एकाच महिलेला कोरोना प्रतिबंधक लसीचे (corona vaccine) तीन डोस देण्याचा धक्कादायक प्रकार ठाण्यात समोर आला आहे. ठाणे महापलिकेच्या (thane municipal corporation) आनंदनगर लसीकरण केंद्रावर २८ वर्षीय महिलेला एकाच वेळी लसीचे तीन डोस देण्यात आले आहेत. महिलेची प्रकृती सध्या स्थिर असून तिला पालिका डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवण्यात आलं आहे.
दरम्यान, एकाचवेळी तीन डोस देण्याची निष्काळजीपणा करणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी करण्यात येत आहे. तर याबाबत समिती नेमली असून चौकशी करत आहोत, असं ठाणे महापालिकेकडून सांगण्यात आलं आहे.
ठाण्यातील घोडबंदर रोडवरील आनंदनगर आरोग्य केंद्रावर २५ जूनला दुपारी लस घेण्यासाठी ब्रह्मांड इथे राहणारी महिला गेली. याच वेळी केंद्रावर उपस्थित असणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांनी या महिलेला तीन वेळा लस दिली. एकाच वेळी तीन डोस दिल्याने ही महिला घाबरली. घरी आल्यावर तिने हा प्रकार पतीला सांगितला.
स्थानिक नगरसेविकेला हा प्रकार कळताच त्यांनी याबाबत संबंधित अधिकाऱ्याला विचारले. मात्र, त्यांच्याकडून त्यांना उडवाउडवीची उत्तरं मिळाली. जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न ठाणे महापालिकेचे अधिकारी आणि डॉक्टर करत असल्याचा आरोप भाजपकडून करण्यात आला आहे.
या संदर्भात पालिका अधिकाऱ्यांना विचारले असता असा कोणताही प्रकार झाला नसल्याचे सांगण्यात आले. तरीही यासाठी एक कमिटी नेमली जाईल आणि चौकशी करण्यात येईल, असं त्यांनी सांगितले. तर चौकशी करून संबंधितांवर कारवाई केली जाईल, असं महापौर नरेश म्हस्के यांनी सांगितलं आहे.
हेही वाचा -
महापालिकेच्या शाळांमध्येही डिजिटल वर्ग सुरू होणार
२६/११ हिरो तुकाराम ओंबळे यांचा अनोखा सन्मान, नव्या कोळी प्रजातीला दिले नाव