Advertisement

१२ वर्षांवरील मुलांना मिळणार कोरोनावरील लस, जायडस कॅडिलाच्या लसीला परवानगी

ड्रग्स कंट्रोलर जनरल ऑफ इंडियानं जायडस कॅडिलाच्या या लसीला आपत्कालीन वापरास मंजुरी दिली आहे.

१२ वर्षांवरील मुलांना मिळणार कोरोनावरील लस, जायडस कॅडिलाच्या लसीला परवानगी
SHARES

जगातील पहिल्या आणि भारतात विकसित करण्यात आलेल्या डीएनएवर आधारीत कोरोना लसीच्या आपत्कालीन वापराला केंद्र सरकारनं मंजुरी दिली आहे. ड्रग्स कंट्रोलर जनरल ऑफ इंडियानं जायडस कॅडिलाच्या या लसीला आपत्कालीन वापरास मंजुरी दिली आहे.

ही लस १२ वर्षांवरील मुलांना देण्यात येईल. यामुळे देशात लवकरच १२ वर्षांवरील मुलांचं लसीकरण सुरू होणार आहे. देशात आतापर्यंत १८ वर्षांवरील नागरिकांना करोनाची लस दिली जात होती.

विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयानं ही माहिती दिल्याचं वृत्त एएनआयनं शुक्रवारी सांगितलं. DCGI नं जायडस कॅडिलाच्या डीएनएवर आधारीत जागतील पहिल्या कोरोना लसीला मंजुरी दिली. ही लस १२ वर्षांवरील मुलांना आणि प्रौढांना दिली जाईल. ही लस ६६ टक्क्यांहून अधिक प्रभावी आहे.

जायडस कॅडिलाचा ही लस डीएनएवर आधारीत जगातील पहिली लस आहे. या लसीद्वारे जेनेटिकली इंजीनियर्ड प्लास्मिड्सला शरीर इंजेक्ट केले जाते. यामुळे शरीरात करोनाच्या स्पाइक प्रोटीनची निर्मिती होते आणि व्हायरसपासून बचावासाठी अँटीबॉडी तयार केली जाते. कोरोनावरील बहुतेक लसी या दोन डोसच्या आहेत. पण जायडस कॅडिलाची ही लस तीन डोसची आहे.

ही लस सुईनं नाही तर एका खास इंजेक्टरद्वारे दिली जाते. यामुळे लस घेताना फारशी वेदना होत नाही. तसंच या लसीचे साइड इफेक्टही कमी आहेत, असा दावा कंपनीनं केला आहे.

जायडस कॅडिलाच्या या लसीचे ३ डोस दिले जातील. भारतात ५० हून अधिक केंद्रांवर या लसीची सर्वात मोठी क्लिनिकल ट्रायल केली गेली. अहमदाबादमधील या औषध कंपनीने १ जुलैला लसीच्या आपत्कालनी मंजुरीसाठी DCGI कडे अर्ज केला होता.

जायडस कॅडिलाच्या लसीला मंजुरी मिळाल्यानंतर पंतप्रधान मोदींनी ट्वीट केलं आहे. करोनाविरोधातील लढाई भारत पूर्ण सामर्थ्यानं लढत आहे. डीएनएवर आधारीत करोनावरील पहिल्या लसीला मंजुरी मिळणं म्हणजे भारतीय शास्त्रज्ञांचं मोठं यश आहे. ही अतिशय अभिमानाची आणि गौरवाची बाब आहे, असं पंतप्रधान मोदी म्हणाले.

जायडस कॅडिलाच्या कोरोनावरील लसीला मंजुरी मिळाल्यानं देशात आतापर्यंत एकूण ६ लसींना मंजुरी दिली गेली आहे. कोविशिल्ड, कोवॅक्सिन, स्पुतनिक व्ही लसीला यापूर्वी केंद्र सरकारनं मंजुरी दिली होती.


Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा