Advertisement

राज्यातील सर्व सरकारी-खासगी महाविद्यालयांत सोमवारपासून लसीकरण

महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांसाठी २५ ऑक्टोबर ते २ नोव्हेंबरदरम्यान विशेष लसीकरण मोहीम राबविण्यात येणार आहे.

राज्यातील सर्व सरकारी-खासगी महाविद्यालयांत सोमवारपासून लसीकरण
SHARES

महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांसाठी २५ ऑक्टोबर ते २ नोव्हेंबरदरम्यान विशेष लसीकरण मोहीम राबविण्यात येणार आहे. यामध्ये कला, वाणिज्य, विज्ञान शाखा असलेल्या पारंपरिक महाविद्यालयांबरोबरच अभियांत्रिकी, वैद्यकीय आदी व्यावसायिक अभ्यासक्रम राबविणाऱ्या राज्यातील सर्व सरकारी-खासगी महाविद्यालयांतील सर्व विद्यार्थ्यांचं लसीकरण केलं जाणार आहे.

सार्वजनिक आरोग्य, उच्च व तंत्रशिक्षण आणि वैद्यकीय शिक्षण विभागातर्फे राबविण्यात येणाऱ्या या मोहिमेत ४० लाख विद्यार्थ्यांचे लसीकरण करण्याचे उद्दिष्ट असल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केलं. उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत आणि आरोग्य संचालक अर्चना पाटील यावेळी उपस्थित होते.

राज्यभर राबविल्या जाणाऱ्या युवा स्वास्थ्य कोरोना लसीकरण मोहीमे’त राज्यभरातील सुमारे पाच हजार महाविद्यालये केंद्रस्थानी ठेवून विद्यार्थ्यांचे आणि महाविद्यालयातील शिक्षक-शिक्षके तर कर्मचाऱ्यांचे लसीकरण करण्यात येईल. २० ऑक्टोबरला महाविद्यालये सुरू झाली. मात्र, २ लसमात्रा घेतलेल्या विद्यार्थ्यांनाच प्रत्यक्ष वर्गात उपस्थित राहता येणार आहे. त्यामुळे अनेक महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांची उपस्थिती नगण्य आहे. त्यामुळे १८ ते २५ वर्षे हा वयोगट लक्षात घेऊन विद्यार्थ्यांच्या लसीकरणाला या मोहिमेदरम्यान वेग दिला जाईल, असे टोपे यांनी स्पष्ट केलं.

लसीकरण मोहीम सुरू करण्यापूर्वी सर्व महाविद्यालयांकडून एकूण लसपात्र विद्यार्थी संख्या, त्यापैकी पहिली मात्रा घेतलेले, दोन्ही मात्रा घेतलेल्या विद्यार्थ्यांची माहिती मागविण्यात येणार आहे. सर्व शिक्षण संचालकांना त्या दृष्टीने सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच, लसीकरणाच्या दिवशी नोंदणी, प्रत्यक्ष लसीकरण आणि लस घेतलेल्यांकरिता प्रतीक्षालय अशी व्यवस्था महाविद्यालयात केली जाईल. 

लसीकरण केंद्राकरिता महाविद्यालयांनी आवश्यक ते मनुष्यबळ पुरवायचे आहे. याशिवाय रुग्णवाहिका, डॉक्टर, परिचारिका आदी मनुष्यबळ आरोग्य विभागामार्फत पुरविले जाईल, असे टोपे यांनी सांगितले. विद्यार्थ्यांमध्ये लसीकरणाबाबत जागरूकता निर्माण करण्याकरिता महाविद्यालयांनी मोहीम राबविण्याचे आवाहन टोपे यांनी केलं.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा