Advertisement

औषध खरेदी फक्त हाफकीन महामंडळाकडून करा- मुख्यमंत्र्यांचे निर्देश


औषध खरेदी फक्त हाफकीन महामंडळाकडून करा- मुख्यमंत्र्यांचे निर्देश
SHARES

आरोग्य, वैद्यकीय शिक्षण यांच्यासह सर्वच शासकीय विभागांनी हाफकीन महामंडळ मार्फतच औषधे आणि यंत्रसामुग्री खरेदी करावी, याबाबतचा प्रस्ताव मंत्रीमंडळाच्या पुढच्या बैठकीत सादर करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत.

औषधे आणि यंत्रसामुग्री खरेदी संदर्भात झालेल्या बैठकीत मुख्यमंत्री बोलत होते. वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन, अन्न व औषध प्रशासन विभाग मंत्री गिरीश बापट, आरोग्य मंत्री डॉ. दीपक सावंत यावेळी उपस्थित होते.



आरोग्य, वैद्यकीय शिक्षण या बरोबरच आदिवासी विकास विभाग, महिला आणि बालविकास विभाग, शिक्षण विभाग, शासकीय मंडळांना लागणारी औषधे आणि यंत्रसामुग्री यासाठी हाफकीन महामंडळमध्ये खरेदी कक्ष स्थापन करण्यात आला आहे. यापुढे कुठलाही विभाग औषध खरेदी हाफकीन महामंडळा व्यतिरिक्त अन्यत्र खरेदी करणार नाही. याबाबतचा प्रस्ताव मंत्रिमंडळाच्या पुढील बैठकीत सादर करावा, अशा सूचना देत औषधांची मागणी, पुरवठा आणि वापर यांची सांगड घालणारं माॅड्युल तयार करावं.

- देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री


साॅफ्टवेअरचा वापर करा

शिवाय, प्रत्येक विभागाने औषध खरेदीचे कॅलेंडर तयार करावे. सार्वजनिक आरोग्य विभाग वापर करत असलेल्या ‘ई-औषधी’ या सॉफ्टवेअरचा वैद्यकीय शिक्षण विभागाने देखील अवलंब करावा. त्याचबरोबर दोन्ही विभागांनी आपली यंत्रणा डिजिटल प्लॅटफॉर्मवर आणावी. हाफकीन महामंडळातील खरेदी कक्षासाठी मनुष्यबळ उपलब्ध करुन द्यावं आणि त्याबाबत आराखडा तयार करावा, अशी सूचना देखील मुख्यमंत्र्यांनी केली.


अनुदान प्राप्त

सर्व विभागांची औषधे आणि उपकरणे यांचा पुरवठा करण्यासाठी १४ ऑगस्ट २०१७ रोजी हाफकीन महामंडळामध्ये खरेदी कक्ष सुरु करण्यात आला. पारदर्शकतेसाठी निविदा जाहिराती, शुद्धीपत्रके, बैठकांचे इतिवृत्त तसंच पुरवठा आदेश याबाबतची माहिती संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात येत आहे. या खरेदी कक्षामध्ये तीन समित्या स्थापन करण्यात आल्या असून त्यामध्ये निविदा मान्यता समिती, निविदा निवेदन समिती आणि विनिर्देशन समितीचा समावेश आहे. महामंडळाला सार्वजनिक आरोग्य विभागाकडून ७९ कोटी तर वैद्यकीय शिक्षण विभागाकडून ८८ लाख रुपयांचं अनुदान प्राप्त झालं आहे.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा