच्या त्वचारोगासाठी असलेल्या इमारतीचा वापर आता विलगीकरण कक्षासाठी करण्याच्या दृष्टीनं तयारी सुरू आहे. त्यासाठी संरक्षणात्मक वैद्यकीय उपकरणं तसंच इतर बाबींची मागणी करण्यात आली आहेत.

रुग्णालयामध्ये येणाऱ्या प्रत्येक रुग्णाला वैद्यकीय सुविधा मिळतील या दृष्टीनं नियोजन केलं जात आहे. रुग्णांची अ, ब आणि क अशा श्रेणीमध्ये विभागणी करण्यात येणार असल्याची माहिती मिळते. संसर्गित असलेला, लक्षणे असणारा आणि केवळ संशयित असलेल्या रुग्णांना वेगवेगळ्या विभागांमध्ये ठेवण्यात येणार आहे. यावेळी दीड फुटाचं अंतर ठेवण्याचा निकष असेल त्यामुळं रुग्णांची गर्दी वाढल्यास अंतराचा निकष संसर्ग टाळण्यासाठी कटाक्षानं पाळण्यात येणार असल्याची माहिती मिळते.

कस्तुरबा रुग्णालयाप्रमाणे जेजेमध्ये 'कोव्हीड १९'च्या तपासण्या सुरू करण्यात येणार आहेत. त्यासाठी सुसज्ज प्रयोगशाळा उभारण्याच्या दृष्टीचे प्रयत्न शेवटच्या टप्प्यात असून, रविवारी जेजेतील तज्ज्ञांना कस्तुरबा रुग्णालयात प्रशिक्षणासाठी पाठवण्यात आले होते. ही सुविधा उपलब्ध झाल्यानंतर निदान चाचण्यांचे प्रमाण वाढणार आहे.



हेही वाचा -

Coronavirus Updates: मंत्रालयात करोना नियंत्रण कक्षाची स्थापना

Coronavirus Updates: अत्यावश्यक सेवेसाठी एसटीची मदत



Read this story in English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा