Advertisement

कोस्टल रोडसाठी १५ हेक्टरचा भराव


कोस्टल रोडसाठी १५ हेक्टरचा भराव
SHARES

मुंबईतील महत्वाकांक्षी कोस्टल रोड या प्रकल्पासाठी समुद्रात ९० हेक्टरचा भराव टाकण्यात येणार होता. मात्र ६ हेक्टर आणखी भराव टाकावा लागणार असल्याचे महापालिकेने सर्वोच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्राद्वारे २८ ऑगस्ट रोजी कळवले होते. मात्र आता त्यातही बदल करीत १५ हेक्टर भराव करण्याची गरज असल्याने पालिकेने स्पष्ट केलं आहे. 

पर्यावरणप्रेमी आणि मच्छीमारांकडून तीव्र विरोध होण्याची शक्यता आहे. मुंबईकरांचा प्रवास जलद करण्यासाठी प्रिन्सेस स्ट्रीट ते वरळीपर्यंत ९.९८ किमीचा सागरी किनारा मार्ग तयार करण्यात येणार आहे. ऑक्टोबर २०१८मध्ये या प्रकल्पाच्या कामाला सुरुवात झाली. त्यानुसार ४ वर्षांत हा प्रकल्प पूर्ण करण्याचे निश्चित करण्यात आले.

या मार्गासाठी टाकल्या जाणाऱ्या भरावामुळे समुद्रकिनाऱ्यावरील जैवविविधता नष्ट होईल, मच्छीमारांच्या उदरनिर्वाहाचे साधन जाईल असा आक्षेप घेण्यात आला. त्यामुळे उच्च न्यायालयाने या प्रकल्पाला व भरावाला स्थगिती दिली. याविरोधात महापालिकेने सर्वोच्च न्यायालयात दाद मागितल्यानंतर प्रगती उठल्याने कामाला पुन्हा एकदा वेग मिळाला.

महापालिकेने आतापर्यंत ५२.३५ हेक्टर जमीन भराव टाकून तयार केली आहे. प्रकल्पासाठी एकूण ९० ट्रॅक्टरचा भराव टाकण्यात येणार होता. मात्र महापालिकेने दहा दिवसांत दुसऱ्यांदा सुधारित प्रतिज्ञापत्राद्वारे आणखी १५ हेक्टर म्हणजे एकूण १११ हेक्टर भराव टाकावा लागणार असल्याचे स्पष्ट केले आहे. 

समुद्रातील उंच लाटा आणि धूप होण्यापासून सागरी मार्गाचे संरक्षण करण्यासाठी समुद्रात बांधण्यात आलेल्या भिंतीमुळे भरावासाठी आवश्यक जागेत वाढ झाल्याची सबब पालिका प्रशासनाने दिली आहे. या प्रकरणी बुधवारी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. समुद्रात उभारण्यात येणाऱ्या संरक्षण भिंतीमुळे १५ हेक्टर अतिरिक्त भराव टाकावा लागणार आहे. मात्र यासाठी वापरण्यात येणाऱ्या विशिष्ट खडकांमुळे सागरी जैवविविधता वाढविण्यात मदत होईल आणि ते पर्यावरणपूरक असेल, असे पालिका प्रशासनाने प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे.

महापालिकेकडे ९० हेक्टरचा भराव टाकण्यासाठी सागरी नियंत्रण क्षेत्राचे ना हरकत प्रमाणपत्र आहे. तर पर्यावरण मंत्रालयाने मंजुरी दिल्यानंतरच उर्वरित भराव टाकला जाईल, असेही स्पष्ट केले आहे.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा