Advertisement

एलफिन्स्टन पूल दुर्घटना : केईएममधील डॉक्टर करणार जखमींचं समुपदेशन


एलफिन्स्टन पूल दुर्घटना : केईएममधील डॉक्टर करणार जखमींचं समुपदेशन
SHARES

29 सप्टेंबर हा दिवस मुंबईकरांसाठी ब्लॅक फ्रायडे ठरला. सकाळी नेहमीप्रमाणे घराबाहेर पडलेले मुंबईकर परळ स्टेशनवर उतरले पण, तिथे झालेल्या चेंगराचेंगरीत 23 मुंबईकरांचा दुर्दैवी मृत्यू झाला आणि 38 जण जखमी झाले.

या घटनेची कायमस्वरुपी भीती, राग आणि एक वाईट आठवण जखमींच्या मनात राहिली असेल यात काही शंका नाही. याच पार्श्वभूमीवर केईएम रुग्णालयाने या जखमींचं समुपदेशन करण्याचा निर्णय घेतला आहे. त्या ब्रीजवर आपल्यासोबत असं काही घडेल, याचा विचारही कधी त्यांनी केला नव्हता.

आपला जीव, श्वास गुदमरतोय, कोणीतरी अंगावर जोर देतंय, आपण घुसमटतोय हा विचारच खरंतर भयानक आहे. ही भीती, ह राग त्यांच्या मनातून कायमचा काढावा, यासाठी केईएम रुग्णालयातील मानसोपचारतज्ज्ञ आणि काही तज्ज्ञ डॉक्टर त्यांचं समुपदेशन करणार आहेत.

त्या घटनेतील 19 जखमींवर सध्या केईएम रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांच्याबाबत जे घडलं त्याचा अनुभव खरंतर भयानक आहे. आम्ही आतापर्यंत मुंबईतील बॉम्बस्फोट किंवा पुरात जखमी झालेल्या रुग्णांचं देखील समुपदेशन केलं आहे. सोमवारपासून आम्ही सपोर्टिव्ह सायको थेरेपी सुरू करणार आहोत.      

डॉ. शुभांगी पारकर, मानसोपचारतज्ज्ञ, केईएम रुग्णालय

शिवाय, अशी परिस्थिती सर्वच रुग्णांमध्ये असेल असंही नाही. ज्यांना खरंच या घटनेचा जास्त धक्का बसला असेल, त्यांच्यासाठी आम्ही जास्त वेळ देणार आहोत. त्यासाठी 10 डॉक्टरांची टीमदेखील सज्ज असल्याचं डॉ. पारकर यांनी 'मुंबई लाइव्ह'शी बोलताना स्पष्ट केलं आहे.

जखमींची भीती कमी करण्यासाठी त्यांच्यावर उपचार आणि त्यांचं समुपदेशन करण्याचं काम केलं जाणार आहे. ज्यांना याचा जास्त त्रास झाला आहे, त्यांना आम्ही त्यासाठी औषधं देखील देणार आहोत. 

डॉ. अविनाश सुपे, अधिष्ठाता ,केईएम रुग्णालय

एलफिन्स्टन पूल दुर्घटनेत नेमकी चूक कोणाची? हे अजून तरी स्पष्ट झालेलं नाही. पण, जर त्या दिवशी थोडी शिस्त सर्वांनी पाळली असती, तर कदाचित एवढ्या जणांचा जीव गेला नसता, असं मतही डॉ. पारकर यांनी मांडलं.



हेही वाचा

...तर एलफिन्स्टनवरची चेंगराचेंगरी टळली असती!


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा