गेले अर्ज कुणीकडे

 Pali Hill
गेले अर्ज कुणीकडे

मुंबई - पंतप्रधान आवास योजनेंतर्गत म्हाडाकडून परवडणाऱ्या घरांसाठी सुरू असलेल्या सर्व्हेक्षणांतर्गत गेल्या पाच महिन्यांत म्हाडाकडे अंदाजे अडीच लाख अर्ज जमा झालेत. मात्र त्याचवेळी गेल्या महिन्याभरापासून गल्लीबोळातून, दलाल आणि नागरिकांकडून 120 ते 200 रुपये लाटत अर्ज भरून घेतले जात आहेत. पण ते अर्ज गेले कुठे असा प्रश्न आता निर्माण झाला आहे. कारण जिकडे-तिकडे अर्ज भरून घेण्यासाठी महिलांच्या रांगाच-रांगा लागल्या आहेत. अगदी कामधंदा सोडून महिला सकाळपासून रात्रीपर्यंत रांगेत उभ्या राहून अर्ज भरून घेत आहेत. त्याअनुषंगाने म्हाडाकडील सर्व्हेक्षणासाठीच्या अर्जाचा आकडा मात्र वाढताना दिसत नाही. त्यामुळे खरोखर घरांच्या नावे नागरिकांची फसवणूक होत आहे का? हे अर्ज ऑनलाईन भरले जात आहेत. तर ते अर्ज जातात कुठे की फक्त पैसे लाटण्यासाठी अशिक्षित गरीब नागरिकांच्या हातात एखादा कागद सोपवला जात आहे का? असे अनेक प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहेत.

यासंबंधी म्हाडाचे सचिव बास्टेवाड यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी गेल्या पाच दिवसांपर्यत अर्जांचा आकडा अडीच लाखांपर्यंत गेल्याचे सांगितलं आहे. त्याचबरोबर या योजनेच्या नावे होणाऱ्या फसवणुकीच्या ‘मुंबई लाइव्ह’च्या बातमीची गंभीर दखल घेत पोलीस विभागाला पत्र पाठवत त्यासंबंधीची तक्रार केली असल्याचंही सांगितलं आहे. तर नागरिकांनी कोणत्याही भूलथापांना बळी पडू नये असं आवाहनही केलं आहे.

फसवणूकच...हे लक्षात घ्या

म्हाडाच्या संकेतस्थळावर ऑनलाइन कोणतेही शुल्क न घेता अर्ज करता येतो. तर कॉमन सर्व्हिस सेंटरच्या माध्यमातून 25 रुपये भरत अर्ज करता येतो.

त्याचवेळी अर्ज भरण्यासाठी अर्जदारांचा मोबाइल नंबर आणि व्यक्तिगत आयडी आवश्यक असतो. अर्जदाराचा आयडी तयार केल्यानंतर त्यांच्या मोबाइल नंबरवर वन टाइम पासवर्ड येतो. या पासवर्डद्वारेच पुढील प्रक्रिया होते.

‘मुंबई लाइव्ह’ने ज्या-ज्या दलालांच्या दुकानांवर जात पाहणी केली होती, नागरिकांशी संपर्क साधला होता त्यानुसार दलाल केवळ आधार कार्ड बघून अर्जाचा फोटो चिटकवून एक अर्ज नागरिकांच्या हातात सोपवत आहेत. त्यामुळे ही फसवणूकच असल्याची दाट शक्यता असल्याची चर्चा आहे.

Loading Comments