महापालिका उभारणार १७ स्पोर्ट्स सेंटर

 Mumbai
महापालिका उभारणार १७ स्पोर्ट्स सेंटर
Mumbai  -  

मुंबई - मुंबई महापालिकेच्या शारीरिक शिक्षण विभागाच्या वतीने 17 स्पोर्टस सेंटर बनवण्यात येणार आहेत. या स्पोर्टस सेंटर अंतर्गतच महापालिकेतील शाळेच्या विद्यार्थ्यांना शाळेला लागून असलेल्या मैदानामध्ये क्रिकेट, फुटबॉल, बास्केटबॉल, कबड्डी, खो-खो या खेळांकरता कृत्रिम गवताचे मैदान (टर्फ) हे सीएसआर मार्फत तयार करण्याचे निश्चित केले आहे.

मुंबई महापालिकेच्या शिक्षण विभागांतर्गत शारीरिक शिक्षण हा स्वतंत्र उपविभाग कार्यरत आहे. शारीरिक शिक्षण विभागाचे 17 विभाग असून या विभागांतर्गत विविध क्रीडा स्पर्धा उपक्रम, क्रीडा प्रात्याक्षिके आणि त्यासाठी आवश्यक तो सराव तंत्रशुद्ध पद्धतीने नियोजन तसेच आयोजन केले जाते. महापालिकेचे विद्यार्थी शासकीय क्रीडा स्पर्धेत जिल्हास्तरीय, विभागस्तरीय, राज्य, राष्ट्रीय स्तरावर जास्तीत जास्त विद्यार्थी खेळाडू म्हणून सहभागी होतात. मागील शैक्षणिक वर्षात राज्यस्तरावर 37 आणि राष्ट्रीय स्तरावर 6 महापालिकेचे विद्याथी सहभागी झाले आहे.

महापालिका शाळेला लागून असलेल्या मैदानांमध्ये क्रिकेट, फुटबॉल, बास्केटबॉल, कबड्डी, खो-खो या खेळांकरता कृत्रिम गवताचे मैदान (टर्फ) हे सीएसआर मार्फत तयार करण्यात येतात. अशी मैदाने शाळांच्या दीर्घ सुट्टीच्या कालावधीत क्रीडा क्षेत्रातील खासगी संस्थांना त्यांचे सामने भरवण्यासाठी देण्याची मागणी नगरसेवकांची आहे. मात्र, प्रशासनाकडून याला अधिकृत दुजोरा दिला जात नाही. महापालिकेची एकूण 17 स्पोर्टस सेंटर बनवण्याचे निश्चित केले आहे. त्यानुसार पहिल्या टप्प्यात सहा स्पोर्टस सेंटर सुरू केले जाणार असून त्यानंतर टप्प्याटप्प्याने पुढील स्पोर्टस सेंटरची स्थापन केली जाईल, असे उपायुक्त (शिक्षण) मिलिन सावंत यांनी सांगितले.

महापालिका शाळांमधील मैदानांमध्ये कृत्रिम गवताचे मैदान बनवून क्रिकेट, फुटबॉल, बास्केटबॉल, कबड्डी, खो-खो या खेळांचे प्रशिक्षण द्यावे अशी मागणी काँग्रेसचे माजी नगरसेवक फैय्याज अहमद यांनी केली होती. याबरोबरच त्यांनी ही मैदाने खासगी संस्थांना शालेय सुट्टीमध्ये शुल्क आकारून क्रीडा स्पर्धा आयोजित करण्यासाठी उपलब्ध करून द्यावीत, अशी मागणी ठरावाच्या सुचनेद्वारे मागील वर्षी ऑगस्ट महिन्यात केली होती.

महापालिका शाळांना जोडून असलेली मैदाने - 94
चांगल्या स्थितीत असलेल्या मैदानांची संख्या - 40
विकास करण्याची आवश्यक असलेल्या मैदानांची संख्या - 54

Loading Comments