Advertisement

धारावी मॉडेलचं जागतिक आरोग्य संघटनेकडून कौतुक

जागतिक आरोग्य संघटनेने (डब्लूएचओ) धारावीतील कोरोना रोखण्याच्या पॅटर्नचं कौतुक केलं आहे.

धारावी मॉडेलचं जागतिक आरोग्य संघटनेकडून कौतुक
SHARES

मुंबईतील धारावी हा कोरोनाचा हाॅटस्पाॅट झाला होता. मात्र, आता धारावीमधील कोरोना नियंत्रणात आला आहे. मुंबई महापालिका व राज्य सरकारनं केलेल्या अथक प्रयत्नांमुळे धारावी परिसर कोरोनापासून मुक्त होण्याच्या मार्गावर आहे. जागतिक आरोग्य संघटनेने आता याची दखल घेतली आहे. जागतिक आरोग्य संघटनेने (डब्लूएचओ) धारावीतील कोरोना रोखण्याच्या पॅटर्नचं कौतुक केलं आहे.

 जागतिक आरोग्य संघटनेनं एका ट्विटच्या माध्यमातून जगभरात कोरोनाविरोधात राबवण्यात येत असलेल्या आक्रमक उपाययोजनांचं कौतुक केलं आहे.  केवळ राष्ट्रीय एकात्मता आणि जागतिक ऐक्यातून या साथीला प्रतिबंध केला जाऊ शकतो, असं डब्लूएचओनं म्हटलं आहे. डब्लूएचओचे महासंचालक म्हणाले की, 'जगभरात अशी अनेक उदाहरणे आहेत की कोरोनाचा उद्रेक कितीही मोठा असला तरी तो नियंत्रणात आणला गेलेला आहे. यापैकी काही उदाहरणे इटली, स्पेन आणि दक्षिण कोरिया आणि धारावीमध्येही आढळतात.


संयुक्त राष्ट्रांचे आरोग्य प्रमुख म्हणाले की, मुंबईतील या झोपडपट्टी परिसरातील लोकांची चाचणी, ट्रेसिंग, सामाजिक अंतर आणि संक्रमित रुग्णांवर त्वरित उपचार करण्याच्या पद्धतीमुळे धारावी कोरोनावर विजय मिळवण्याच्या मार्गावर आहे. डब्ल्यूएचओ महासंचालकांनी धारावी मॉडेलचं कौतुक करताना नेतृत्व, समाजाचा सहभाग आणि सामूहिक एकता यावर जोर दिला. ते म्हणाले, "ज्या देशांमध्ये वेगवान विकास आहे, तेथील निर्बंध कमी होत आहेत आणि आता प्रकरणे वाढू लागली आहेत. आम्हाला नेतृत्व, समाजाचा सहभाग आणि सामूहिक एकता ठेवणे आवश्यक असल्याचंही त्यांनी नमूद केलं.

शुक्रवारी धारावीत अवघे १२ नवे रुग्ण सापडले आहेत. सध्या धारावी येथे १६६ रुग्णांवर उपचार सुरू असून आतापर्यंत १,९५२ रुग्णांना रुग्णालयातून सोडण्यात आले आहे. धारावी ही आशियातील सर्वात मोठी झोपडपट्टी असून, अडीच चौरस किलोमीटर क्षेत्रात ती पसरली आहे, जेथे जवळपास ६.५ लाख लोक राहतात.




संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा