Advertisement

जागतिक ह्रदय दिन विशेष - एका ह्रदयाची किंमत!


जागतिक ह्रदय दिन विशेष - एका ह्रदयाची किंमत!
SHARES

चार वर्षांचा निरागस जीव..आणि त्या कोवळ्या जिवाचा दोन वर्षांचा संघर्ष...एका ह्रदयासाठी! आराध्यासाठी त्या एका ह्रदयाची किंमत काही हजार, लाख किंवा करोड नव्हती...तिच्यासाठी त्या एका ह्रदयाची किंमत तिचा जीवच होती! मुळे कुटुंबीय, नातेवाईक, हितचिंतक, मित्रपरिवार, उपचार करणारे डॉक्टर अशा सर्वांच्या प्रयत्नांना दोन वर्षांनंतर यश आलं आणि एक निष्पाप जीव वाचला...एका ह्रदयामुळे...आराध्या आणि तिच्या आप्तस्वकीयांसाठी त्या एका ह्रदयाची काय होती किंमत? जागतिक ह्रदय दिनाच्या निमित्ताने त्या एका ह्रदयाची ही गोष्ट!

आधी पैसा आणि नंतर आराध्याला मॅच होणारं ह्रदय या दोन गोष्टींसाठी तब्बल दोन वर्ष तिचे कुटुंबीय आणि डॉक्टर सतत प्रयत्न करत होते. यासाठी देशभर शिबीर राबवलं गेलं. व्हॉट्सअॅपचे ग्रुप तयार करण्यात आले. सगळ्यांची एकच भावना, ईच्छा, अपेक्षा होती..आराध्याला ह्रदय मिळावं. अखेर गुजरातहून ह्रदयदाता मिळाला आणि फोर्टिस रुग्णालयात ह्रदय मागवून तिच्यावर प्रत्यारोपणाची यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली.


एकट्याने शक्य झालं नसतं...

पैसा, डॉक्टर, वैद्यकीय मदत या गोष्टी तर झाल्याच. पण या संघर्षाच्या काळात मिळाले नातेवाईक आणि आप्तस्वकीयांची साथ आराध्याच्या वडिलांना मोलाची वाटते...


कसं सांगू मी?...तिचं आणि आमचं त्या एका विचाराने पूर्ण जीवन थांबलं होतं. आराध्याच्या जगण्याच्या इच्छाशक्तीकडे बघून मला प्रेरणा मिळत होती. मला माहीत होतं, की तिला काही होणार नाही. तिला ह्रदय मिळाल्यामुळे ती एक चांगलं जीवन जगू शकते. पण हे सगळं मला एकट्याने शक्यच नव्हतं. आराध्याला ह्रदय मिळावं म्हणून प्रत्येक जण देवाकडे प्रार्थना करत होता. वेगवेगळे कॅम्प्स, मीडिया, मित्र प्रत्येकाने आराध्याच्या ह्रदयासाठी प्रयत्न केले. ज्यामुळे याचं क्रेडीट हे प्रत्येकाला जातं.

योगेश मुळे, आराध्याचे वडील


पैसा असूनही ह्रदय मिळत नव्हतं...

योगेश मुळे यांच्या मित्रपरिवाराने यासाठी प्रयत्नांची पराकाष्टा केली. पैसा उभा केला...पण, हवं तसं ह्रदय मिळत नव्हतं. त्यामुळे आराध्याला ह्रदय मिळालं तो दिवस त्यांना सोन्यासारखा वाटतो...


शब्दात नाही सांगू शकत. ज्यावेळी तिला ह्रदय मिळालं, तो दिवस सोनेरी दिवस होता! आमचं बाळ आम्हाला सुखरुप परत मिळालं. दीड वर्षांचा हा प्रवास खरंतर खडतर होता. तिला हवं तसं ह्रदय मिळत नव्हतं. 3 वेळा ह्रदय मिळालं देखील. पण ते तिला देऊ शकत नव्हते. आम्ही सतत वाट बघायचो 'तिच्यासाठी ह्रदयदाता मिळाला' अशा कॉलची. त्यामुळे तिच्या ह्रदयाची किंमत शब्दांत सांगणं कठीण आहे.

अर्जुन थोरात, योगेश मुळे यांचे मित्र


आराध्याचा संघर्ष सार्थकी ठरला!

एकीकडे आराध्याचे सर्व नातेवाईक तिच्यासाठी ह्रदय मिळावं यासाठी प्रयत्न करत होते, तर दुसरीकडे आराध्याचा स्वत:चा संघर्ष सुरु होता. ती दर 15 दिवसांनी डॉक्टरकडे जात होती. त्यातून 4 दिवस तर ती अॅडमिट असायची. अश्विनी कवडेंसाठी आराध्याचा संघर्ष त्या ह्रदयाच्या रुपाने सार्थकी लागला.


मी खूप खूष होते. तो दीड वर्षांचा आराध्यासोबतचा संघर्षपूर्ण प्रवास सार्थकी ठरला. मी तिचा प्रवास पाहिला आहे. दिवसातून आठ वेळा तिला औषधं घ्यावी लागत होती. ज्याने तिला ह्रदय दान केलं, त्याचे आई-वडील खरंच देव आहेत. 

आश्विनी कवडे, मुळे कुटुंबाच्या हितचिंतक


अशा अनेक आराध्या आहेत याची जाणीव...

आराध्याचे मामा कमलाकर जाधव यांनी त्या एका ह्रदयासाठी आणि त्यासाठी लागणाऱ्या खर्चासाठी कॅम्प राबवणे, डोनेशन गोळा करणे असा बराच खटाटोप केला. पण त्या एका ह्रदयामुळे अशा अनेक आराध्या असल्याची जाणीव त्यांना झाली.


हा आराध्याचा दुसरा जन्म आहे. दोन्ही फॅमिलीचा सपोर्ट मिळाला. आराध्याच्या नावाने 'सेव्ह आराध्या' हे कॅम्प आम्ही लातूरमध्येही राबवले. तिथूनही काही डोनेशन मिळालं. फक्त ही एकटीच आराध्या नाही, अशा अनेक आराध्या आहेत, ज्यांना आजही अवयवांची गरज आहे, याची जाणीव झाली. त्यामुळे जास्तीत जास्त लोकांनी अवयव दान केलंच पाहिजे. 

कमलाकर जाधव, आराध्याचे मामा


दुसऱ्या बाळाचा जीव गेल्याचं दु:ख...

आराध्याला मिळालेलं ह्रदय हे 14 महिन्यांच्या ब्रेनडेड बाळाचं आहे. आराध्याचं कुटुंब, आप्तस्वकीय आराध्याला ह्रदय मिळालं म्हणून आनंदी होते. तिच्या डॉक्टरांनाही ही बाब तितकीच सुखावणारी होती. पण त्याचवेळी ज्या बाळाचंच ह्रदय आराध्याला मिळालं, त्याचा जीव गेला याची दु:खद जाणीवही डॉक्टरांना आहे...

आराध्याच्या बाबांचा सतत कॉल यायचा ह्रदयासाठी. पण तिच्या वयाचं म्हणजे छोट्या वयाचं ह्रद्य मिळत नव्हतं. आम्ही सतत प्रयत्न करत होतो. जेव्हा जेव्हा ह्रदय यायचं आधी तिचा विचार करायचो. आणि अशा केसेसमध्ये फक्त ब्रेनडेड मुलाचंच ह्रदय आवश्यक होतं. ते मिळाल्यानंतर आम्ही खूष झालो. पण, दु:खही तेवढंच होतं की एका छोट्या बाळाचा जीव गेला होता. संमिश्र भावना होत्या त्या!  

डॉ. नीरव मंडलेवाला, मुख्य कार्यकारी अधिकारी, डोनेट लाईफ संस्था, गुजरात


यातल्या प्रत्येकानं आराध्याच्या ह्रदयासाठी प्रचंड मेहनत घेतली, मर्यादांच्या पलीकडे जाऊन प्रयत्न केले. आणि दोन वर्षांनंतर त्यांच्या प्रयत्नांना यश आलं. पण त्यांच्यासाठी आराध्याचं ह्रदय हे फक्त एका अवयवापेक्षाही खूप काही जास्त होतं. जे सांगताना त्यातल्या प्रत्येकाकडेच शब्द तोकडे पडत होते. पण भावना मात्र अमर्याद होत्या. त्या एका ह्रदयाची किंमत त्यांना पुरेपूर कळली होती!



हे ही वाचा -

'सेव्ह आराध्या' मोहीम


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा