Advertisement

जागतिक आत्महत्या निवारण दिन विशेष : आत्महत्येचा विचार दूर करणारं 'अॅप'


जागतिक आत्महत्या निवारण दिन विशेष : आत्महत्येचा विचार दूर करणारं 'अॅप'
SHARES

जगभरात जवळपास दररोज ३ हजार जण आत्महत्या करतात. या आत्महत्या रोखण्यासाठी १० सप्टेंबर रोजी 'जागतिक आत्महत्या निवारण दिना' निमित्त वेगवेगळ्या स्तरावर अनेक उपक्रम राबवले जातात. असाच एक उपक्रम मुंबईतही राबवण्यात येतोय. नैराश्यग्रस्त व्यक्तीला आत्महत्येपासून रोखणारं एक नवं अॅप रविवारी लॉन्च करण्यात येणार आहे. या अॅपचं नाव 'सुसाईड कंट्रोल डिरेक्टरी' अॅप असं असून जुनो क्लिनिकच्या डॉक्टरांनी हे अॅप तयार केलं आहे.

महाराष्ट्रासह देशभरात आत्महत्या रोखण्यासाठी अनेक संस्था कार्यरत आहेत. यातील ४० हून अधिक संस्थांचा या अॅपमध्ये समावेश आहे. तसंच ५३ हेल्पलाईन्सचा देखील यात समावेश आहे. यापैकी कुठल्याही हेल्पलाईनशी संपर्क साधल्यास नैराश्यग्रस्त व्यक्तीला तत्काळ मदत पुरवण्यात येईल. उदा. तुम्ही पुण्यात असाल, तर तुम्हाला पहिल्यांदा पुण्यातील हेल्पलाईनचा नंबर दिसेल, अशी सुविधा या अॅपमध्ये करण्यात आली आहे.


समुपदेशकांच्या माध्यमातून समुपदेशन

आत्महत्येची इच्छा जागृत होणाऱ्या व्यक्तींना अनेकदा मनातल्या गोष्टी मोकळेपणे सांगता येत नाहीत. अशा व्यक्तींना या अॅपचा उपयोग होईल. त्यांना या संस्थेतील समुपदेशकांच्या माध्यमातून समुपदेशन केले जाईल. जेणेकरून आत्महत्येच्या विचारातून त्यांना बाहेर काढता येईल.


सध्याच्या धकाधकीच्या जीवनात प्रत्येक व्यक्तींवरील ताण वाढतोय. १८ ते २५ वयोगटातील तरुणांमध्ये नैराश्येचं प्रमाण अधिक आहे. माझ्याकडे उपचारांसाठी दरदिवशी जवळपास ९ ते १० रुग्ण येतात. यामधील जवळपास ७ रूग्णांनी आत्महत्येचा प्रयत्न केलेला असतो. एखाद्या व्यक्तीला आत्महत्येची इच्छा होणं, याला मानसिक आजार म्हणावं की नाही, हे नेमकं सांगण कठीण आहे. ही स्थिती जाणून आम्ही आत्महत्या करू इच्छिणाऱ्यांना मदत मिळावी याकरता हे अॅप तयार करण्याचा निर्णय घेतला.
- डॉ. मिलन बालकृष्णन, मानसोपचारतज्ज्ञ, जुनो क्लिनिक



'ब्लू व्हेल' केंद्रस्थानी

मुलांना आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या 'ब्ल्यू व्हेल' नावाच्या गेममुळं सध्या सर्व स्तरातील पालक हादरून गेले आहेत. रोजच्या धावपळीत वाढणारा ताण-तणाव, नैराश्य दूर करण्यासाठी मनोरंजनाचं साधन म्हणून इंटरनेटचा वापर केला जातो. पण त्यातूनही काही वेळेस नैराश्य पसरवणाऱ्या गोष्टींचा भडिमार होतो. त्यामुळं पालकांनी आपल्या मुलांकडं कटाक्षानं लक्ष देण्याची गरज असल्याचं मत 'जागतिक आत्महत्या निवारण दिना'च्या पार्श्वभूमीवर तज्ज्ञांनी व्यक्त केलं आहे.


इतकं टोकाचं पाऊल का?

रोजच्या धावपळीच्या जगात वाढलेला ताण-तणाव, नैराश्य आणि आता त्याच्या जोडीला इंटरनेटवर तासनतास बसून खेळला जाणारा 'ब्लू व्हेल गेम' हे देखील आत्महत्येचं कारण ठरू लागलं आहे. खरंतर लहान मुलांच्या मनोरंजनासाठी इंटरनेटवर गेम बनवले जातात. पण, लहान मुलांची मनं एवढी नाजूक असतात की ते आपोआपच 'ब्लू व्हेल' सारख्या जीवघेण्या गेमकडे आकर्षित होतात. कुठला तरी इंटरनेट गेम आपल्या मनावर आणि मेंदूवर ताबा मिळवतो आणि त्यातून लहान मुलं आत्महत्या करतात किंवा स्वत:च्या शरीरावर जखमा करुन घेतात.


या वर्षी 'जागतिक आत्महत्या निवारण दिना'निमित्त 'ब्लू व्हेल' हा गेम केंद्रीत करण्यात आला आहे. घरातील भांडण हे देखील आत्महत्या करण्यामागचं मुख्य कारण असू शकतं. कधी-कधी कुटुंबिय याकडे जास्त लक्ष देत नाहीत. त्याचा परिणाम आपल्या मनावर होतो. त्यातून नैराश्य येतं. मग, आत्महत्या करावी असं वाटतं.
- डॉ. सागर मुंदडा, मानसोपचारतज्ज्ञ



डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी संबंधित प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा