
परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी ‘रॅपिडो’ आणि ‘उबर’सह नियमांचं उल्लंघन करून बेकायदेशीर बाईक टॅक्सी सेवा देणाऱ्यांविरोधात कडक कारवाई करण्यात येणार आहे. अॅप-आधारित कंपन्यांवर थेट फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे मोटार वाहतूक विभागाला निर्देश दिले आहेत. या सेवा शासनाच्या नियमांकडे दुर्लक्ष करतात आणि प्रवाशांच्या जीवाला धोका पोहोचवू शकतात.
अलीकडेच सरकारने ई-बाईक पॉलिसी जाहीर केली. त्यानंतर काही अॅप कंपन्यांनी वेगाने आपला व्यवसाय सुरू केला. मात्र, नियमांचे पालन न करता, चालकांना आवश्यक प्रशिक्षण न देता आणि खाजगी किंवा साधारण बाईक वापरून प्रवासी वाहतूक केली जात असल्याचे समोर आले आहे. यामुळे प्रवाशांच्या सुरक्षेला गंभीर धोका निर्माण झाला आहे.
अलीकडेच अशाच एका बेकायदेशीर बाईक टॅक्सी सेवेतून प्रवास करणाऱ्या प्रवाशाचा मृत्यू झाला. काशिमिरा परिसरात एका बेकायदेशीर बाईक टॅक्सी (रॅपिडो) प्रकरणात तक्रार दाखल झाली होती. या संदर्भात अनेक तक्रारी मंत्री सरनाईक यांच्याकडे पोहोचल्या होत्या.
“देशातील इतर राज्यांमध्ये जसं नियमांचा भंग करून बेकायदेशीर व्यवसाय चालवले जातात, तसं महाराष्ट्रात अजिबात चालणार नाही. प्रवासी सुरक्षा सर्वात महत्त्वाची आहे,” असे सरनाईक यांनी कठोर शब्दांत सांगितले.
नियम पाळणाऱ्या आणि चालकांचे शोषण न करणाऱ्या अॅप कंपन्यांना सरकार पाठिंबा देईल, असं त्यांनी स्पष्ट केलं. मात्र, शासन नियमांचं उल्लंघन करणाऱ्या आणि प्रवाशांच्या जीवाशी खेळणाऱ्या कंपन्यांवर कठोर कारवाई सुरूच राहील.
सरनाईक यांनी स्पष्ट इशारा दिला की प्रवासी वाहतूक करताना आढळलेल्या प्रत्येक बाईकवर कारवाई करण्याऐवजी, अशा सेवा पुरवणाऱ्या कंपन्यांच्या मालकांवर थेट कारवाई करण्यात येईल.
हेही वाचा
