Advertisement

हँकॉक ब्रिजसाठी पालिकेचा पुढाकार, 'मुंबई लाइव्ह'च्या बातमीचा इम्पॅक्ट


हँकॉक ब्रिजसाठी पालिकेचा पुढाकार, 'मुंबई लाइव्ह'च्या बातमीचा इम्पॅक्ट
SHARES

मुंबई - सँण्डहर्स्ट रोड येथील हँकाॅक ब्रिजच्या पुनर्बाँधणीत माझगावच्या दिशेने असलेल्या काही झोपड्यांचा अडथळा येतोय. आता मात्र हा अडथळा दूर होणार आहे. कारण या झोपड्या हटवण्याची जबाबदारी मुंबई महानगर पालिकेचे सिंघम अर्थात पालिकेच्या बी विभागाचे सहाय्यक आयुक्त उदय शिरूरकर यांनी घेतली आहे. तात्पुरता पादचारी पूल वा कायमस्वरूपी पूल बांधण्याचा निर्णय झाल्यास पूल बांधण्यासाठी जी काही अतिक्रमणं हटवावी लागतील ती अतिक्रमणे हटवण्यात येतील, अशी माहिती शिरूरकर यांनी मुंबई लाइव्हशी बोलताना दिली आहे. तर हँकॉक ब्रिजसंबंधातील याचिकाकर्त्यांना पालिकेकडून यासंबंधीचे लेखी पत्रही पाठवण्यात आल्याचे शिरूरकर यांनी स्पष्ट केले आहे.

सँण्डहर्स्ट रोड आणि माझगावला जोडणारा हँकॉक ब्रिज धोकादायक असल्याचे सांगत, मुंबईकरांची फसवणूक करत रेल्वे प्रशासनाने पाडला. पण त्यानंतर 15 महिने उलटले तरी येथे तात्पुरता पादचारी वा कायमस्वरूपी ब्रिज बांधण्याच्या दृष्टीने पालिका आणि रेल्वे प्रशानाने कोणतेही पाऊल उचललेले नाही. पालिका आणि रेल्वेच्या या उदासीन धोरणाचा फटका येथील रहिवाशांना बसत आहे. 5 मिनिटांचे अंतर पार करण्यासाठी 45 मिनिटे वाया घालवावी लागत आहेत. तर अनेकांवर रूळ ओलांडून, भिंत चढून दररोज जीवघेणा प्रवास करावा लागत आहे. त्यामुळे आता येथील रहिवाशी प्रचंड नाराज झाले असून, त्यांनी त्वरीत पादचारी पूल बांधण्याची मागणी उचलून धरली जात आहे. दरम्यान, यासंबंधी उच्च न्यायालयात याचिका दाखल झाली असून, उच्च न्यायालयानेही पालिका-रेल्वे प्रशासनाला दणका देत यावर त्वरीत तोडगा काढण्याचे आदेश दिले आहेत.

हँकॉक ब्रिज कसा मुंबईकरांची फसवणूक करत पाडला आणि तो पाडल्याने स्थानिकांची कशी गैरसोय होतेय याचे सविस्तर वृत्त नुकतेच 'मुंबई लाइव्ह'ने प्रसिद्ध केले होते. या वृत्ताची दखल घेत पालिकेच्या बी विभागाने पूल बांधण्यातील सर्वात मोठा अडथळा अर्थात झोपड्या हटवण्याचा अडथळा दूर करण्याची तयारी दर्शवली आहे. याचिकाकर्ते कमलाकर शेणॉय आणि स्थानिकांनी पालिकेच्या या निर्णयाचे स्वागत करत आनंद व्यक्त केला आहे.

मुंबई लाइव्हने दाखवलेली हँकॉक ब्रीजची आधीची बातमी...

मुंबईकरांना फसवून पाडला हँकॉक ब्रिज?


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा