Advertisement

आता २५०० रुपयांमध्ये होणार कोरोना तपासणी

प्रयोगशाळेत स्वत:हून तपासणीसाठी जाणाऱ्यांकडून २८०० रुपयांऐवजी २५०० रुपये घेण्यात येणार आहेत. यासंदर्भातील निर्देश सर्व खासगी प्रयोगशाळांना देण्यात आल्याची माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

आता २५०० रुपयांमध्ये होणार कोरोना तपासणी
SHARES

खासगी प्रयोगशाळेत करण्यात येणाऱ्या कोरोना चाचण्यांसाठी राज्य शासनाने २२०० आणि २८०० रुपये दर निश्चित केले आहेत. मात्र आता प्रयोगशाळेत स्वत:हून तपासणीसाठी (now private lab in mumbai charge only 2500 rupees for corona test) जाणाऱ्यांकडून २८०० रुपयांऐवजी २५०० रुपये घेण्यात येणार आहेत. यासंदर्भातील निर्देश सर्व खासगी प्रयोगशाळांना देण्यात आल्याची माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. 

थेट प्रयोगशाळेत

यासंदर्भात माहिती देताना आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले, राज्य शासनाने काही दिवसांपूर्वीच कोरोना चाचण्यांचे दर निश्चित केले आहेत. त्यानुसार रुग्णालयात जाऊन रुग्णाच्या स्वॅबचा नमुना तपासणीसाठी नेल्यास २२०० रुपये आणि रुग्णाच्या घरी जाऊन स्वॅबचा नमुना नेण्यास २५०० रुपये आकारण्याचा निर्णय झाला होता. मात्र काही व्यक्ती, रुग्ण स्वत: थेट प्रयोगशाळेत जाऊन तपासणी करत असल्याचंही निदर्शनास आलं आहे. 

हेही वाचा- कोरोना चाचणीचे दर निम्म्याने कमी, 'इतका' दर आकारला जाणार

खर्च वाचतो 

परंतु अशा व्यक्तींकडून खासगी प्रयोगशाळा २८०० रुपये आकारत आहेत. रुग्ण जर स्वत: हून प्रयोगशाळेत आलेला असेल, तर प्रयोगशाळेला पीपीई कीट किंवा वाहतुकीचा खर्च येत नाही. त्यामुळे स्वॅबचा नमुना देण्यासाठी आलेल्या व्यक्तीकडून २८०० घेणं योग्य नसल्याने त्यांना २५०० रुपये आकारावेत, असा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. २२०० आणि २८०० यामधला टप्पा म्हणून २५०० रुपये राज्य शासनाने हे ठरवून दिल्याचंही राजेश टोपे यांनी सांगितलं आहे. 

दरनिश्चिती 

खासगी प्रयोगशाळांमध्ये करण्यात येणाऱ्या स्वॅब चाचणीची किंमत याआधी अनुक्रमे ४५०० व ५२०० अशी होती. परंतु राज्य सरकारने सर्वसामान्यांना दिलासा देत खासगी प्रयोगशाळांमध्ये केल्या जाणाऱ्या कोरोना चाचणीचे दर निम्म्याने कमी केले आहेत. त्यासाठी आरोग्य विभागाने ४ सदस्यांची समिती नेमली होती. या समितीने शासनाला अहवाल सादर केल्यानंतर समितीच्या शिफारशीनुसार दरनिश्चित करण्यात आले आहेत. 

कडक कारवाई

खाजगी प्रयोगशाळेने यापेक्षा अधिक शुल्क आकारले तर त्यांच्याविरूद्ध कायदेशीर कारवाई केली जाईल, असंही आरोग्यमंत्र्यांनी सांगितलं आहे. सध्या राज्यात ५३ शासकीय आणि ४२ खाजगी अशा एकूण ९५ प्रयोगशाळा कोरोना निदानासाठी कार्यरत आहेत.  मुंबईमध्ये सर्वाधिक चाचण्या होत आहेत. राज्यात आयसीएमआरच्या मार्गदर्शक सूचनांनुसारच चाचण्या होत असून त्यात कुठलीही तडजोड केली जात नसल्याचं आरोग्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा