मुंबईमध्ये भटक्या कुत्र्यांप्रमाणे आता मांजरांचीही नसबंदी केली जाणार आहे. मांजरांची नसबंदी करून प्राणी उत्पत्ती नियंत्रण योजना राबविण्यात येणार आहे. महापालिकेच्या या महत्त्वपूर्ण मोहिमेला भारतीय पशुकल्याण मंडळानं मंजुरी दिली असून, सोमवार १ एप्रिलपासून हा उपक्रम सुरू करण्यात येणार आहे. तसंच, या उपक्रमासाठी महापालिकेकडून १ कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत.
मुंबई शहर उपनगरात मांजरांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. श्वानांच्या तुलनेत मांजरांचं प्रजनन जास्त असून, मांजरीचं प्रजनन वषार्तून चार वेळा होतं. तर श्वानाचं प्रजनन २ वेळा होतं. भटकी मांजर ही एका वेळेस सरासरी २ ते ५ पिल्लांना जन्म देते. त्यांची संख्या श्वानांपेक्षा जास्त आहे. त्यामुळे रोगराई-दुर्गंधीचं प्रमाण वाढलं आहे. याबाबत, नगरसेवकांकडून मांजरांचीही नसबंदी करावी, अशी मागणी करण्यात येत होती. शिवसेनेचे नगरसेवक अनिल पाटणकर यांनी मांजरांची नसबंदी करावी, अशी ठरावाची सूचनाही मांडली होती.
महापालिकेनं या उपक्रमासाठी १ कोटी रुपयांची तरतूद केली आहे. तसंच, या उपक्रमाअंतर्गत मांजर पकडून आणणं, नसबंदीसाठी दाखल करणं व सोडणं यासाठी एकूण १२०० रुपये खर्च येणार आहे. मुंबईत डब्ल्यूएसटी, वेल्फेअर आॅफ स्ट्रे डॉग, बॉम्बे एसपीसीए, आयडिया इंडिपेंडन्स आॅफ अॅनिमल्स, अहिंसा , मालाड, ‘उत्कर्ष सामाजिक संस्था अशा ठिकाणी मांजरांची नसबंदी केली जाणार आहे.
हेही वाचा -
वांद्रे स्थानकात उंदीर आढळलेला स्टॉल बंद
युवासेनेच्या कार्यकर्त्यांची नाराजी दूर करण्यासाठी पूनम महाजन यांनी घेतील उद्धव ठाकरेंची भेट