Advertisement

जागतिक यकृत दिन- यकृताचे विकार पुरुषांमध्ये जास्त


जागतिक यकृत दिन- यकृताचे विकार पुरुषांमध्ये जास्त
SHARES

पचनक्रिया, रक्तसंचारण क्रियेमध्ये यकृताची महत्वाची भूमिका असते. खाल्लेल्या अन्नाचं पचन करणे त्यानंतर त्याचं रस, रक्ताचं धातूत रुपांतर करण्यासाठी यकृताचं महत्वपूर्ण योगदान आहे. त्यामुळे यकृताची काळजी घेणं हे सर्वात महत्त्वाचं आव्हान आज आपल्यासमोर आहे. यकृताबद्दल हे सर्व सांगण्याचं कारण म्हणजे दरवर्षी १९ एप्रिल हा दिन जागतिक यकृत दिन म्हणून पाळला जातो.


एसआरएल डायग्नॉस्टिक्सच्या अहवालानुसार

भारतातील अन्य भागांच्या तुलनेत उत्तरेकडील राज्यांमधील व्यक्तींमध्ये निदान न झालेल्या यकृताशी संबंधित आजारांचं प्रमाण मोठं असू शकतं, असा अहवाल एसआरएल डायग्नॉस्टिक्स या चेनने जागतिक यकृत दिनानिमित्त दिला आहे. एसआरएल डायग्नॉस्टिकने वेगवेगळ्या चाचण्यांच्या निकालांचं विश्लेषण ४ मुख्य निकषांच्या आधारे केलं. यकृताच्या ३ मुख्य चाचण्यांनी महिलांच्या तुलनेत पुरुषांमध्ये अधिक दोष असल्याचं या अहवालातून समोर आलं आहे,

एसआरएल डायग्नॉस्टिक्सने यकृताचं कार्य तपासण्यासाठी २൦१५ ते २൦१७ या कालावधीत भारतभर एसआरएल लॅब्जमध्ये करण्यात आलेल्या ४.२४ लाखांहून अधिक चाचण्यांच्या मदतीने ही माहिती जाहीर केली आहे.


बिलिरुबिन म्हणजे काय?

ऑनलनाइन अमिनोट्रान्स्फेरेस, अॅस्पाट्रेट अमिनोट्रान्स्फेरेस, अल्कलाइन फॉस्फेट आणि सेरम बिलिरुबिन हे प्रमुख बायोमार्कर्स असून त्यांचा वापर यकृताच्या कार्यपद्धतीच्या बिघाडाच्या निदानामध्ये केला जातो. या एन्झाइम्सचं कार्य यकृतातील रुटीन आणि प्रमुख केमिकलच्या प्रतिक्रिया यांना चालना देण्यासाठी मदत होण्याच्या हेतूने केला जातो. यकृतातील पेशी खराब झाल्या की एंझाइम रक्तात येतात. जुन्या लाल रक्त पेशी तोडण्याची यकृताची सर्वसाधारण प्रक्रिया झाल्याचा परिणाम म्हणजे बिलिरुबिन.

यकृत निरोगी असल्याने बिलिरुबिनपासून लवकर मुक्त होते, पण निरोगी नसल्यास ते बिलिरुबिन पुन्हा रक्तात सोडते. विश्लेषण करण्यात आलेल्या २३.३८ टक्के व्यक्तींच्या नमुन्यात नॉर्मल प्रमाणापेक्षा उच्च एसजीपीटी आढळलं, तर १८.७२ टक्के व्यक्तींच्या नमुन्यात नॉर्मल प्रमाणापेक्षा उच्च एसजीओटी आढळलं, तर १६.८४ टक्के व्यक्तींच्या नमुन्यात नॉर्मल प्रमाणापेक्षा उच्च एएलपी आढळलं.


पुरुषांमध्ये हे प्रमाण जास्त

स्त्री-पुरुष यानुसार केलेल्या विश्लेषणात, पुरुषांमध्ये एसजीपीट आणि एसजीओटी प्रमाण उच्च (अनुक्रमे २८.५९ टक्के आणि २൦.९९ टक्के) होते. त्या तुलनेत स्त्रियांमध्ये ते अनुक्रमे १५.९७ टक्के आणि १५.४७ टक्के होते. पुरुषांमध्ये बिलिरुबिन पातळी ही महिलांतील १३.४५ टक्केच्या तुलनेत अधिक (२१.८२टक्के) होती. महिलांमध्ये एएलपीचं प्रमाण पुरुषांच्या तुलनेत (१६.५९टक्के) थोडे अधिक (१७.१८टक्के) आढळलं. तरुण मंडळींमध्ये लिव्हर एंझाइम दोषांचे प्रमाण अधिक आढळलं. वयस्कर व्यक्तींमध्ये अल्बुमिनमध्ये आणि एकूण प्रोटिनविषयक दोष अधिक आढळलं.

डब्ल्यूएचओच्या (जागतिक आरोग्य संघटनेनुसार, विविध देशांमध्ये यकृताच्या आजारांमुळे मृत्यू होण्याचं प्रमाण खूप जास्त आहे. देशांच्या क्रमवारीत भारताचा क्रमांक १൦ वा आहे. तसंच, लिव्हर सायऱ्हॉसिसच्या स्वरुपामध्ये कमालीचं बदल झालं असून, दरवर्षी अंदाजे १൦ लाख नव्या रुग्णांचं निदान केलं जातं.

वाढती स्थूलता, अल्कोहोलचं व्यसन आणि यकृताच्या कार्यात अडथळे यामुळे भारतात यकृत विषयक आजार बळावले आहेत. यकृताचा आजार वयाशी संबंधित राहिलेला नाही. चाळीशीच्या खालील व्यक्तींनाही यकृताचे आजार होताना दिसत आहेत. पण, हा आजार प्रगत टप्प्यामध्ये पोहोचेपर्यंत त्याची लक्षणं सहसा दिसून येत नाहीत. त्यामुळे यकृत चांगलं राहण्यासाठी लवकरात लवकर आजाराचं निदान होणं महत्त्वाचं आहे.

- डॉ. बी. आर. दास, एसआरएल डायग्नॉस्टिक्सचे संशोधन व विकास विभागाचे सल्लागार


यकृताचे आजार होण्याची कारणं

  • संसर्ग - यकृताच्या संसर्गाचे सर्वसाधारण प्रकार होण्यासाठी हिपॅटायटिस व्हायरस ए, हिपॅटायटिस ई, हिपॅटायटिस बी आणि हिपॅटायटिस सी कारणीभूत ठरतात. सॅल्मोनेला टायफी आणि अमोबा हेही यकृत आजारासाठी कारण ठरतात.
  • मेटॅबोलिक - यकृतात फॅट साचणे (नॉनअल्कोहोलिक फॅट लिव्हर डिसिज).
  • व्यसन - अल्कोहोलचे बऱ्याच काळापासून व्यसन असल्यासही लिव्हर सायरॉसिस होऊ शकतो
  • प्रतिकारक्षमतेतील दोष: तुमची प्रतिकार यंत्रणा शरीरातील विशिष्ट भागांवर हल्ला करते, अशा आजारांमुळेही यकृतावर परिणाम होऊ शकतो.
  • ऑटोइम्युन हिपॅटायटिस, प्रायमरी बिलिअर सायऱ्हॉसिस आणि प्रायमरी स्केरॉसिंग कोलंगायटिस ही ऑटोइम्युन यकृत आजारांची उदाहरणे आहेत.
  • जेनेटिक्स: साधारणतः आढळणाऱ्या जेनेटिक यकृत आजारांमध्ये हेमोक्रोमॅटोसिस, विल्सन्स डीसज आणि अल्फा-१ अँटिट्रायप्सन डेफिशिअन्सी यांचा समावेश आहे
  • कॅन्सर आणि अन्य आजार: यकृताचा कॅन्सर आणि बाइल डक्ट कॅन्सर


अशी घ्या यकृताची काळजी

  • प्यायचे पाणी २० मिनिटांसाठी उकळून घ्या
  • केवळ फिल्टर केलेलं पाणी उकळवलेल्या पाण्याप्रमाणे सुरक्षित नसतं
  • शक्‍यतो कोमट पाणी प्या
  • उघड्यावरचं, ताजे असल्याची खात्री नसलेले अन्न खाणं टाळ
  • जेवणाच्या वेळा नियमित असण्यावर भर द्या
  • रात्री लवकर व पचण्यास सोपे अन्न घ्या
  • आठवड्यातून एक दिवस रात्रीच्या जेवणाला सुट्टी देणे
  • पचनसंस्था आणि यकृताला शिल्लक राहिलेले काम पूर्ण करण्यास वाव द्या
  • १५ दिवसांतून एकदा त्रिफळा चूर्ण किंवा एरंडेल तेल घ्या
  • पस्तिशीनंतर दर पाच वर्षांनी एकदा शास्त्रोक्‍त पद्धतीने विरेचन घेऊन शरीरातील विषद्रव्यांचा निचरा होऊ द्या
  • कृत्रिम प्रिझर्वेटिव्ह्‌ज टाकलेले खाद्य-पेय पदार्थ टाळा
  • रासायनिक द्रव्यांनी युक्‍त औषधे, उत्पादने टाळा
  • चालणे, पोहणे, योगासने वगैरे प्रकृतीला साजेसा व्यायाम नियमितपणे करा
  • अनुलोम-विलोम, ॐ कार गुंजनाचा रोजच्या दिनक्रमात समावेश करा
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा