Advertisement

तिळ, गूळ, शेंगदाण्याच्या दरात वाढ; ग्राहकांनी खरेदीकडे फिरवली पाठ

मकरसंक्रांतीच्या मुहूर्तावर देशभर सुरू होत असलेल्या कोरोना लसीकरणाच्या मोहिमेनं संक्रांतीचा गोडवा अधिक वाढवला आहे.

तिळ, गूळ, शेंगदाण्याच्या दरात वाढ; ग्राहकांनी खरेदीकडे फिरवली पाठ
SHARES

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर २०२० हे वर्ष अतिशय शांततेत आणि वाईट परिस्थितीत गेलं. या वर्षात काहींनी माणसं जपून माणुसकी दाखवली तर काहीजण माणुसकीच विसरले होते. काहींनी अनेकांना आपलं म्हणून जपलं तर काहींनी आपलं म्हणून नाकारलं. अशी काहीशी परिस्थिती आपल्याला २०२० या वर्षात पाहायला मिळाली. परंतु, नव्या वर्षात सर्वांच्या चेहऱ्यावर आनंद दिसत आहे. कारण या वर्षात सर्वांना कोरोनवरील लस देण्यात येणार आहे. त्यामुळं यंदाच्या वर्षातील ही संक्रांत सर्वांनाच आनंदात जाणार आहे.

मकरसंक्रांतीच्या मुहूर्तावर देशभर सुरू होत असलेल्या कोरोना लसीकरणाच्या मोहिमेनं संक्रांतीचा गोडवा अधिक वाढवला आहे. मात्र, हा गोडवा जिभेवर उमटणाऱ्या तिळाच्या लाडूंची चव यंदा महागाईमुळं फिकी पडण्याची चिन्हे आहेत. किरकोळ बाजारात तिळाच्या किमतीत गेल्या वर्षीच्या तुलनेत किलोमागे २० रुपयांनी वाढ झाली आहे.

सुकेखोबरे, शेंगदाणे आणि गुळाच्या किमतीमध्येही वाढ झाल्यामुळे लाडू बनवण्यासाठी यंदा जास्त पदरमोड करावी लागत आहे. जून महिन्यानंतर लॉकडाऊन टप्प्याटप्प्यानं शिथिल करण्यात आल्यानं बाजारपेठा आणि दुकानं पुन्हा खुली करण्यात आली. या काळात महागाईमुळे ग्राहकांनीही खरेदीकडे पाठ फिरवली, असा सूर व्यापाऱ्यांमध्ये आहे.

या महागाईच्या झळा २०२१ मध्येही कायम असल्याचे पाहायला मिळत आहे. यंदा मकरसंक्रांतीनिमित्त तिळाचे लाडू बनविण्यासाठी लागणाऱ्या जिन्नसाच्या किमतीतही गेल्या वर्षीच्या तुलनेत वाढ झाली आहे. गेल्या वर्षी किरकोळ बाजारात १८० रुपये किलोने मिळणाऱ्या तिळाच्या किमतीत या वर्षी २० रुपयांची वाढ झाली असून सध्या तीळ २०० रुपये किलोने किरकोळ बाजारात विकला जात आहे. तिळाच्या लाडूसाठी लागणाऱ्या अन्य जिन्नसांच्या किमतीतही वाढ झाली आहे.

गतवर्षी किरकोळ बाजारात १८० रुपये किलोने विकल्या जाणाऱ्या सुक्या खोबऱ्याच्या किमतीत ३० रुपयांची वाढ झाली आहे. तर, किरकोळ बाजारात गेल्या वर्षी १२० रुपये किलोने विकले जाणारे शेंगदाणे सध्या १४० रुपये किलोने विकले जात आहेत. किरकोळ बाजारात गेल्या वर्षी ५५ रुपये किलोने विकला जाणारा गूळ यंदा ६५ रुपये किलोने विकला जात आहे.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा