मोनोचे काम 98 टक्के पूर्ण, जूनपर्यंत मोनो सेवेत दाखल होणार

 Pali Hill
मोनोचे काम 98 टक्के पूर्ण, जूनपर्यंत मोनो सेवेत दाखल होणार

मुंबई - चेंबुर ते जेकब सर्कल असा थेट मोनोरेल प्रवास कधी सुरू होणार, याकडे मुंबईकरांचे लक्ष लागले आहे. तेव्हा मुंबईकरांना हा प्रवास करण्यासाठी किमान पाच महिने प्रतिक्षा करावी लागणार आहे. मोनोचे बांधकाम 98 टक्के पूर्ण झाले असले तरी विविध चाचण्या आणि रेल्वे बोर्डाकडून सुरक्षा प्रमाणपत्र घेण्याच्या प्रक्रियेसाठी तीन ते चार महिन्यांचा काळ लागणार आहे. त्यामुळे ही सर्व प्रक्रिया पूर्ण करत मोनो मुंबईकरांच्या सेवेत जुनमध्ये दाखल होईल,अशी माहिती मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एमएमआरडीए)चे अतिरिक्त आयुक्त संजय खंदारे यांनी दिली आहे.

चेंबुर ते वडाळा मोनो मार्गास हवा तसा प्रतिसाद मिळत नसल्याने मोनो तोट्यात सुरू आहे. मात्र चेंबुर ते जेकब सर्कल असा पूर्ण मार्ग सुरू झाल्यास मोनोला प्रतिसाद मिळेल, असा विश्वास एमएमआरडीएला आहे. त्यामुळे आता शक्य तितक्या लवकर दुसरा टप्पा सेवेत दाखल करण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्यानुसार 98 टक्के बांधकाम एमएमआरडीएने पूर्णही केले आहे. मात्र, मोनोच्या पाच गाड्या येण्यास विलंब होत असल्याने आणि चाचणी-सुरक्षा प्रमाणपत्राची किचकट, वेळखाऊ प्रक्रिया पूर्ण होणं बाकी असल्याने एमएमआरडीएला जूनपर्यंतचा वेळ मोनो सुरू करण्यासाठी द्यावा लागणार आहे.

दरम्यान, पाच मोनोच्या गाड्यांच्या रचनेमध्ये थोडा बदल करण्यात आल्याने गाड्या अजून मुंबईत दाखल झालेल्या नाहीत. मात्र नव्या रचनेच्या गाड्या लवकरच मुंबईत येतील, असा दावाही खंदारे यांनी केला आहे.

Loading Comments