Advertisement

जागतिक क्षयरोग दिन- फुफ्फूसाच्या क्षयरोगासाठी शस्त्रक्रिया महत्त्वाची!

औषधांना दाद न देणारा असा सध्याचा टीबी आजार आहे. त्यामुळे औषधांसोबत शस्त्रक्रिया करणंही तेवढंच महत्त्वाचं असल्याचं मत 'कन्सल्टंट थोरॅसिक सर्जन डॉ. अमोल भानुशाली' यांनी व्यक्त केलं आहे. भारतातील क्षयरोगाची सद्याची स्थिती आणि क्षयरोगाच्या उपचारात शस्त्रक्रियेची वाढती भूमिका यावर त्यांनी प्रकाश टाकला.

जागतिक क्षयरोग दिन- फुफ्फूसाच्या क्षयरोगासाठी शस्त्रक्रिया महत्त्वाची!
SHARES

२४ मार्च हा दिवस दरवर्षी जागतिक क्षयरोग दिन म्हणून पाळला जातो. मुंबईसारख्या धावत्या शहरात टीबीच्या रुग्णांचं प्रमाण वाढत आहे. औषधांना दाद न देणारा असा सध्याचा टीबी आजार आहे. त्यामुळे औषधांसोबत शस्त्रक्रिया करणंही तेवढंच महत्त्वाचं असल्याचं मत 'कन्सल्टंट थोरॅसिक सर्जन डॉ. अमोल भानुशाली' यांनी व्यक्त केलं आहे. भारतातील क्षयरोगाची सद्याची स्थिती आणि क्षयरोगाच्या उपचारात शस्त्रक्रियेची वाढती भूमिका यावर त्यांनी प्रकाश टाकला.


क्षयरोग म्हणजे नेमकं काय ?

क्षयरोग (टीबी) हा एक संभाव्यतः गंभीर संसर्गजन्य आजार आहे. Mycobacterium Tuberculosis Complex नावाच्या जिवाणूंच्या गटामुळे हा रोग होतो. बहुतेक रुग्णांमध्ये क्षयरोग फुफ्फूसावर परिणाम करतो. त्यामुळे फुफ्फूसाचा क्षयरोग आहे, असं म्हटलं जातं. पण, क्षयरोग हा शरीराच्या कोणत्याही भागावर परिणाम करू शकतो. जसं- मेंदू, पाठीचा कणा, जठर, Lymph nodes इत्यादी (अतिरिक्त फुफ्फुसाचा क्षयरोग)


क्षयरोगाचे निदान कसं केलं जातं?

कुणालाही १५ दिवसापेक्षा जास्त, ओला खोकला, ताप, खोकल्यातून रक्त येणं, छातीत दुखणं, वजन कमी होणं, भूक कमी होणं, यांपैकी कोणतीही लक्षणं आढळून आल्यास क्षयरोगासाठी आवश्यक त्या तपासण्या कराव्यात. डॉक्टरांकडून वैद्यकीय तपासणी, छातीचा एक्स-रे आणि थुंकीची तपासणी करणं आवश्यक आहे.


शस्त्रक्रियेची भूमिका काय?

अलिकडे एमडीआर आणि एक्सडीआर टीबीच्या वाढत्या उद्रेकामुळे जीवघेणी स्थिती निर्माण झाली आहे. सध्या टीबीवर औषधं उपलब्ध असली, तरी क्षयरोगाचे जीवाणू या औषधांना प्रतिकार करत आहेत. त्यामुळे शत्रक्रिया करण्याचा पर्याय सध्या उपलब्ध आहे. टीबीची औषधे क्षयरोगामुळे खराब झालेल्या फुफ्फूसाच्या भागावर प्रभाव करत नाहीत. खराब झालेला फुफ्फुसाचा भाग किंवा पूर्ण फुफ्फूस काढून टाकण्यासाठी शस्त्रक्रिया करण्यात येते.

अशा प्रकारे जीवाणूंचा भाग काढून टाकण्यात येतो आणि निरोगी फुफ्फूसाला संसर्ग होण्यापासून वाचवता येतं. पुढील औषधोपचाराने शिल्लक जीवाणू नष्ट होतात, अशा प्रकारे शस्त्रक्रियेनंतर रुग्णाला क्षयरोगापासून मुक्त करता येते. तर, सध्या एमडीआर आणि एक्सडीआर टीबीच्या रुग्णांवर उपचार करण्यासाठी औषधे आणि शस्त्रक्रिया यांचा संयुक्तपणे वापर करण्याचा दृष्टीकोन आहे.


शस्त्रक्रियेची गरज केव्हा?

क्षयरोगाच्या निदानापासून ते क्षयरोगाच्या अडचणी बऱ्या करण्यापर्यंत शस्त्रक्रिया आपली भूमिका बजावू शकते. ज्या रुग्णाचा क्षयरोग प्रतिबंधक औषधांनी (ATT) आजार बरा होत नसेल त्याने शस्त्रक्रियेविषयी सल्ला नक्कीच घ्यावा. डब्लूएचओने दिलेल्या अहवालानुसार, रुग्ण क्षयरोग प्रतिबंधक औषध (ATT) ला प्रतिसाद देत नसल्यास शस्त्रक्रियेचा विचार करावा. म्हणजेच जर ATT उपचाराच्या ६ महिन्यानंतर सुद्धा थुंकी तपासणीत क्षयरोगाचे जीवाणू आढळून आले किंवा ATT उपचार सुरु असूनसुद्धा आजाराची स्थिती वाईट होत गेली किंवा रोग परतला तर शस्त्रक्रिया करावी.


कुठल्या अडचणी?

क्षयरोगातील अडचणी म्हणजे खोकल्यातून रक्त येणे, दृढ क्षयरोगाची पोकळी, पोकळीत बुरशीचा संसर्ग (aspergilloma). Broncho-pleural fistula होणं. फुफ्फूस संकुचित किंवा खराब झाल्यामुळे फुफ्फुसाचे प्रसरण पावणे किंवा योग्य कार्य करण्यापासून परावृत्त होणे. ह्या अडचणींवर शस्त्रक्रियेद्वारे उत्तम उपचार होऊ शकतो. अजून एक अडचण म्हणजे फुफ्फूस आणि बरगडयांच्यामध्ये पू होणं (Empyema), अशा स्थितीत योग्य वेळेत शस्त्रक्रिया करणं आवश्यक असतं.


शस्त्रक्रियेतील प्रगती कोणती ?

कित्येक दशकं छातीवर ८ ते १० इंच लांब छेद करून फुफ्फुसावरील शस्त्रक्रिया करण्यात येत आहे. या पद्धतीला टाक्याची किंवा खुली शस्त्रक्रिया म्हणतात. जी परिणामकारक आहे. पण, शस्त्रक्रियेनंतरची अस्वस्थता, दुखणं, हॉस्पिटलमध्ये जास्तीस जास्त काळ राहायला लागणं, खूप मोठी जखमेची खूण अशा काही समस्या होतात.

तंत्रज्ञानातील प्रगती आणि कौशल्याचा वापर करून अलिकडे हॉस्पिटलमध्ये फुफ्फूसाच्या शस्त्रक्रिया नव्या (Video Assisted Thoracoscopic Surgery – VATS) पद्धतीने करतो. ही कमीत कमी छेद घेऊन शस्त्रक्रिया करण्याची पद्धत आहे. या तंत्रात पूर्ण शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे केली जाते, ज्यात दुर्बिणीस छोटा कॅमेरा बसवलेला असतो. सोबत विशेष अद्यायावत उपकरणांचा आणि इंडो-स्टॅपलर्सचा वापर करण्यात येतो. ही उपकरणे ३ ते ४ अतिशय लहान (१ सेमी) छेदातून छातीच्या आत जातात.


शस्त्रक्रिया करण्याचे फायदे

ही शस्त्रक्रिया (VATS) लहान छेद घेऊन करण्यात येते. म्हणून रुग्णाला शस्त्रक्रियेनंतर कमीत कमी वेदना होतात. रुग्ण ३ ते ४ दिवसात घरी जाऊ शकतो. तसंच लवकरच पुन्हा पूर्णपणे कार्यरत होऊ शकतो. वॅट्स शस्त्रक्रियेत अतिशय लहान खूणा केल्या जातात. तसंच, VATS मध्ये कोणत्याही प्रकारचे स्नायू कापले जात नाहीत आणि बरगडयांना हानी होत नाही.


औषध प्रतिरोधक क्षयरोगाचे प्रकार

1) एमडीआर (Multi Drug Resistant) – या प्रकारच्या क्षयरोगामध्ये (MDR-TB) क्षयरोगाचे जीवाणू Isoniazid and Rifampicin या दोन अत्यंत प्रभावी औषधांना प्रतिसाद देत नाहीत.

2) एक्सडीआर (Extensively Drug Resistant) – या क्षयरोगामध्ये (XDR-TB) क्षयरोगाचे जीवाणू Isoniazid, Rifampicin, Fluoroquinolones आणि कमीत कमी ३ क्षयरोग प्रतिबंधक इंजेक्शन्सना प्रतिसाद देत नाही.

3) औषध प्रतिरोधक क्षयरोगाचा तिसरा प्रकार म्हणजे टीडीआर (Totally Drug Resistant TB) हा क्षयरोग फक्त भारतात आढळून आला आहे. जरी या क्षयरोगाचा उपचार करणं अत्यंत कठीण असलं, तरी ते अशक्य नाही.



हेही वाचा-

उष्णतेमुळे पोटाच्या विकारांमध्ये वाढ, स्ट्रीट कोल्ड्रिंक्समुळे सर्वाधिक धोका

रक्तपेढ्यांकडून अतिरिक्त शुल्क आकारणी



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा