Advertisement

मासिक पाळीवर मोकळेपणानं बोला!


मासिक पाळीवर मोकळेपणानं बोला!
SHARES

जागतिक आरोग्य संघटनेने 28 मे हा दिवस ‘जागतिक मासिक पाळी स्वच्छता दिन' म्हणून जाहीर केला आहे. यानिमित्ताने स्त्रियांमध्ये, किंबहुना पुरुषांमध्ये जागृती व्हावी यासाठी रविवारी महिला आणि बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमात मासिक पाळी व्यवस्थापन उपक्रमाची माहिती, प्रसार आणि जनजागृती यावर माहिती दिली जाणार आहे. महिला बालविकास विभाग आणि युनिसेफच्या वतीने या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. मुलींमध्ये मासिक पाळीविषयी जनजागृती होण्यासाठी, तसंच मासिक पाळीच्या कालावधीत स्वच्छतेची काळजी कशाप्रकारे घ्यावी? याविषयी मार्गदर्शन केलं जाणार आहे.

आपण कितीही प्रगती केली असली तरी आजही मासिक पाळी या विषयावर तितकीशी चर्चा केली जात नाही. मासिक पाळी येणं खरंतर एका महिलेच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचं असतं. पण, आपण आजही या विषयावर मोकळेपणाने बोललं जात नाही. म्हणूनच याविषयी महिलांना मोकळेपणाने बोलता यावं यासाठी 28 मे हा दिवसच 'मासिक पाळी स्वच्छता दिन' म्हणून जाहीर करण्यात आला आहे.

आजही कित्येक महिला, मुली मासिक पाळी आली की सॅनिटरी नॅपकिन्स वापरत नाहीत. सॅनिटरी नॅपकिन्सच्या वापराचे महत्त्व माहीत नसणे किंवा सॅनिटरी नॅपकिन्सची वाढलेली किंमत ही यामागची दोन मुख्य कारणं असू शकतात. यामुळेच महिलांच्या आरोग्याचा प्रश्न देखील गंभीर बनला आहे. नुकत्याच झालेल्या एका सर्वेक्षणातून शहरातील केवळ 12 टक्के आणि ग्रामीण भागातील अवघ्या 2 टक्के महिलाच सॅनिटरी नॅपकिनचा वापर करत असल्याचं धक्कादायक वास्तव समोर आलं आहे. एकीकडे अनेक शाळांमध्ये, संस्थांमध्ये वयात आलेल्या मुलींना सॅनिटरी नॅपकिन्स वापरण्याची माहिती दिली जात असतानाच, दुसरीकडे त्याच सॅनिटरी नॅपकिन्सवर मोठ्या प्रमाणात करही आकारण्यात आला आहे.

मासिक पाळी स्वच्छता दिन' केवळ एक दिवस साजरा न करता दररोज महिलांनी आपल्या शरीराची, अवयवांची काळजी घेतली पाहिजे. जेणेकरुन महिलांचं आरोग्य चांगलं राहू शकेल. आणि महिलांसोबत पुरुषांनीही याबाबत तेवढंच जागरुक राहिलं पाहिजे. तसंच याविषयी सरकारनेही तेवढंच लक्ष दिलं पाहिजे. खरंतर सरकारने महिलांच्या आरोग्याकडे दुर्लक्षच केलं आहे. ग्रामीण भागात महिलांना माहितचं नसतं सॅनिटरी नॅपकिन्स वगैरे काय किंवा ते कसे वापरावेत? सरकारला गरज आहे ग्रामीण भागात जनजागृती करण्याची. दुसऱ्या देशात सॅनिटरी नॅपकिन्स मोफत वाटप केले जातात आणि महाराष्ट्रात तसं काहीही केलं जात नाही. सरकारने महिलांचं आरोग्य हा विषय खरंच गांभीर्याने घेतला पाहिजे आणि सॅनिटरी नॅपकिन्सवर लावलेला कर यावर तर आमचा विरोध कायम आहे. पुढच्या 10 दिवसांत याविषयी सरकारने निर्णय घेतला पाहिजे.
शालिनी ठाकरे, महाराष्ट्र नवनिर्माण सेना

असे दिवस वगैरे साजरे करुन काहीही होणार नाही. मुळात या पाच-सहा दिवसांमध्ये महिलांकडे बघण्याची मानसिकता बदलली पाहिजे. जेणेकरुन त्या महिलेला त्या दिवसांमध्ये अवघड किंवा लाजिरवाणं वाटणार नाही. तसंच राज्य सरकारने सॅनिटरी नॅपकिन्सवर लावलेला कर याचा फायदा फक्त सरकारलाच होणार आहे. ज्या भागात सॅनिटरी नॅपकिन्स पोहोचतच नाहीत किंवा ज्या महिलांना याबाबत माहितच नाही त्यांचं काय?
ओवी साळवे

एकीकडे सरकार मासिक पाळी आणि त्यासाठी वापरले जाणारे सॅनिटरी नॅपकिन्स यासाठी जनजागृती करत आहे. पण, दुसरीकडे त्याच सॅनिटरी नॅपकीन्सवर कर वाढवून सरकार त्याची खिल्ली उडवतेय.
करिष्मा भोईर

सरकारने कर वगैरे लावणं हा निर्णय मुळातच चुकीचा आहे आणि राहिला प्रश्न महिलांनी स्वच्छ राहण्याचा तर महिलांमध्ये आजही तेवढ्या प्रमाणात सॅनिटरी नॅपकिन्स किंवा मासिक पाळी याबाबत जागरुकता नाही. सरकारने खरंतर याकडे लक्ष दिलं पाहिजे. महिलांसाठी मासिक पाळी या विषयावर बोलणारे कार्यक्रम आयोजित केले पाहिजेत. महिलांनी जर या दिवसांमध्ये स्वत:ला स्वच्छ नाही ठेवलं, तर शरीराला इन्फेक्शन होण्याची जास्त शक्यता असते.
केतकी घरत

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा