Advertisement

किडनीविकारतज्ज्ञांची 'एक चम्मच कम' मोहीम

शहरी भागात राहणाऱ्या १७ टक्के लोकांना मूत्रपिंडाचा विकार असल्याचं समोर आलंं आहे. जेवणात मीठाचं प्रमाण जास्त असल्यानेही मूत्रपिंडाचा विकार होण्याची शक्यता असते. त्यामुळे लोकांनी आहारात मीठाचं प्रमाण कमी करावं, यासाठी 'एक चम्मच कम' मोहीम राबवण्यात येत आहे.

किडनीविकारतज्ज्ञांची 'एक चम्मच कम' मोहीम
SHARES

धावपळीच्या जीवनशैलीमुळे मूत्रपिंड विकार होण्याचं प्रमाणही वाढत आहे. याच पार्श्वभूमीवर शहरातील १५० किडनीविकारतज्ज्ञांनी एकत्र येऊन विकाराबाबत जनजागृती करण्यासाठी ‘एक चम्मच कम’ मोहीम हाती घेतली आहे. डॉ. भूपेंद्र गांधी यांच्या अमर गांधी फाऊंडेशन आणि मुंबई किडनी फाऊंडेशनने ही मोहीम सुरू केली आहे.

शहरी भागात राहणाऱ्या १७ टक्के लोकांना मूत्रपिंडाचा विकार असल्याचं समोर आलंं आहे. जेवणात मीठाचं प्रमाण जास्त असल्यानेही मूत्रपिंडाचा विकार होण्याची शक्यता असते. त्यामुळे लोकांनी आहारात मीठाचं प्रमाण कमी करावं, यासाठी ही मोहीम राबवण्यात येत आहे.


किडनीविकार तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार,

  • जागतिक आरोग्य संघटनेच्या माहितीनुसार, जगभरात ३० वर्षांवरील ८ ते १६ टक्के प्रौढांना मूत्रपिंडाचा आजार आहे.
  • डॉ. अजय सिंह यांच्या संशोधनानुसार देशभरात शहरी भागात १७ टक्के नागरिक मूत्रपिंड विकाराने ग्रस्त आहेत.
  • भारतात मूत्रपिंड विकाराने त्रस्त रुग्णांपैकी ६० टक्के रुग्ण मधुमेह किंवा हायपरटेन्शनने आजारी असतात.


मधुमेह मूत्रपिंड विकाराचं प्रमुख कारण आहे. भारतात ७० लाखांच्या आसपास रुग्ण टाईप-२ प्रकारातील मधुमेहा विकाराने त्रस्त आहेत. २०४० पर्यंत ही संख्या १४० लाखांपर्यंत पोहोचण्याची भीती व्यक्त केली जात आहे. त्यात ३० ते ४० टक्के रुग्णांना मूत्रपिंडाचा विकार होण्याची शक्यता आहे.

लठ्ठपणा आणि उच्च रक्तदाब किंवा हायपरटेन्शनही मूत्रपिंड विकार होण्यास कारणीभूत ठरतात.

महिलांना खासकरून बाहेरचं खाण्याची जास्त सवय असते. काहीतरी चटपटीत म्हणून महिला बाहेरचं खातात. पण, यात जास्त प्रमाणात मीठ असतं. ज्यामुळे महिलांनी मीठ खाण्याबाबत काळजी घेतली पाहिजे, असं मुंबई किडनी फाऊंडेशनचे किडनी विकारतज्ज्ञ डॉ. उमेश खन्ना सांगतात.


मधुमेह, उच्च-रक्तदाब, हृदयविकार आणि लठ्ठपणाने ग्रस्त असलेल्यांनी किडनीविकार होण्याची शक्यता दाट असते. त्यामुळे संसर्गजन्य आजार असलेल्या रुग्णांनी वेळोवेळी किडनीची तपासणी केली पाहिजे.
- डॉ. भावेश वोरा, ज्येष्ठ किडनी विकारतज्ज्ञ

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा