Advertisement

औषध दुकानदारांना जेनेरिक औषधांची सक्ती


औषध दुकानदारांना जेनेरिक औषधांची सक्ती
SHARES

रूग्णांना स्वस्तात गुणकारी औषध उपलब्ध व्हावीत, या उद्देशानं केंद्र सरकारनं जेनेरीक औषधांना प्रोत्साहन देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार देशभरात जनऔषधी केंद्र सुरू करत त्याद्वारे जेनेरीक औषधं रूग्णापर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न एकीकडे होत आहे. तर दुसरीकडे डाॅक्टरांनाही जेनेरीक औषध लिहून देणं बंधनकारक करण्यात आलं आहे.

आता त्यापुढं जात केंद्र सरकारनं औषध दुकानदारांनाही जेनेरिक औषधांची सक्ती केली आहे. प्रत्येक औषध दुकानामध्ये जेनेरीक औषधांसाठी स्वतंत्र रॅक, स्वतंत्र जागा ठेवावी असे आदेश नुकतेच ड्रग्ज कंट्रोलर आॅफ इंडिया (औषध नियंत्रक) कडून देशभरातील औषध दुकानांना देण्यात आले आहेत. त्यामुळं आता प्रत्येक औषध दुकानात जेनेरीक औषधं उपलब्ध होणार आहेत.


कायद्याचं पालन नाही

सरकारच्या जनऔषधी केंद्र योजनेंतर्गत सुरू करण्यात आलेल्या दुकानांमध्ये फक्त आणि फक्त जेनेरीक औषधांचीच विक्री होते. मुंबईत अशी काही जनऔषधी केंद्र सुरू झाली आहेत. पण मुंबईसह देशभर जनऔषधी केंद्रांना म्हणावा तसा प्रतिसाद मिळत नसल्यानं रूग्णांना स्वस्त औषध उपलब्ध होत नसल्याचं चित्र आहे. तर दुसरीकडे डाॅक्टरांना जेनेरीक औषधं लिहून देणं बंधनकारक असतानाही डाॅक्टर मात्र अजूनही या कायद्याचं पालन करत नसल्याचं चित्र अाहे. त्यामुळं जेनेरीक औषधे उपलब्ध होत नाहीत.  


औषधांसाठी स्वतंत्र रॅक

या सर्व बाबी लक्षात घेत औषध नियंत्रक डाॅ. इस्वरा रेड्डी यांनी आता देशभरातील सर्वच औषध दुकानांच्या माध्यमातूनही आता जेनेरीक औषधे उपलब्ध व्हावीत या हेतूनं औषध दुकानांनाही जेनेरीकची सक्ती केली आहे. त्यानुसार १२ जुन रोजी यासंंबंधीचं एक पत्रच जारी केलं असून त्याद्वारे देशभरातील औषध दुकानदारांना जेनेरीक औषधांसाठी स्वतंत्र जागा वा स्वतंत्र रॅकची सोय दुकानात करण्याचे आदेश दिले आहेत. तर हा रॅक आणि त्यावरील औषधं रूग्णांना-नातेवाईकांना दिसायला हवीत असंही या पत्रात म्हटलं आहे.

सक्ती योग्य

औषध नियंत्रकांच्या या निर्णयावर औषध दुकानदारांनी आणि फर्मासिस्टंनी संमिश्र प्रतिक्रिया दिली आहे. स्वस्त आणि गुणकारी औषधं मिळणं हा खरं तर रूग्णांचा अधिकारच आहे. त्यासाठी जेनेरीक औषधांना प्रोत्साहन द्यायलाच हवं. त्यामुळं औषध दुकानदारांना जेनेरीक सक्ती करणंही योग्य आहे.

 पण ही केवळ एक मलमपट्टी ठरणार आहे. कारण मुळात डाॅक्टरांनी जेनेरीक औषधं लिहून दिली तर रुग्णांना जेनेरीक औषध मिळतीलच. पण डाॅक्टरच जेनेरीक औषधं लिहून देत नसल्यानं आम्ही जेनेरीक औषधं ठेवली तरी त्याचा काहीही फायदा होणार नाही, अशी प्रतिक्रिया फार्मासिस्ट शशांक म्हात्रे यांनी मुंबई लाइव्हशी बोलताना दिली आहे.



हेही वाचा -

प्रशिक्षणार्थी डॉक्टरांचं 'कामबंद आंदोलन' सुरु !

आयुर्वेदाच्या साथीने कॅन्सरवर करा मात !



 

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा